मोरजी : आश्वे-मांद्रे येथील आजोबा मंदिरानजीक ‘दलाल बीच रिसॉर्ट’ या अलिशान कॉटेजीसना गुरुवारी रात्री अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ‘सीआरझेड’चे परवाने नसताना करण्यात आलेली उभारणी बेचिराख झाली. पंचायतीने कॉटेजीस पाडण्याचे आदेश दिले होते; परंतु पंचायत संचालनालयाने त्यास स्थगिती दिली होती, अशी माहिती समोर आली आहे.
‘आलिशान कॉटेजीस मोडण्याचा आम्ही आदेश दिला होता. तथापि, संबंधितांनी त्यास स्थगिती मिळविली. या कॉटेजीसला जोडून बेकायदा रेस्टॉरंट उभारण्यात आले होते. ते सील करण्याचा निर्णय पंचायतीने घेतला होता. कारवाई होण्यापूर्वी आगीचे प्रकरण घडले आहे’, अशी माहिती सरपंच किरण सावंत यांनी दिली.
आग लागल्यानंतर ‘अग्निशमन’चे बंब घटनास्थळी पोहोचण्यास उशिर झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. तोवर वीस कॉटेजीस जळून खाक झाली होती. तत्पूर्वी स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; त्यात यश आले नाही. आग कशामुळे लागली याचा उलगडा होऊ शकला नाही. दरम्यान, घटना घडताना तेथे कुणी नसल्याने जीवीतहानी टळली. काही पर्यटकांनी कॉटेजीस बूक केली होती. पण ते इतरत्र फिरायला गेले होते; तर काहींचे सामान कॉटेजीसमध्ये असल्यामुळे ते काढण्यासाठी कुलपे तोडण्यात आली.
हरकत घेऊनही उल्लंघन
ज्या जागेत कॉटेजीस उभारण्यात आली होती, तेथे शेजारी श्री देव आजोबा मंदिर आहे. तेथेच कॉटेजीस उभारण्यास देवस्थान समितीची हरकत होती. परंतु संबंधित व्यावसायिकाने पंचायतीला, देवस्थानला किंमत न देता सीआरझेडचे उल्लंघन केले होते.
पर्यटकाने सांगितली आपबिती
मुंबईहून आलेल्या सिद्धेश जोगळे या पर्यटकाने सांगितले, मी आजच गोव्यात चार दिवसांसाठी आलो होतो. आज माझा वाढदिवस. आम्ही भोजनासाठी बाजूलाच गेलो होतो, तेव्हा आग आल्याचे आम्हास कळले. आम्ही धावत जाऊन आमचे सामान बाहेर काढले. खूप विदारक अनुभव होता.
उडवाउडविची उत्तरे
मामलेदार घटनास्थळी पोहोचला असता लोकांनी दिलेल्या सूचना त्यांनी धुडकावून लावल्या. या हॉटेलने जेवढ्या खोल्यांसाठी परवानग्या घातल्या, त्यापेक्षा अधिक खोल्या इथे बांधल्या असून त्या देखील तपासा, असे जेव्हा लोकांनी त्यांना सांगितले, तेव्हा त्यांनी ‘ते आम्ही बघू’ असे उडवाउडविचे उत्तर दिले. ‘आता ते काही लगेच, एका रात्रीत परवानगी मिळवू शकत नाही’, असे उत्तर मामलेदारांनी दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.