Goa Politics Khari Khujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; एका वाक्याने सरकार सावध?

Goa Politics Khari Khujbuj: फोंडा पोटनिवडणूक आता पुढील महिन्यात होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आपापल्या उमेदवाराचा शोध सध्या सुरू ठेवला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

एका वाक्याने सरकार सावध?

निवृत्त न्या. फर्दीन रिबेलो यांनी काही दिवसांपूर्वीच “गरज पडली तर आम्ही कॅसिनोविरोधात न्यायालयात जाऊ,” असे सूचक वक्तव्य केले होते आणि योगायोग असा की बुधवारी मुख्यमंत्र्यांनीही लगेच “मांडवीत आणखी कॅसिनो देणार नाही,” असे स्पष्ट करून टाकले. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आता मिश्कील चर्चा रंगू लागली आहे, सरकार एका वाक्यालाच घाबरले काय? कायदा आणि न्यायालयीन प्रक्रियेचे उत्तम ज्ञान असलेली व्यक्ती जर या रिंगणात उतरली, तर सरकारला स्वतःचे निर्णय सिद्ध करताना चांगलीच कसरत करावी लागू शकते, असे टोमणेही काही कार्यकर्ते मारताना दिसत आहेत. “रिबेलो जर याचिका दाखल करतील, तर ती नुसती भावनेतून नाही, तर कायद्याचा पूर्ण अभ्यास करूनच असेल,” असेही बोलले जात आहे. म्हणूनच सरकारने आधीच सावध पाऊल टाकत मांडवीतील नव्या कॅसिनोंना ब्रेक लावला का? असा सवालही कानोकानी फिरू लागला आहे. काहीही असो, पण रिबेलो यांच्या एका विधानाने सामाजिक कार्यकर्त्यांना नवसंजीवनी मिळाली, इतके मात्र खरे. आता पुढे न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातात, की ही चर्चा तशीच विरते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

फोंड्यात दादाचा काय इरादा!

फोंडा पोटनिवडणूक आता पुढील महिन्यात होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आपापल्या उमेदवाराचा शोध सध्या सुरू ठेवला आहे. काँग्रेससमोर राजेश की केतन तर भाजपसमोर रितेश की अपूर्व असे पर्याय आहेत. ‘आप’वाल्यांनीही फोंड्याचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांना उमेदवारीची गळ घातली होती, मात्र दादाने अजून आपला इरादा स्पष्ट केलेला नाही. कदाचित आपण स्वतंत्र उमेदवारी दाखल करू असेही दादाने सांगितले आहे. भंडारी समाजाची एकगठ्ठा मते असलेल्या दादाने अजून आपला पवित्रा जाहीर केला नसल्यामुळे इतर राजकीय पक्षांना पाठिंबा देणार की निवडणुकीला सामोरे जाणार, अशीच चर्चा सध्या फोंड्यात सुरू आहे. ∙∙∙

काय ही गोव्याची दशा?

एका व्यक्तीने सरकारी कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचा विडा उचलला. सर्व प्रथम त्याने आरोग्य, टीसीपी, वन खात्याला भेट दिली तर तिथे सर्व सत्तरी, वाळपई, पर्ये येथील जास्तीत जास्त कर्मचारी असल्याचे आढळले. नंतर तर पोलिस, शिक्षण, खात्यात गेले तर तिथे त्यांना साखळीतील, वीज खात्यामध्ये कुडचडे, मडकई येथील, कला व संस्कृती, क्रीडा खात्यात प्रियोळ व काणकोणातील आढळले. कला व संस्कृती खात्यात तर एक ज्येष्ठ कर्मचारी होती. ती म्हणाली, आपण मडगावची. २००८ दरम्यान भरती झाली होती, असे त्या व्यक्तीला सांगितले. सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये मडकईतील जास्त कर्मचारी दिसले. एका अधिकाऱ्याला विचारले, तर काही दिवसांनी या खात्यात मडगावमधील कर्मचारी पहायला मिळतील. वाहतूक, पंचायत खात्यात सांकवाळ, झुवारीनगर येथील जास्त कर्मचारी. हे पाहून त्या व्यक्तीला आश्र्चर्य वाटले खरे! पण शेवटी त्याने निष्कर्ष काढला, की ज्या मतदारसंघातील आमदार, मंत्री त्याच खात्यात त्या मतदारसंघातील कर्मचारी. काय ही गोव्याची दशा? असे म्हणत त्याने कपाळावर हात मारला.

