

Kosovo Parliament Uproar Egg Throwing Incident: युरोपमधील कोसोव्हो देशाच्या संसदेत शनिवारी तुफान राडा पाहायला मिळाला. संसदेचे कामकाज सुरु असताना विरोधी पक्षाच्या एका महिला खासदाराने थेट सभागृहात जाऊन कार्यवाहक पंतप्रधान अल्बिन कुर्ती यांच्यावर अंडी भिरकावली. 7 जून रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अल्बिन कुर्ती यांचा 'वेतेव्हेंदोस्जे' (Vetevendosje) हा पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी विरोधी पक्षांशी तडजोड करण्याचा प्रयत्न करत असतानाच ही धक्कादायक घटना घडली. 120 सदस्यांच्या संसदेत कुर्ती यांच्या पक्षाने 53 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले, परंतु सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणारे स्पष्ट बहुमत त्यांच्याकडे नाही.
'अलायन्स फॉर द फ्युचर ऑफ कोसोव्हो' (AAK) या विरोधी पक्षाच्या खासदार टाईम काद्रियाज (Time Kadrijaj) यांनी पहिल्या रांगेत बसलेल्या पंतप्रधानांकडे धाव घेत त्यांच्यावर अंडी फेकली आणि "तुम्हाला लाज वाटली पाहिजे!" अशी ओरड केली. या घटनेनंतर सुरक्षा रक्षक आणि इतर खासदारांनी तातडीने हस्तक्षेप केला, तर सभापतींनी थेट प्रक्षेपण थांबवून संसदेचे कामकाज स्थगित केले. या हल्ल्यानंतरही कार्यवाहक पंतप्रधान अल्बिन कुर्ती विचलीत झाले नाहीत. राजकीय संवाद जिवंत ठेवण्यासाठी जर माझ्यावर अंडी फेकली जाणे हीच किंमत असेल, तर मी ती मोजायला तयार आहे, अशी शांत प्रतिक्रिया त्यांनी दिली.
कोसोव्हो सध्या तीव्र राजकीय अस्थिरतेचा सामना करत असून गेल्या दोन वर्षांत तिथे तब्बल तीनदा सार्वत्रिक निवडणुका झाल्या आहेत. 7 जून रोजी झालेली निवडणूक ही निर्धारित वेळेत अध्यक्ष निवडण्यात अपयशी ठरल्यामुळेच झाली होती. सध्या कार्यक्षम सरकार चालवण्यासाठी आणि अध्यक्षांची निवड करण्यासाठी कुर्ती यांच्या पक्षाला 18 जागा असलेल्या 'डेमोक्रॅटिक लीग ऑफ कोसोव्हो' (LDK) किंवा 22 जागा असलेल्या 'कोसोव्हो डेमोक्रॅटिक पार्टी' (PDK) च्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र, कुर्ती आणि विरोधी नेत्यांमध्ये सुरु असलेल्या अनेक फेऱ्यांच्या चर्चेनंतरही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
नियमानुसार निवडणुकीच्या (Election) निकालानंतर 30 दिवसांच्या आत सरकार स्थापन होणे बंधनकारक असते. ती मुदत आधीच संपली असून, आता नवीन राष्ट्रपतींच्या निवडीसाठी असलेली दोन महिन्यांची मुदतही जवळ येत आहे. या निश्चित कालावधीत राष्ट्रपतींची निवड न झाल्यास कोसोव्होमध्ये पुन्हा एकदा नव्याने संसदीय निवडणुक घेण्याची वेळ येऊ शकते, ज्यामुळे देशातील राजकीय अनिश्चितता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.