रिव्हॉल्यूशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजी) शनिवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय कार्यकारिणीचे (सीईसी) सदस्य आणि आमदार वीरेश बोरकर यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे आमदार बोरकर काय निर्णय घेणार? याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते. परंतु, बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बोरकर यांनी सामंजस्याची भूमिका दाखवली. आपण पक्षातच राहणार, अधिक काम करून आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला अजून यश मिळवून देणार, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. पण, मनोज परब यांच्या राजीनाम्यानंतर पक्ष चालवणाऱ्या अजय खोलकर आणि विश्वेश नाईक यांच्याबाबत मात्र त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. आमदार बोरकर यांना सामान्य कार्यकर्त्यांना न दुखावता पक्ष आपल्या हातात घ्यायचा आहे आणि त्यांना सोबत घेऊन पुढे जायचे आहे. त्यामुळेच त्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्यांत सुरू आहे. ∙∙∙
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यासमोर काँग्रेसचे आमदार फुटतात, ही छबी पुसण्याचे मोठे आव्हान आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांनंतर मिळून पक्षाचे १८ आमदार फुटले आहेत. या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठीची कायदेशीर लढाई चोडणकर सर्वोच्च न्यायालयात लढत आहेतच. असे असले तरी काँग्रेसचे आमदार यापुढे फुटणार नाहीत, हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करणे त्यांच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. स्पष्ट बहुमताचे काँग्रेस सरकार सत्तेत आले, तर आमदार फुटण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, असे चोडणकर यांना वाटते. त्यामुळे त्यांनी आता सरकार स्थापनेचे लक्ष्य समोर ठेवले आहे. प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी काही संयोजकांची तत्काळ निवडही केली. त्यामुळे ते सध्या पूर्णपणे ‘ॲक्शन मोड’मध्ये असल्याचे दिसून येत आहे. ∙∙∙
माजी खासदार फ्रांसिस सार्दिन हे अत्यंत अनुभवी राजकारणी. काँग्रेस पक्षाने राज्य समितीत जे बदल केले, त्यात त्यांना समन्वय समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. हे पद देताना त्यांना सांगण्यात किंवा विचारण्यात आले नव्हते. मात्र, काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत सैनिक म्हणून आपण हे पद स्वीकारत असून गोव्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटले. जो कोणी अध्यक्ष असेल, त्यांचे ऐकणे हे आमचे कर्तव्य आहे. पण त्याचबरोबर आम्ही ‘गणसाबैल’ नाहीत. ते सांगतील ते ऐकून केवळ मान हलवण्यासाठी आम्ही नाही. आम्हालाही आमची मते आणि विचार आहेत. आम्हाला निवडणुका कशा जिंकता येतात, हे ठाऊक आहेत. तसेच काँग्रेस पक्षाला नेमके काय पाहिजे, याचीही आम्हाला जाण आहे. त्यामुळे आम्ही आमचे विचार पक्षाच्या योग्य मंचावर मांडणार, असेही फ्रान्सिस यांनी म्हटले. जेव्हा ते खासदार होते, तेव्हा ते अशाप्रकारे बोलत नसत. अमित पाटकर अध्यक्ष असतानाही आणि खासदारकी गेल्यानंतरही त्यांनी मौन धारण केले होते. आता अकस्मात त्यांना कंठ फुटला आहे. त्याचा फायदा पक्षाला व्हावा, अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांना आहे. ∙∙∙
