Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. उत्तर गोव्यातून श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातून पल्लवी धेंपे यांना निवडणुकीच्या मैदानात भाजपने उतरवले आहे.
दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहे. यातच, एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे माजी नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांच्या समर्थकांसह आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मुख्यमंत्री असताना गोव्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक न केल्यामुळे पार्सेकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता भाजप नेतृत्वाला पार्सेकरांची ही नाराजी दूर करण्यात यश आले आहे. त्यांनी मतदारांना उत्तर गोव्यातील उमेदवार श्रीपाद नाईक आणि दक्षिण गोव्यातील उमेदवार पल्लवी धेंपे यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पुन्हा एकदा आपल्याबरोबर घेण्यासाठी भेट घेतली होती. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नव्हते. अखेर पार्सेकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपला पाठिंबा जाहीर केला. पार्सेकरांच्या पाठिंब्याने भाजपची आणखी ताकद वाढली आहे.
शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यात प्रचारसभेला संबोधित केले. शाह यांच्या गोवा दौऱ्यानंतर पार्सेकरांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आता भाजपने जाोमाने आपला प्रचार सुरु केला आहे. राज्यातील दोन्ही जागा कसल्याही परिस्थिती जिंकण्यासाठी भाजपने चंग बांधला आहे.
दुसरीकडे, पार्सेकर भाजपला पाठिंबा देणार की नाही अशी चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात रंगली होती. परंतु आज खुद्द पार्सेकर यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.
दरम्यान, कॉंग्रेसने पार्सेकरांच्या पाठिंब्याचा मुद्दा बनवत भाजपवर अनेकदा टीकास्त्र डागले होते. त्यामुळे आता पार्सेकरांच्या पाठिंब्यांचा मुद्दा मागे पडणार हे मात्र नक्की. येत्या सात तारखेला गोव्यासह देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.