Goa Chess Association Election
Goa Chess Association Election  Dainik Gomantak
गोवा

Goa Chess Association Election : खासदार तेंडुलकर यांची प्रतिष्ठा पणाला; अध्यक्षपदासह पाच जागांसाठी आज मतदान

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Chess Association Election : गोवा बुद्धिबळ संघटनेतील सध्याची स्थिती पाहता, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी रविवारी (ता. ९) होणारी कार्यकारी समिती निवडणूक खूपच प्रतिष्ठेची असेल. संलग्न १२ तालुका बुद्धिबळ संघटनेतील सात संघटना अखेरपर्यंत एकसंध राहिल्यास तेंडुलकर व त्यांच्या गटासाठी जिंकणे कठीण ठरू शकते. निवडणुकीत प्रत्येक तालुक्याचे दोन प्रतिनिधी मतदान करतील.

बुद्धिबळ संघटनेच्या कार्यकारी समितीत एकूण १२ सदस्य आहेत, त्यापैकी सात पदाधिकारी ऑगस्ट २०२१ मधील निवडणूक प्रक्रियेत बिनविरोध ठरले होते. त्यानंतर अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि दक्षिण गोवा संयुक्त सचिवपदाच्या दोन जागांवरील उमेदवार बिनविरोध असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर केले होते व संपूर्ण कार्यकारी समिती बिनविरोध असल्याचे घोषित केले होते.

गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेतील पाच पदाधिकाऱ्यांच्या बिनविरोध निवडीस आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नैतिकता आयोगाकडे वर्ग केले होते. या प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर १९ ऑक्टोबर २०२१ रोजी बुद्धिबळ महासंघाच्या नैतिकता आयोगाने पाच पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड रद्दबातल ठरवून या जागांसाठी निवडणूक घेण्याचा आदेश दिला होता. १४ डिसेंबर २०२१ रोजी बुद्धिबळ महासंघाच्या अपील मंडळाने त्यावर शिक्कामोर्तब केले. त्याविरोधात नवी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. २ जून २०२३ रोजी न्यायालयाने आदेशान्वये नैतिकता आयोगाचा निर्णय कायम राखला, तसेच याचिका फेटाळली.

न्यायालयाच्या आदेशानंतर अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अंतरिम सचिवाने १६ जून रोजी निवडणुकीसंदर्भात पत्र दिले. त्यानंतर गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीसंदर्भात उपलब्ध दस्तऐवजांची माहिती घेतल्यानंतर, गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीच्या अहवालानुसार गोवा बुद्धिबळ संघटनेचे निवडणूक पीठासीन अधिकारी प्रभाकर तिंबले यांनी निवडणूक घेण्यासाठी कार्यक्रम निश्चित केला. रविवारी (ता. ९) पणजीत सकाळी साडेदहा ते दुपारी बारा या कालावधीत निवडणूक प्रक्रिया होईल. त्यानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल.

तेंडुलकर यांच्यासमोर कांदोळकरांचे आव्हान

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विनय तेंडुलकर (धारबांदोडा तालुका) यांच्यासमोर तिसवाडीचे महेश कांदोळकर यांचे आव्हान आहे. सचिवपदासाठी सासष्टीचे आशेष केणी व काणकोणचे शरेंद्र नाईक, खजिनदार पदासाठी बार्देशचे विश्वास पिळर्णकर व मुरगावचे किशोर बांदेकर यांच्यात लढत होईल. दक्षिण गोवा दोन संयुक्त सचिव पदासाठी समीर नाईक (केपे), किशोर गावस देसाई (सांगे) व अमोघ नमशीकर (फोंडा) असे तीन उमेदवार रिंगणात आहेत. कांदोळकर, केणी, पिळर्णकर, नमशीकर यांना अगोदरच्या निवडणूक प्रक्रियेवेळी सात तालुका संघटनांचे पाठबळ होते, तर तेंडुलकर, शरेंद्र, बांदेकर, समीर व गावस देसाई हे प्रतिस्पर्धी गटाचे आहेत. प्राप्त माहितीनुसार, सध्या सात तालुका संघटना विरुद्ध पाच तालुका संघटना असे एकंदरीत चित्र आहे.

चार अर्ज नाकारल्याने वाद

ऑगस्ट २०२१ मधील निवडणूक प्रक्रियेतील निवडणूक अधिकाऱ्याने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष पदासाठी महेश कांदोळकर (तिसवाडी), सचिव पदासाठी आशेष केणी (सासष्टी), खजिनदार पदासाठी विश्वास पिळर्णकर (बार्देश) व संयुक्त सचिव पदासाठी (दक्षिण गोवा) अमोघ नमशीकर (फोंडा) यांचे अर्ज नाकारले होते आणि अध्यक्षपदी विनय तेंडुलकर, सचिवपदी शरेंद्र नाईक, खजिनदारपदी किशोर बांदेकर, संयुक्त सचिवपदी (दक्षिण गोवा) समीर नाईक व किशोर गावस देसाई यांना बिनविरोध घोषित केले होते. त्यामुळे वाद झाला व त्याविरोधात दाद मागण्यात आली.

सात जागा बिनविरोध

ऑगस्ट २०२१ मधील निवडणूक प्रक्रियेनुसार गोवा बुद्धिबळ संघटनेच्या कार्यकारी समितीतील सात जागा बिनविरोध ठरल्या होत्या. यामध्ये दोन उपाध्यक्ष (उत्तर गोवा) अरविंद म्हामल (तिसवाडी) व सत्यवान हरमलकर (डिचोली), दोन उपाध्यक्ष (दक्षिण गोवा) दामोदर जांबावलीकर (सासष्टी) व सागर साकोर्डेकर (फोंडा), संयुक्त खजिनदार रामचंद्र परब (बार्देश), दोन संयुक्त सचिव (उत्तर गोवा) ॲड. तुकाराम शेट्ये (पेडणे) व कालिदास हरवळकर (सत्तरी) या पदांचे उमेदवार बिनविरोध ठरले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT