Miramar Goa Crime News: एका बाजूला गोवा ड्रग्समुक्त करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू असले तरी दुसरीकडे शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्स पोहोचले आहे, ही धक्कादायक वस्तुस्थिती आहे.
मिरामार लेक व्ह्यू येथे ड्रग्स व्यवसायातून दोन मित्रांमध्ये वैमनस्य निर्माण होऊन त्याचे पर्यवसान मारहाणीत झाले.
तिघा अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीनाला बेसबॉल बॅटने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या शरीरावर बेसबॉलच्या बॅटने तब्बल १८ प्राणघातक प्रहार केले. गंभीर जखमी झालेल्या मुलावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
मारहाण केलेल्या तिघा मुलांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. त्यांना ताब्यात घेऊन मेरशी येथील अपना घरात रवानगी केली आहे. या घटनेमुळे राज्यात ड्रग्स सेवन करणाऱ्या मुलांचे प्रमाण वाढू लागल्याचे चित्र स्पष्ट होऊन ही चिंतेची बाब ठरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी मुलगा तसेच संशयित हे चांगले मित्र होते. मात्र, ते गांजाच्या व्यसनाने पछाडले होते. ते सर्वजण एकत्रितपणे गांजाचे सेवन करायचे.
आजच्या प्रकरणात जखमी झालेल्या मुलाने या तिघांमधील एका मुलाने गांजा न दिल्याच्या रागातून त्याला बेसबॉल बॅटने कांपाल येथे मारहाण केली होती.
या मारहाणीची तक्रार नोंदवण्यासाठी तो मुलगा पणजी पोलिसांत गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने तो परत गेला होता. मात्र, मारहाण केलेल्या मित्राला अद्दल घडवण्यासाठी तो सुडाने पेटून उठला होता.
अखेर त्याने आज (बुधवारी) मिरामार येथील लेक व्ह्यू परिसरात त्याला गांजा देतो, असे सांगून बोलावले. तो तेथे आला असता संशयित मुलाने त्याला बेसबॉल बॅटने मारहाण करण्यात सुरुवात केली. यावेळी तो जमिनीवर पडला, तरी संशयित प्रहार करतच राहिला.
त्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ त्याच्या इतर साथीदारांनी काढला. त्याच्या हाता-पायावर आणि डोक्यावर सुमारे १८ वेळा बॅटने प्रहार केले. त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्तस्राव झाला तसेच हातपायही फ्रॅक्चर झाले.
मारहाणीनंतर तिघेही संशयित मुले घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पणजी पोलिसांनी जखमी मुलाला गोमेकॉत दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याची जबानी नोंदवण्यास पोलिसांना परवानगी दिलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही सर्व मुले सुशिक्षित आहेत. एक मुलगा गोवा तंत्रनिकेतनमध्ये अभियांत्रिकी पदविकेचे शिक्षण घेत आहे. हे तिघेही गोमंतकीय आहेत.
मात्र, जखमी झालेला मुलगा परप्रांतीय आहे. मारहाणीसाठी वापरलेल्या बेसबॉल बॅटचा शोध पोलिस घेत आहेत. तिघेही संशयित अल्पवयीन असले तरी पोलिस चौकशीत ती उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.