अध्यक्ष बदलला की पदाधिकारी बदलतात, हे प्रत्येक पक्षात घडतच असते. प्रदेश काँग्रेसमध्येही आता तेच सुरू झाले आहे. गत विधानसभा निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बनलेल्या अमित पाटकर यांनी आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांना विविध गटांच्या प्रमुख पदांवर बसवले होते. आता पुन्हा अध्यक्ष बनताच गिरीश चोडणकर यांनीही पक्षाची गरज ओळखून विश्वासू पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका महत्त्वाच्या ठिकाणी करण्यास सुरुवात केलेली आहे. पाटकर अध्यक्ष झाल्यानंतर वरद म्हार्दोळकर, जना भंडारी, खेमलो सावंत, विजय भिके अशा काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे पाठ फिरवली होती. आता गिरीश पुन्हा आल्याने हे सर्व कार्यकर्ते सक्रिय होणार असल्याचे बोलले जात आहे. ∙∙∙
मंत्रिमंडळातील एका रिक्त जागेवर कोणाची निवड होणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे. कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी २०२७ पूर्वी आपण मंत्री होण्याची शक्यता स्वतःच फेटाळून लावली आहे. त्यामुळे शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांचे नाव या पदासाठी घेतले जाऊ लागले आहे. सध्या ‘नारीवंदन’ हा विषय ऐरणीवर आला असल्याने दिलायला यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. तशी शक्यता आहे का, यावर त्यांनी ‘आपल्याला काही ठाऊक नाही,’ असे उत्तर दिले. मात्र, मंत्रिपद स्वीकारण्याची तयारी आहे का, यावर “कोण तयार नाही? ते सांगा...” असे म्हणत त्यांनी बरेच काही सांगितले आणि तोच चर्चेचा विषय ठरला आहे. ∙∙∙
नावात काय आहे, असे शेक्सपियर म्हणून गेले. मात्र, नावातच सर्व काही असते, असेही अनेकदा वाटते. हे नामपुराण सांगण्याचे कारण म्हणजे शनिवारी अखिल भारतीय कोकणी साहित्य आणि संस्कृती संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात घडलेला एक मजेशीर किस्सा. त्याचे झाले असे की, या उद्घाटन कार्यक्रमात वालंका आलेमाव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांची नावे घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी ग्लोबल रोमी लिपी अभियानचे अध्यक्ष केनेडी आफांसो यांचा उल्लेख करताना त्यांनी चुकून ‘केनेडी आलेमाव’ असा उच्चार केला. वालंका यांच्या सर्वांत धाकट्या काकांचे नावही केनेडी असल्याने बोलण्याच्या ओघात त्यांच्याकडून ही गफलत झाली असावी. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या केनेडी आफांसो यांनाही हसू आवरले नाही. काही क्षणांनी आपली चूक वालंका मॅडम यांच्या लक्षात आली आणि त्यांनी हसतच परिस्थिती सावरली. त्यानंतर त्यांनी आपले भाषण थोडक्यात आटोपते घेतले. ∙∙∙
भाजपच्या संघटनात्मक कामासाठी प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक राज्यभर दौरे करत असतात. मंडळ पातळीवरील बैठका असोत किंवा जिल्हा पातळीवरील प्रशिक्षण वर्ग, तसेच राज्य पातळीवरील मतदारसंघ प्रभारींच्या बैठका असोत, दामोदर नाईक यांची उपस्थिती हमखास असते. या सर्व धावपळीत ते पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’ सर्वांनी ऐकावी, असा भाजपचा आग्रह असतो. त्याला प्रदेशाध्यक्षही अपवाद नाहीत. रविवारी डिसोलीच्या दौऱ्यावर असलेल्या नाईक यांनी
उपलब्ध असलेल्या एका हॉटेलमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम ऐकला आणि त्यातून मिळालेला संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविला. तसेच नुकत्याच झालेल्या गाभा समितीच्या बैठकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ‘मन की बात’ नियमितपणे ऐकावी, अशा सूचनाही देण्यात आल्या
होत्या. ∙∙∙
वेळ्ळीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी दोन दिवसांपूर्वी आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी त्यांनी बाणावली मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्धार जाहीर केला. मात्र, ते नेमके कोणत्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार, हे अद्याप स्पष्ट करीत नाहीत. ज्या अर्थी ते सरकारी योजनांचा आपल्या गावात प्रसार करीत आहेत, ते पाहता त्यांना सत्ताधारी पक्षाची उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा आहे. डिक्सनबाबांना २०२२ मध्ये विद्यमान प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेसची उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. दिगंबर कामत यांनीही त्यांना बाणावलीतून निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यावेळी त्यांची तयारी नव्हती. आता मात्र त्यांनी तयारी पूर्ण केल्याचे दिसते. गिरीशबाबही आता प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. त्यामुळे डिक्सनबाबांना काँग्रेसचे तिकीट मिळते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे! ∙∙∙
‘शालजोडे मारणे’ या वाक्प्रचाराचा खरा आणि बरा अर्थ गोव्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व वकील राधाराव ग्रासियस यांना चांगलाच माहीत असणार. काँग्रेस ‘हाय कमांड’ने गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांची उचलबांगडी करून गिरीश चोडणकर यांची नेमणूक केल्यावर राज्यात सध्या हाच चर्चेचा मुद्दा बनला. समाज माध्यमावर गिरीश चोडणकर यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक झाल्यामुळे समर्थनास व विरोधात पोस्ट व्हायरल व्हायला लागल्या आहेत. मात्र, ॲड. राधाराव ग्रासियस यांनी टाकलेल्या एका वाक्याच्या ‘पोस्ट’वर मोठी चर्चा रंगली. ‘इलेक्शन क्लोजिंग इन. काँग्रेस अपॉईंट सेल्स ऑफिसर’ हीच ती पोस्ट. या पोस्टमुळे काँग्रेस हायकमांड व गिरीश चोडणकर ट्रोल होत आहेत. एका नेटीझनने काँग्रेस पक्षातून फुटून भाजपात गेलेल्या तत्कालीन काँग्रेस आमदारांचे फोटो टाकून, ‘२०२७ साली किती व कोण कोण?’ अशी कोटी केली आहे. आता पुन्हा निवडणूक जवळ आली आहे. पुन्हा किती आमदार फुटणार, असा प्रश्न नेटीझन करीत आहेत. त्यात राधाराव यांनी काँग्रेसने सेल्स अधिकारी नेमलाय, असे मत व्यक्त करून आग आणखी भडकावली. ∙∙∙
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाशी असलेली दृढ नाळ गोव्याने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. रविवारी प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला बहुसंख्य घरांतून उदंड प्रतिसाद लाभला. सकाळी ११ वाजता कुणाच्या नजरा टीव्हीवर खिळल्या, तर कुणाचे कान लागले होते रेडिओकडे. म्हणे, गोव्यातील ३२ हजारांहून अधिक नागरिकांनी हा कार्यक्रम ऐकला. १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये १०० टक्के बूथ कव्हरेजची नोंद झाली. गावागावांतून, शहरांमधून नागरिक एकत्र आले. नवकल्पना व लोकसहभागाच्या प्रेरणादायी कथा त्यांनी ऐकल्या. भाजपने खास ‘एक्स’वर तशी पोस्टही केलीय. भाजपचे तळागाळातील कुशल संघटन कौशल्य व बांधीलकीचे याहून आणखी कोणते मोठे उदाहरण हवे? विरोधातील पक्ष ह्यातून काही शिकतील का? ∙∙∙
मंत्री सुभाष फळदेसाई हे लढाऊ बाण्याचे राजकारणी. सांगेसारख्या मतदारसंघात युरी आलेमावसारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव करून सुभाष पहिल्या वेळी आमदार बनले. नंतरच्या निवडणुकीत त्यांना प्रसाद गावकरांकडून हार स्वीकारावी लागली. मात्र, पराभवाने खचून न जाता सुभाष पुन्हा उभे राहिले व जिंकले. उपसभापती व मंत्री बनले. आता सुभाष यांचा सांगे मतदारसंघ एसटीसाठी आरक्षित होणार असल्यामुळे सुभाष हे दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात आहेत. त्यांना जवळचा मतदारसंघ म्हणजे कुंकळळी. फळदेसाई यांनी आता कुंकळळीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी