Pramod Sawant Visit Goa Dairy  Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची गोवा डेअरीला आकस्मिक भेट; अधिकाऱ्यांची मात्र धावपळ

Pramod Sawant Visit: उसगाव येथे नवा प्रकल्प आणि कुर्टी येथे लवकरच पशुचिकित्सा महाविद्यालय सुरू करण्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सध्या ॲक्शन मोडवर असून आज त्यांनी गोवा डेअरी प्रकल्पाला आकस्मिक भेट दिली. यावेळी गोवा डेअरीच्या अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच धावपळ उडाली. गोवा डेअरीच्या माध्यमातून उसगाव येथे नवा प्रकल्प आणि कुर्टी येथे लवकरच पशुचिकित्सा महाविद्यालय सुरू करण्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी गोवा डेअरीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतली. तसेच गोवा डेअरीचा नवीन प्रकल्प उसगावात उभारण्यासंबंधी यावेळी मुख्यमंत्र्यांनी तेथील अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा केली. यावेळी गोवा डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर तसेच समितीचे सदस्य डॉ. रामा परब, संदीप परब पार्सेकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांना गोवा डेअरीच्या कामकाजासंबंधीची माहिती देण्यात आली. गोवा डेअरीचा प्रकल्प पन्नास वर्षे जुना असून पुढील पन्नास वर्षांची तरतूद करण्यासाठी गोवा डेअरीचा नवीन प्रकल्प खात्याच्या उसगाव येथील जमिनीत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोवा डेअरीच्या विद्यमान समितीवर मुख्यमंत्री खूष दिसले. पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या प्रशासकीय समितीने गोवा डेअरीला नफा करून दिला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. दूध उत्पादकांना आवश्‍यक लाभ मिळवून देण्यासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात मोठ्या प्रमाणात दुधाची गरज भासते त्यामुळे गोवा डेअरी दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोवा डेअरी ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलीय त्यामुळे हा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी पुढील काळात प्रयत्न व्हायला हवेत असे मुख्यमंत्री म्हणाले. गोवा डेअरीचा नवीन प्रकल्प उभारला तरीही जुन्या प्रकल्पाचे काम कमी होणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, गोवा डेअरीबाबत जनमानसात सध्या मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण होत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी अाकस्मिक भेट देऊन गोवा डेअरीच्या कामाचा अाढावा घेत त्यांच्या कामाची प्रशंसा केल्याने लोकांच्या मनातील गोवा डेअरीबाबतची प्रतिमा बदलण्यास निश्‍चितच मदत होणार आहे. तसेच नवीन प्रकल्पाची घोषणा केल्याने डेअरीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतही उत्साहाचे वातावरण आहे.

जुना प्रकल्प सुरूच राहणार!

गोवा डेअरीच्या जुन्या प्रकल्पात दूकध उत्पादन सुरूच राहणार असून डेअरीशी संबंधित इतर उत्पादनांची निर्मिती उसगावच्या नवीन प्रकल्पात करण्यात येणार आहे. हा अत्याधुनिक स्वरूपाचा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्राकडे बोलणी करण्यात येणार आहे. सध्या प्राथमिक स्तरावर मान्यता मिळाली असून त्याची कार्यवाही सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

रिकाम्या दूध पिशव्या द्या!

गोवा डेअरीने रिकाम्या पिशव्या द्या आणि एक दुधाने भरलेली पिशवी न्या, असा उपक्रम सुरू केला होता. या रिकाम्या पिशव्या फक्त गोवा डेअरीच्याच असायला हव्या, अशी अट होती; पण त्यात आता बदल करून इतर कोणत्याही डेअरीच्या रिकाम्या शंभर पिशव्या द्या आणि एक दुधाची पिशवी न्या, असा उपक्रम राबवला जाणार असल्याचे गोवा डेअरीतर्फे सांगण्यात आले.

दुधात कोणत्याच प्रकारची भेसळ केली जात नाही!

गोवा डेअरीतील दूध शुद्ध असून कोणत्याच प्रकारची त्यात भेसळ केली जात नाही. रोज ५० हजार लिटर दुधाचे उत्पादन केले जात असून ग्राहकांच्या हातात हे दूध पाकीट पडत असल्याने शुद्ध दुधाचा पुरवठा गोव्यात करण्यास गोवा डेअरी बांधील असल्याची ग्वाही प्रशाकीय समितीने पत्रकारांशी बोलताना दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT