Goa Crime: काँग्रेस नेते चोडणकर यांच्या कारची नासधूस; 'ट्विट'वरुन हल्ला झाला असल्याची शक्यता, बजरंग दलाने फेटाळले आरोप
Girish Chodankar Car Vandalism News
मडगाव: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि सध्याचे केंद्रीय काँग्रेस समितीचे सदस्य गिरीश चोडणकर यांच्या कारची नासधूस करण्याचा प्रकार शुक्रवारी (ता.६) सायंकाळी मडगाव येथील होली स्पिरीट चर्चजवळ घडला असून या प्रकरणात हिंदुत्ववादी शक्तींचा हात असण्याची शक्यता चोडणकर यांनी व्यक्त केली आहे.
हिंदुत्ववादी नेते टी. राजा सिंग यांना गोव्यात येण्यासाठी बंदी घालावी, अशी मागणी करणारे ट्विट चाेडणकर यांनी प्रदर्शित केले होते. त्यानंतर अवघ्या काही तासांत त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रकार घडला. शुक्रवारी सायंकाळी चोडणकर हे होली स्पिरीट चर्चमध्ये एका ओळखीच्या व्यक्तीच्या माससाठी गेले असता त्यांनी रस्त्याच्या बाजूला आपली गाडी पार्क करून ठेवली होती. यावेळी गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. याप्रकरणी चोडणकर यांनी रात्री उशिरा फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार दिली असून या प्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविराेधात अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले असावे, असे चोडणकर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सावर्डे-कुडचडे परिसरात शौर्य यात्रेचे आयोजन केले असून यावेळी लोकांना संबोधित करण्यासाठी टी. राजा सिंग या प्रखर हिंदुत्ववादी नेत्याला बोलावण्यात आले आहे. सध्या गोव्यात वेगवेगळे घोटाळे घडत असून लोकांचे लक्ष त्यावरून दुसरीकडे वळविण्यासाठी भाजपने मुद्दामहून टी. राजा सिंग सारख्या जहाल नेत्याला बोलावले आहे. त्यामुळे श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांच्यावर गोव्यात प्रवेश करण्यास जशी बंदी घातली आहे तशीच बंदी टी. राजा सिंग यांच्यावर घालावी, अशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चोडणकर यांनी ट्विटमधून मागणी केली होती.
अमित पाटकर यांच्याकडून निषेध
चोडणकर यांच्या गाडीची नासधूस केल्याच्या घटनेचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी निषेध केला आहे. धार्मिक विध्वंसाच्या विरोधात जे कोण आवाज उठवतात त्यांचा आवाज दडपण्यासाठी केलेला हा प्रकार असा आरोप करून गोव्याच्या पाेलिस महासंचालकांनी याची दखल घेऊन या प्रकरणातील गुन्हेगारांना त्वरित अटक करावी, असे पाटकर यांनी म्हटले आहे.
आमचा घटनेशी संबंधच नाही
काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी त्यांच्या गाडीवरील हल्ल्यामागे बजरंग दलाचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर काही तासांतच त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना बजरंग दलाचे नेते विराज देसाई यांनी शनिवारी चोडणकर कोण आहेत, हेच आम्हाला माहीत नाही. त्यामुळे त्यांच्या गाडीवर आम्ही हल्ला करण्याचा प्रश्नच येत नाही. या हल्ल्याशी आमच्या संघटनेचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.