Goa Session Court : पोलिस तपासातील पुराव्यांअभावी पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने ड्रग्जप्रकरणातील संशयित मकसूद अहमद पाटलू याची निर्दोष मुक्तता केली. पुराव्यांमध्ये अनेक विसंगती तसेच त्रुटी असल्याने त्याच्याकडे ड्रग्ज सापडल्याचे सिद्धच होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने निवाडा देताना नोंदविले आहे.
गिरी-म्हापसा येथील ‘ग्रीन पार्क’ हॉटेलच्या मागील बाजूला असलेल्या बसथांब्याजवळ अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पोलिसांनी ३ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या मध्यरात्री ड्रग्जची विक्री करण्यास आलेल्या मकसूद पाटलू याला ५०५ ग्रॅम चरससह ताब्यात घेतले होते.
तसेच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. या आरोपपत्रावरील सुनावणीवेळी संशयिताने दोषी असल्याचे अमान्य केले होते.
पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा खोटा असून, ज्यावेळी हा गुन्हा नोंदविण्यात आला तेव्हा तो थिवी येथे होता असे सांगितले होते.
न्यायालयाने काय निरीक्षण नोंदविले?
ड्रग्जच्या नमुन्यांची तपासणी केलेल्या अधिकाऱ्याने दहा वेगवेगळ्या तुकड्यांची चाचणी केली होती. ही चाचणी १६ जानेवारी २०१४ रोजी केल्याचे अहवालात नमूद केले असताना, न्यायालयात साक्ष देताना ती १७ जानेवारी २०१४ ते २३ जानेवारी २०१४ यादरम्यान केल्याचे सांगितले होते.
जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जचे वजन पिशवीसह ५०५ ग्रॅम होते तर चाचणी केल्यानंतर ते ४८५ ग्रॅम असल्याचे नोंद करण्यात आले होते. त्यामुळे या ड्रग्ज चाचणीत हेराफेरी केल्याची शक्यता नाकारता येत नाही.
तपास अधिकाऱ्याने दिलेल्या साक्षीत संशयित कुठे राहत होता याची माहिती नसल्याचे सांगितले आहे. त्याने ही माहिती त्याला ताब्यात घेतल्यावर उघड केली होती.
तपासकामात अनेक त्रुटी असल्याने सादर केलेल्या पुराव्यांतून संशयिताविरोधातील गुन्हा सिद्ध होत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.