D. J. Gokulakrishnan Passed Away: गोव्याचे माजी रणजी अष्टपैलू गोकुळकृष्णन यांचे निधन

दोन मोसम प्रतिनिधित्व: कर्नाटकवरील पहिल्या विजयाचे शिल्पकार, सामन्यात १० गडी बाद करणारे पहिले
D. J. Gokulakrishnan Passed Away: गोव्याचे माजी रणजी अष्टपैलू गोकुळकृष्णन यांचे निधन
Published on
Updated on

D. J. Gokulakrishnan Passed Away मूळ तमिळनाडूचे, पण 1990च्या दशकात गोव्यातर्फे दोन रणजी क्रिकेट मोसम खेळलेले अष्टपैलू डी. जे. गोकुळकृष्णन यांचे वयाच्या पन्नासाव्या वर्षी चेन्नई येथे बुधवारी निधन झाले.

ते गोव्यातर्फे 1996-97 व 1997-98 असे दोन मोसम खेळले. रणजी सामन्यातील दोन्ही डावांत मिळून 10गडी बाद करणारे ते गोव्याचे पहिले गोलंदाज ठरले.

देशांतर्गत प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीत गोकुळकृष्णन 1993 ते 2004 या कालावधीत तमिळनाडू, आसाम व गोव्यातर्फे 39 प्रथम श्रेणी, तर 45 लिस्ट-ए (एकदिवसीय) सामने खेळले.

ते क्रिकेट प्रशिक्षक होते, तसेच सध्या बीसीसीआय सामनाधिकारी म्हणून सक्रिय होते. त्यांच्या निधनाबद्दल गोवा क्रिकेट असोसिएशनने तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

गोव्यासाठी विक्रमी कामगिरी

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे सामन्यात १० गडी बाद करणारे गोकुळकृष्णन पहिले गोलंदाज आहेत. २५ ते २८ ऑक्टोबर १९९६ या कालावधीत कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर गोव्याने तत्कालीन रणजी विजेत्या कर्नाटकला डाव व ८१ धावांनी हरवून रणजी करंडक स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला होता.

त्यावेळी तमिळनाडूचे व्ही. बी. चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखालील गोव्याच्या यशात गोकुळकृष्णन यांनी मोलाचा वाटा उचलला होता. गोव्याने ३४६ धावा केल्यानंतर कर्नाटकला अनुक्रमे ११४ व १५१ धावाच करता आल्या होत्या.

मध्यमगती गोलंदाजी टाकणाऱ्या गोकुळकृष्णन यांनी पहिल्या डावात ५४ धावांत ७ व दुसऱ्या डावात ६० धावांत ४ गडी बाद करून सामन्यात ११४ धावांत ११ गडी बाद करण्याचा पराक्रम साधला होता. गोव्यातर्फे त्यांनी एक शतकही झळकावले होते.

केरळविरुद्ध पलक्कड येथे १९९६-९७ मोसमात नाबाद १०४ धावा केल्या होत्या. त्यांनी दोन वेळा डावात ५ गडी बाद करताना गोव्यातर्फे १० रणजी सामन्यांत ३८ गडी बाद केले. एका शतकासह एकूण ३३६ धावा केल्या.

उपयुक्त अष्टपैलू खेळाडू

मध्यमगती गोलंदाज असलेल्या गोकुळकृष्णन यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०३ विकेट प्राप्त केल्या. चार वेळा त्यांनी डावात पाच गडी बाद करण्याचा पराक्रम साधला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्यांनी ७१ गडी बाद केले.

फलंदाजीत एक शतक व चार अर्धशतकांसह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १११६ धावा केल्या, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये दोन अर्धशतकांसह ५५२ धावा नोंदविल्या. निवृत्तीनंतर त्यांनी बीसीसीआय सामनाधिकारी या नात्याने रणजी करंडक, विजय हजारे करंडक एकदिवसीय, तसेच तमिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत काम बजावले.

ते लेव्हल-२ क्रिकेट प्रशिक्षक होते. तमिळनाडूचे साहाय्यक प्रशिक्षक (२००८ व २०१३) आणि गोलंदाजी प्रशिक्षक (२०१०) म्हणूनही त्यांनी जबाबदारी पेलली.

D. J. Gokulakrishnan Passed Away: गोव्याचे माजी रणजी अष्टपैलू गोकुळकृष्णन यांचे निधन
Goa E-Waste: गोव्यात 13 ऑक्टोबरपासून ई-कचरा संकलन मोहीम

जे. गोकुळकृष्णन यांची गोव्यातर्फे कारकीर्द

- मोसम १९९६-९७ ः ५ सामने, फलंदाजीत ४५.७५च्या सरासरीने १८३ धावा, १ शतक, गोलंदाजीत २०.१८च्या सरासरीने २२ विकेट, १ वेळ डावात ५, १ वेळ सामन्यात १० विकेट

- मोसम १९९७-९८ ः ५ सामने, फलंदाजीत २१.८५च्या सरासरीने १५३ धावा, गोलंदाजीत १७.५०च्या सरासरीने १६ विकेट, १ वेळ डावात ५ विकेट

‘‘गोव्याच्या रणजी क्रिकेट संघात गोकुळकृष्णन माझे सहकारी होते, अल्पावधीत खास मित्र बनले. गतवर्षी बीसीसीआय स्पर्धा सामनाधिकारी म्हणून ते गोव्यात आले होते. तेव्हा आम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. ते इतक्या लवकरच जगाचा निरोप घेतील असे वाटले नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.’’

- प्रशांत काकोडे, गोव्याचे माजी रणजी कर्णधार.

D. J. Gokulakrishnan Passed Away: गोव्याचे माजी रणजी अष्टपैलू गोकुळकृष्णन यांचे निधन
Pernem Zoning Plan: मुख्यमंत्र्यांचा दिलासा! जमीन रूपांतरप्रश्‍नी लोकांना विश्‍वासात घेऊनच निर्णय होणार!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com