तापलेल्या तव्यावर काँग्रेसची भाकरी!
गोव्यातील प्रमुख विराेधी पक्ष असूनही मागचा काही काळ अगदी कोमात गेल्यासारखा वागणारा काँग्रेस पक्ष आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर भलताच ॲक्टिव्ह झाला असून काँग्रेसचे कार्यकर्ते आता रस्त्यावरही येऊ लागले आहेत. सध्या देशभरात जे विद्यार्थी आंदोलन सुरू झाले आहे त्याचे पडसाद गोव्यातही उमटले असून, याविषयावरूनही काँग्रेसने लोकभावनावर माेर्चा नेऊन शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात राधाराव ग्रासियस यांनी भाष्य करताना वास्तविक अशाप्रकारची आंदोलने काँग्रेसने करायची गरज होती. मात्र, आता ते काम विद्यार्थी करत आहेत आणि विद्यार्थ्यांनी तापवलेल्या तव्यावर काँग्रेस स्वत:ची भाकरी भाजून घेत आहे, असे म्हटले आहे. यावर काँग्रेसकडून राधावारांना काही प्रत्युत्तर येईल का?
म्हापशात काँग्रेस ‘हाऊसफुल्ल’
म्हापशात एकेकाळी काँग्रेसकडे नेत्यांची उणीव होती; पण आता हवा बदललीय! पक्षात एवढी गर्दी झालीय की, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी स्पर्धकांची रांग दिवसेंदिवस लांबत चालल्यामुळे अंतर्गत चुरस भलतीच वाढली आहे. सध्या म्हापशातून काँग्रेसच्या तिकिटावर डोळा ठेवून असलेली नावे म्हणजेच ॲड. शशांक नार्वेकर, डॉ. प्रतीक्षा खलप, विजय भिके, सुधीर कांदोळकर आणि नव्यानेच पक्षात दाखल झालेले राहुल म्हांबरे. आता या सगळ्यांनाच आमदार व्हायचे आहे. त्यामुळे पक्ष नेमकी कोणाच्या गळ्यात माळ घालतो, हे पाहणे रंजक ठरेल. दुसऱ्या बाजूला, भाजपची अवस्था भलतीच शांत-शांत आहे. उपसभापती जोशुआ डिसोझा सोडल्यास त्यांच्याकडे दुसरा तितका सक्षम चेहराच उरलेला नाही! अर्थात, सामाजिक कार्यकर्ते मयूर सावकार हे आपल्यापरीने भाजपकडून तिकीट पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात, ही गोष्ट वेगळीच!
गाय आणि देवस्थाने!
गाय या प्राण्याला हिंदू धर्मात देवाचा मान आहे. सगळे देव या गायीत वसले आहेत, असा हिंदूंमध्ये समज आहे. त्यामुळे वाऱ्यावर सोडून दिलेल्या गायींना सुरक्षा देण्यासाठी काही संस्था काम करतात आणि अशा संस्थांच्या कामात काही देवस्थानेच विघ्न आणतात. खरे तर अशी कामे देवस्थानानेच करण्याची गरज आहे; पण ते करायचे सोडून अशी कामे करणाऱ्या संस्थांना ते धाक दाखवण्यात धन्यता मानतात, याला म्हणावे तरी काय? स्वतःचा अहंकार कुरवाळीत बसणाऱ्या व्यक्तींच्या हातात जर देवस्थानाचा ताबा गेला तर दुसरे काय होईल म्हणा!
एल्विस गोम्स व्हीलन की हिरो?