कुंकळळीत असलेल्या ‘एनआयटी’ला भेट देऊन किती स्थानिक नोकरीला आहेत, त्याचा आढावा घेतला. ‘एनआयटी’ संस्थेत स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याने सुभाष यांनी संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी ‘एनआयटी’त किती स्थानिकांना नोकरी मिळाली, त्याची चौकशी करावी व ऑडिट करून स्थानिकांना न्यायहक्क मिळवून द्यावा, अशी मागणी सुभाष यांनी केली आहे. सुभाष फळदेसाई यांच्या या प्रयत्नाचे कुंकळळीकरांनी प्रशंसा केली असून सुभाष हळूहळू कुंकळळीत सक्रिय होत आहेत. ∙∙∙
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौरे कमी करण्याचे आवाहन केल्यामुळे पर्यटन खात्यातील सतत दौऱ्यांवर जाणाऱ्यांना हा मोठा धक्का असल्याची चर्चा खात्यात सुरू आहे. कारण, विदेश दौऱ्यांदरम्यान गोव्यातील पर्यटनाविषयी माहिती देण्यासाठी तसेच तेथील नागरिकांना गोव्यात पर्यटनासाठी आकर्षित करण्याच्या उद्देशाने विविध महोत्सवांमध्ये गोव्याचे स्टॉल उभारणे आणि इतर उपक्रम राबविण्यासाठी पर्यटन खात्यातील काही मोजक्या मंडळींचे पथक नियमितपणे जात असे. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनामुळे आता पर्यटन खात्यातील या चमूच्या आशा-आकांक्षांना लगाम बसल्याची चर्चा आहे. परदेश दौऱ्यांची पाहिलेली काहींची स्वप्ने जणू या निर्णयामुळे भंग पावली आहेत, असे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून जाणवत आहे. या दौऱ्यांवर निर्बंध आलेच, तर सरकारचे कोट्यवधी रुपये वाचतील, अशी कुजबुजही खात्यातील काही कर्मचारी हळूच करीत आहेत. ∙∙∙
‘कष्ट्याक पेज आणि मागत्याक शीत’ अशी कोंकणीत म्हण आहे. स्थानिक राष्ट्रवादी कुंकळळीकरांनी भारतातील हुशार मुलांच्या हितासाठी आपली सुपीक जमीन सरकारला चण्याच्या भावाने दिली. स्थानिकांनी दिलेल्या जमिनीवर सरकारने भव्य अशी ‘एनआयटी’ उभी केली. या संस्थेत देशातील हजारो विद्यार्थी उच्च शिक्षण घेतात. या संस्थेत स्थानिकांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, या संस्थेत केवळ जोडप्यांनाच नोकरी मिळते काय? असा प्रश्न स्थानिकांनाच नव्हे तर सरकारमधील मंत्र्यांनाही पडला आहे. या संस्थेत एक आणि दोन नव्हे तर अनेक जोडपी, म्हणजे पती व पत्नी, काम करतात हे उघड झाले आहे. मोठमोठ्या प्राध्यापकांनी व उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या पत्नींना या संस्थेत लहान-मोठ्या नोकऱ्या दिल्या आहेत. एवढेच नव्हे, सुरक्षा रक्षकांपासून स्वच्छता कर्मचारीही बाहेरील आहेत. कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाड्याही बाहेरील राज्यांतून आणल्या आहेत. या संस्थेत गुणवत्तेवर नोकऱ्या दिल्या जातात, असे सांगितले जाते. मग पती व पत्नी दोघांनाही नोकरी कशी मिळते, हे कोडे मात्र समजण्यापलीकडचे नाही का? ∙∙∙
आदिवासी समाजातील सर्व नेते एकत्र आल्यानंतर त्याचे पडसाद आता अन्य समाजांमध्येही उमटू लागले आहेत. आदिवासी नेते एकत्र येऊ शकतात, तर भंडारी समाजाचे नेते एकत्र का येऊ शकत नाहीत, अशी चर्चा समाजात सुरू झाली आहे. समाजाच्या एकीकरणाच्या आड नेमके कोणते अडथळे आहेत, याविषयीही विचारविनिमय सुरू झाला आहे. वीरेश बोरकर यांना शनिवारी आरजीपीच्या कार्यालयात मिळालेल्या वागणुकीबद्दलही काही भंडारी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. भंडारी समाज संघटित झाला, तर आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, अशी भावना त्यांच्यामध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे आता समाजाच्या संघटनासाठी काहीजण गांभीर्याने प्रयत्न करतील, असे दिसत आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.