तिकिटासाठी मोर्चेबांधणी!

सध्या नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. आपणास सत्ताधारी गटाचे तिकीट मिळावे, यासाठी अनेकजण देव पाण्यात घालून बसलेत. म्हापसा नगरपालिका क्षेत्रही याला अपवाद नाही! सध्या येथील काही प्रभागांत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांनी म्हणे सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या उंबरठ्यांचे माप घेणे सुरू केले आहे. एका बड्या लोकप्रतिनिधीच्या घराजवळील प्रभागात म्हणे तिकिटासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. येथे विद्यमान नगरसेवक आणि एक नवा इच्छुक उमेदवार समोरासमोर उभे ठाकलेत. गेल्या निवडणुकीत याच इच्छुकाने माघार घेत, विद्यमान नगरसेवकाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे किमान यंदाच्या निवडणुकीत विद्यमान नगरसेवकाने आपणास सहकार्य करावे आणि स्वतः माघार घ्यावी, अशी या इच्छुकाची अपेक्षा आहे. मात्र, आता राजकीय मैदानात कोण थांबणार आणि घरचा रस्ता कोण धरणार! किंबहुना लोकप्रतिनिधी नेमकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घालतो, हे पाहावे लागेल.

आझाद मैदान पुन्हा गजबजणार?

आझाद मैदान, पणजी येथे काही दिवसांपूर्वी आमदार वीरेश बोरकर यांच्या आमरण उपोषणानंतर मैदान शांत झाले. मैदान तर आता रिकामेच पडले, थोडे पोरके झाले आहे, अशी चर्चा नंतर सुरू झाली आहे. पण या शांततेला फार दिवस टिकू देण्याच्या मनःस्थितीत आंदोलनकर्ते दिसत नाहीत, अशीही चर्चा आहे. कारण, मीराबाग येथे सुरू असलेले आंदोलन लवकरच आझाद मैदानावर हलवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे विधानसभा अधिवेशन सुरू असताना किंवा त्याच काळात हे आंदोलन पणजीत आले, तर राजधानीत पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाचे चित्र पाहायला मिळू शकतो. सरकारच्या काही निर्णयांविरोधात आधीच नाराजीचा सूर उमटत असल्याने लोक पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील का? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे आझाद मैदान पुन्हा एकदा घोषणांनी दुमदुमणार का? की ही सगळी चर्चा फक्त चर्चाच ठरणार. हे मात्र येणारा काळच ठरवेल.

गोमेकॉत ‘कटांदर’

काही दिवसांपूर्वी मोपा विमानतळाच्‍या बाहेर गवा रेडा अवतरल्‍याने प्रवाशांच्‍या पाचावर धारण बसली होती. अशाच प्रकारचा आणखी एक आगंतुक काही दिवसांपूर्वी गोवा मेडिकल कॉलेजच्‍या चक्‍क ऑपरेशन थिएटरजवळ दिसली. कोकणी भाषेत ज्‍याला ‘कटानर’ (काटमांजर) म्‍हणून ओळखले जाते, तो प्राणी गोमेकॉच्‍या ऑपरेशन थिएटरजवळ फिरताना दिसला. आता गोमेकॉच्‍या मागे दाट झाडी असून पूर्वी तो जंगलाचा भाग होता, हे जरी खरे असले तरी आता जंगली प्राणीही गोमेकॉत आत शिरायला लागले तर काय बरे होणार? या संदर्भातील एक व्‍हिडिओ सध्‍या भलताच व्‍हायरल झालेला आहे.

होलीके रंग रितेश के संग!