‘कधी कधी करायला गेलो एक आणि झाले भलतेच,’ असा अनुभव येतो. काँग्रेस पक्षाचे नेते व स्वतःला जनतेचा उमेदवार म्हणून घोषित केलेले एल्विस गोम्स आता कुंकळ्ळीत बरेच सक्रिय झाल्याचे पहायला मिळते. एल्विसबाब कुंकळ्ळीचे विषय घेऊन सरकारशी व प्रशासनाशी लढा द्यायला अग्रेसर राहायला लागले आहेत. मात्र, एल्विस आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. राजकीय जाणकार व ज्येष्ठ वकील राधाराव ग्रासियस यांनी एल्विस गोम्स हे काँग्रेस पक्षाचे ‘व्हीलन’ असल्याचे विधान केल्यामुळे एल्विसबाब बरेच संतापले आहेत. आपण जर लोकांचे विषय घेऊन लढा देतो म्हणून ‘व्हीलन’, तर मग ‘हिरो’ कोण? असा प्रतिप्रश्न एल्विस यांनी राधा यांना केला आहे. एल्विस हिरो की व्हीलन? यावर कुंकळ्ळीत चर्चा रंगायला लागली आहे. एल्विसने आपले बिऱ्हाड कुंकळ्ळीत मांडले आहे. त्यांनी आपल्या प्रचारालाही सुरवात केली आहे. आता एल्विस जरी व्हीलन नसले तरी हिरो आहेत की नाहीत, हे निवडणुकीनंतरच कळणार, नाही का?
प्रश्नपत्रिकांचा पहारेकरी!
गोव्यात दरवर्षी दहावीच्या परीक्षा होतात. प्रश्नपत्रिका गावोगावी, शाळाशाळांत पोहोचतात; पण त्या वाटेत ‘फुटल्या’ अशी बातमी क्वचितच ऐकायला मिळते. दुसरीकडे देशपातळीवरील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा मात्र पेपरफुटीच्या चर्चेत सापडतात. त्यामुळे काही मिश्कील मंडळी आता हळूच विचारू लागली आहे की, ‘गोव्याच्या दहावीच्या प्रश्नपत्रिकेची सुरक्षा देशातील मोठ्या परीक्षांपेक्षाही कडक आहे की काय?’ अर्थात हा प्रश्न उत्तरापेक्षा चर्चेसाठीच जास्त रंगत आहे. आता यात नेमके श्रेय कुणाला द्यायचे आणि दोष कुणाला द्यायचा, हे शहाण्यांनी ठरवावे. तोपर्यंत मात्र चहाच्या टपऱ्यांवर एकच चर्चा की, ‘प्रश्नपत्रिकांपेक्षा त्यांचा पहारेकरीच भारी!’
अन् रमेश सर सुखावले...
‘आदिवासी कल्याण व्हिजन डॉक्युमेंट २०३७’च्या निमित्ताने बुधवारी एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद यशस्वीरीत्या पार पडली. त्यानंतर आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ते अगदी प्रसन्न मूडमध्ये होते. समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांचे सहकार्य पाहिजे. झाकली मूठ सव्वा लाखाची, तुम्ही आहात ना पाठीमागे, असे आवाहन त्यांनी करताच उपस्थितांनी त्यांना हात उंचावून पाठिंबा दर्शविला. रमेशसर नक्कीच यावेळी आतून सुखावले. केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे, हा मंत्र आपल्या समाजबांधवांना देण्यात ते यशस्वी ठरले, यात कुणाचेही दुमत नसावे, हे नक्की.
युरींचे जुने सवंगडी गेले लांब?
जग विश्वासावर कायम आहे, असे म्हणतात खरे. मात्र, जेव्हा विश्वासघात होतो, तेव्हा या बोधवाक्यावर संशय यायला लागतो. कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांच्या पुढे त्यांच्याच पक्षाचे एल्विस गोम्स यांनी आव्हान उभे केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युरी आलेमाव यांना स्वतःच्या पक्षाबरोबरच भाजपशी सामना करावा लागणार आहे. अशा स्थितीत युरीचे काही जुने सवंगडी त्यांच्यापासून लांब जात असल्याचे चित्र दिसत आहे. युरी समर्थक काही माजी नगरसेवक आता युरींच्या विरोधात बोलताना दिसतात. युरी आलेमाव यांच्याबरोबर खांद्याला खांदा लाऊन त्यांच्या कामाचे नियोजन करणारे व युरींचे ‘पीआरओ’ म्हणून वावरणारे त्यांचे जवळचे हितचिंतक आता कट्टर विरोधक झाल्याचे पाहायला मिळते. युरी यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांमुळेच हे जुने कार्यकर्ते लांब जायला लागल्याची चर्चा आहे. आता पाहूया युरीबाब त्या कार्यकर्त्यांना पुन्हा जवळ आणू शकतात की नाहीत ते!
अबब... चुकांचा डोंगर!
