Goa Assembly Monsoon Session : सरकारने राज्यातील खाणपट्टे लिलावात काढून खाणी सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, पिसुर्ले-होंडा परिसरातील खाणींमध्ये उच्च दर्जाचा खनिजसाठा असूनही अद्याप येथील एकही खाणपट्टा लिलावात काढलेला नाही.
यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी पसरली होती. याची दखल घेऊन पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी बुधवारी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल या भागातील स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सरकारने आणखी वेळ न दवडता या भागातील खाणींचा लिलाव करावा, अशी मागणी या भागातील स्थानिकांनी केली आहे.
यासंबंधी आमदार डॉ. दिव्या राणे यांनी विधानसभेत पिसुर्ले व होंडा पंचायत क्षेत्रातील खाणींचा लिलाव करण्याचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केल्याने या भागातील खाणींवर अवलंबून असलेल्या रहिवाशांना आशेचा किरण दिसू लागला आहे.
अनेकांनी ट्रक विकून फेडले बँकांचे कर्ज
पिसुर्ले व होंडा या पंचायत क्षेत्रांतील शेकडो रहिवासी तसेच कामगार खाण व्यवसायावर अवलंबून होते; परंतु खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे त्यांच्यावर संकट कोसळले आहे. काहीजणांनी ट्रक व इतर स्वरूपाची मशिनरी विकून बॅंकेचे कर्ज फेडले.
काही दुकानदारांनी दुकाने बंद केली आहेत. येथील खाण कामगारांनी बेरोजगारीचे चटके सहन केले आहेत. परंतु सरकार या खाणी सुरू करत नसल्याने या भागातील स्थानिक चिंतेत सापडले होते.
आमदार डॉ. दिव्या राणे यांनी विधानसभेत पिसुर्ले व होंडा पंचायत क्षेत्रातील खाणपट्ट्याचा उल्लेख करून लिलाव प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केल्याने या भागातील स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या भागातील खाणी सुरू करून बेरोजगारीत होरपळलेल्या स्थानिकांना दिलासा देण्याची अत्यंत गरज आहे.
देवानंद परब, सरपंच, पिसुर्ले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.