Baina Fish Market
वास्को: बायणातील मासळी मार्केट इमारत नवी बांधण्याऐवजी त्या मार्केटची दुरुस्ती करून ठिकठिकाणी रस्त्याकडेला बसणाऱ्या मासळी विक्रेत्यांची तेथे सोय करण्याची गरज आहे. मात्र, मार्केटची दुरुस्ती करण्याकडे मुरगाव पालिका लक्ष देण्याऐवजी गेली काही वर्षे फक्त आश्वासनेच देत आहे.
या मार्केटच्या बाहेर रस्त्याकडेला बसणाऱ्या मासे विक्रेत्यांकडून ग्राहक मासे विकत घेत असल्याने मार्केटातील विक्रेत्यांकडे ग्राहक फिरकत नाहीत. त्यामुळे मार्केटमध्ये मासे विक्री करणाऱ्यांना ग्राहकांची वाट पाहावी लागते. प्रत्येक निवडणुकीत बायणातील मासळी मार्केट हा विषय असतो. निवडणूक संपताच तेथील समस्यांकडे लक्ष देण्यास संबंधितांना वेळच नसतो, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
पूर्वी या मार्केटमध्ये भाजी तसेच मासळी विक्रेते होते, परंतु या मार्केट इमारतीच्या दुरुस्तीकडे मुरगाव पालिका लक्ष देत नसल्याने मासळी व भाजी मार्केट इमारतीची पूर्णपणे दुर्दशा झाली आहे. काही भाजी विक्रेत्यांनी आपला व्यवसाय बंद केला, तर एक दोन विक्रेत्यांनी मार्केटच्या बाहेरील मुख्य रस्त्यावरच आपला व्यवसाय सुरू केला आहे. या मार्केटमध्ये पूर्वी सुमारे वीसच्या आसपास मासे विक्रेत्या होत्या, परंतू आता तेथे फक्त दोनच मासे विक्रेत्या आहेत. इतरांनी रस्त्यावर आपला व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या विरोधात मुरगाव पालिका कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे रस्त्याकडेला मासे, भाजी विकणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे.
मुरगाव पालिकेने या मार्केट इमारतीची दुरुस्ती करून बायणातील रस्त्यावर बसणाऱ्या मासे, फळ, भाजी विक्रेत्यांची सोय या मार्केटात केल्यास मुरगाव पालिकेला महसूल मिळण्यास मदत होईल. शिवाय रस्त्यावरील अतिक्रमणे दूर झाल्यास, वाहनचालकांची समस्या दूर होण्यास मदत होईल.
येथील मार्केटात मासे विक्री करण्याऐवजी काही महिला बायणा युथ रिक्रिशनल क्लबसमोरच्या रस्त्याकडेला तसेच जुन्या पॉवर हाऊससमोरच्या रस्त्याकडेला मासे विक्री करीत आहेत. त्यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो. या प्रकरणी मुरगाव पालिका, पोलिस इत्यादींकडे तक्रारी करूनही काहीच कारवाई होत नाही. काहीवेळा मार्केटातील मासे विक्रेत्या व रस्त्याकडेला बसणाऱ्या मासे विक्रेत्यांमध्ये वादावादी, भांडणे होण्याच्या घटनाही घडतात. विशेष म्हणजे या समस्येकडे संबंधित लोकप्रतिनिधीही लक्ष देत नाहीत.
या मार्केटच्या छप्पराची मोडतोड झाल्याने पावसाळ्यात पाणी गळत असल्यामुळे विक्रेत्यांची तसेच ग्राहकांची गैरसोय होते. हे छप्पर दुरुस्त करण्यासंबंधी मुरगाव पालिकेला वारंवार विनंत्या करण्यात आल्या, परंतु मुरगाव पालिका लक्ष देण्यास तयार नाही. या छप्पराची पाहणी केली जाते, परंतु दुरुस्ती करण्याचे नाव घेतले जात नाही. रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्ती मार्केटमध्ये शिरून मासे चोरण्याच्या घटना घडतात. आधीच ग्राहक नाही, त्यात मासे चोरीस जातात. त्यामुळे मासे विक्रेत्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.