फोंड्यात होळीनिमित्त विविध राजकीय नेत्यांनी रंगोत्सवाचे आयोजन केले होते. या रंगोत्सवात मात्र रितेशच्या आयोजनाची चर्चा सुरू आहे. रवी पुत्र रितेश नाईक यांनी सनग्रेसमध्ये भव्य रंगोत्सवाचे आयोजन केले होते, आणि या रंगोत्सवाला बहुतांश फोंड्यातील नागरिकच सहभागी झाले होते. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात रंगोत्सवात फोंडेकर सहभागी झाल्यामुळे रितेशच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आले असणार हे नक्की. त्यामुळे आनंदाच्या भरात होली के रंग आपके संग...असे म्हणत या कार्यकर्त्यांनी म्हणे मोठी धूम केली.

यूजीसी कायद्याबाबत विद्यार्थी गप्प का?

राज्यातील विद्यार्थी शक्ती आता शीण बनली असून अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती आजच्या विद्यार्थ्यांत नाही का? असा प्रश्न राज्यातील विद्यार्थ्यांना पाहिल्यावर पडतो. एक काळ होता. विद्यार्थी सरकार विरोधात रस्त्यावर उतरत होते. आज विद्यार्थ्यांना बस प्रवासात जी अर्धी तिकीट सुविधा आहे, ती विद्यार्थ्यांनी आंदोलन करून मिळवून घेतली होती. त्या काळात विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने यशस्वीपणे लढली. राजकारण्यांना अद्दल घडविली. दुर्दैवाने आजच्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थी संघटनांना आपल्या समस्या सोडविण्यासाठी राजकारण्याचे पाय धरावे लागतात. संपूर्ण देशात सध्या युजीसीच्या नव्या नियमावरून वादंग सुरू झालेले आहे. आपल्या गोव्यातील महाविद्यालयीन व विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जगात नव्या यूजीसी कायद्याची माहितीही नाही. विद्यार्थ्यांना आपल्या हक्कासाठी लढा देण्याची धमक असायलाच हवी. आपला विद्यार्थी सुस्त बनलाय ही चिंता सगळ्यांनाच सतावत आहे.

टॅंकर का सर्रास उलटतात?

मंगळवारी दुपारी मडगाव-पोळे महामार्गावर पाडी येथे गॅस टॅंकर उलटला आणि दक्षिण गोव्यातील महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दोन दिवसापूर्वी असाच एक टॅंकर उलटून अशीच अवस्था झाली होती. पण नेहमीच्या या प्रकाराने या मार्गावरील प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. सरकारी यंत्रणेने जरी वाहतूक बेतूल -आगोंद मार्गे वळविली असली तरी तो रस्ता अशा प्रचंड वाहतुकीसाठी योग्य नाही. पण मुद्दा तो नाही, तर नेमके टॅंकरच या महामार्गावर का उलटतात, अशी विचारणा आता अशा अपघातांची झळ बसणारे विचारू लागले आहेत. पाडी ते करमल घाट या टप्प्यातच असे अपघात पूर्वी पावसाळ्यांत होत होते. पावसामुळे रस्ते निसरडे होतात व ते अपघात होतात, असे मानले जात होते, पण आता उन्हाळ्यातही ते होऊ लागले आहेत. त्यामुळे ते सदोष रस्ता इंजिनियरींगमुळे की चालकांच्या बेदरकारीमुळे असे प्रश्नही केले जात आहेत. पूर्वी रेल्वेमार्गे असे टॅंकर नेण्याचाही एक प्रस्ताव होता, पण तो प्रत्यक्षात आला नाही, त्यामुळे हे अपघात नित्याचेच होत असल्याचे प्रवासी म्हणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mulgao mining: "खाणीवर रात्रपाळी बंद करा, अन्यथा खाण सुरू करू देणार नाही!" मुळगावात ग्रामस्थांचा एल्गार

Mankurad Mango Price: म्हापसा बाजारात मानकुरादची 'शाही' एन्ट्री; एक डझन आंब्यासाठी मोजावे लागतायेत 'एवढे' रुपये

मांडवीत मोठा कॅसिनो येणार नाही, विरोधकांकडून जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न; CM प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण

Gold, Silver Price: सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, इराण युद्धाचा परिणाम; सुवर्ण बाजारात अस्थिरतेचे वातावरण

Goa Politics: पणजी, फोंडा निवडणुकीवर भाजपने ठरविली रणनीती! गाभा समितीची बैठक, संघटनात्मक हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT