Road Issue In Mandrem आश्वे-मांद्रे भागातील मुख्य रस्त्यांना पडलेले खड्डे सर्वांसाठीच डोकेदुखी बनले आहेत. या खड्ड्यांतून वाहने चालवताना वाहनचालकांना खूप त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या रस्त्यांची डागडुजी लवकरात लवकर करावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.
पावसाळ्यात मांद्रे मतदारसंघातील रस्त्यांची स्थिती धोकादायक होईल, अशी भीती यापूर्वीच नागरिकांनी व्यक्त केली होती. सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाला वेगवेगळ्या सामाजिक संघटनानी निवेदन सादर करून पावसाळ्यापूर्वी रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली होती.
परंतु झोपी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याला अजिबात जाग आली नाही. आता पावसामुळे रस्त्याला जे खड्डे पडलेले आहेत. त्या खड्ड्यांमुळे छोटेमोठे अपघात घडत असल्याने लोकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात फेरफटका मला तर रस्ते अपघाताला कसे कारणीभूत ठरतात याचे चित्र दिसून येईल. खड्ड्यातून रस्ता की रस्त्यातून खड्डे जातात, याचा पत्ताही लागत नाही.
आश्वे येथील जुनसवाडा-मांद्रेपर्यंत त्यानंतर फॉरेस्ट पार्क मराठवाडा या भागातील रस्त्यावर नजर मारली की रस्तेच शोधताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. एखादा खड्डा चुकवला तर दुसऱ्या खड्ड्यात वाहनाचे चाक गेलेच म्हणून समजा ही स्थिती या रस्त्यांची झालेली आहे. आणि याला पूर्णपणे वीज खाते कारणीभूत आहे.
वीज खात्याने भूमिगत वीज केबल घालण्यासाठी रस्ते मनमानी पद्धतीने खणले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्यानेही याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदाराने रस्त्याचे खोदकाम करताना जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिलेल्या अटी-नियमांचे पालन केलेले नाही. मनमानी पद्धतीने केलेल्या कामाचा परिणाम आता सर्वसामान्य वाहनचालकांना भोगावा लागत आहे.
वाहनचालकांच्या जीवावर बेतणारे
पावसाळ्यात या रस्त्यांची डागडुजी करण्याचे काम कंत्राटदाराने हाती घेतले. परंतु त्याची व्यवस्थित कार्यवाही होत असल्याचे चित्र दिसून येत नाही.
या खड्ड्यांमधून वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागतात. समोरून आलेल्या वाहनांना बाजू देताना कधी या खड्ड्यात तोल जाऊन जीव जाईल हेही कळत नाही.
प्रसारमाध्यमांतून आवाज : या रस्त्यांविषयी ग्रामसभांमध्ये आवाज उठवला जात आहे. नागरिक इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून आवाज करत आहेत. काही नागरिक सामाजिक माध्यमांतूनही आवाज उठवत आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम खाते काही कान हलवत नाही. अशी स्थिती तरी सध्या आश्वे-मांद्रे-मोरजीतील या रस्त्यांची अवस्था पाहून दिसून येते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.