हलगर्जीपणाने केलेल्या घोडचुकांच्या कारभाराचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ‘एससीईआरटी’ची पाठ्यपुस्तके. रोम एका दिवसात बांधले नव्हते म्हणतात. यांनी ही पुस्तके आदेसात (अर्ध्या दिवसात) बांधली. शब्दागणिक चुका. नको तिथे अनुस्वार, पाहिजे तिथे गायब. वर घुडी, खालच्या ओळीत गुडी. मुद्रित शोधन कशाला लाऊन खातात हे माहीत नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ते हे? निष्काळजीपणाचा कळस म्हणजे काही लेखकांचे धडे घेताना त्या लेखकांना अधिकृतपणे कळवलेले नाही. कॉपीराईटची पर्वा सरकारी ‘एससीईआरटी’ला नाही. धड्यासाठी लेखकाच्या मजकुराचे संपादन, काटछाट केल्यावर त्याला तो धडा न दाखवण्याच्या मग्रुरीचे कारण? लेखकांना पाठ्यपुस्तकाची एक प्रत तरी पाठवण्याचे सौजन्य हवे होते. लेखकांना पुस्तके बाजारातही मिळत नाहीत. ती फक्त मुलांना पाठवतात. अनादराची ही गोष्ट. निवेदन करत चार लेखकांनी आपली कैफियत रितसर दिल्लीच्या संबंधित यंत्रणांना कळवली आहे. ठिकठिकाणी जंतर-मंतर बंड, असंतोष होण्याची ही नांदी.
आली खजिल होण्याची वेळ!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक तसे समोरच्याला सहजासहजी पलटवार करण्याची संधी देत नाहीत. त्यांच्यातील वाक्चातुर्याची अनेकदा प्रचीती येते. परंतु गुरुवारी पत्रकार परिषदेत त्यांना मात्र थंड पाणी सपकन अंगावर पडावे, तसे प्रश्न समोर आले. बुधवारी काढलेल्या मोर्चावेळी वापरलेल्या एका आक्षेपार्ह शब्दाशी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण सहमत आहात काय, असा तो वर-वर साधा दिसणारा प्रश्न होता; पण त्यामुळे बोलती बंद होण्याची वेळ दामू यांच्यावर आली. त्यांनी आपल्या केबिनमध्ये एकास एक पद्धतीने सर्व प्रश्नांना उत्तरे देतो, असे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला खरा; पण त्यांची देहबोली बरेच काही सांगून गेली. त्यावेळी उपस्थित आमदार रुडॉल्फ फर्नांडिस, मंत्री दिगंबर कामत यांच्यावरही थेट प्रश्नामुळे खजिल होण्याची वेळ आली, हेही कॅमेऱ्यासमोर दडून राहिले नाही.
मोर्चा आणि पोलिस
देशभर सुरू असलेल्या आंदोलनाची झळ आता गोव्यालाही लागली आहे. पणजीत मिरामार येथे आणि आता शुक्रवारी म्हापशात विद्यार्थ्यांची पावले पडणार आहेत. विशेष म्हणजे या मोर्चात डॉक्टरही सहभागी होणार असल्याने उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यामुळे सध्या चर्चा आंदोलनाच्या मागण्यांपेक्षा पोलिसांच्या तयारीचीच जास्त रंगली आहे. ‘मोर्चेकरी किती येतील?’ यापेक्षा ‘पोलिस किती दिसतील?’ यावरच पैजा लागल्याची चर्चा आहे. जर पोलिसांचा फौजफाटा नेहमीप्रमाणे दिमाखात उभा राहिला आणि आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न झाला, तर पुढचे मोर्चे आणखी जोमाने निघतील, असा संदेशही फिरू लागला आहे. आता म्हापशात घोषणांचा आवाज मोठा होणार की शिट्ट्यांचा?
‘टर्माइट्स’ पेजवर सावईकर!
‘टर्माइट्स’ हा शब्द उच्चारला आणि सोशल मीडिया त्यावर तुटून पडला. माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्या विधानानंतर तरुणांनी थेट ‘टर्माइट्स जनता युवा मोर्चा’ नावाचेच पेज सुरू करत ‘एआय’ व्हिडिओ, मीम्स आणि उपरोधिक पोस्टचा धडाका लावला आहे. एवढेच नव्हे, तर एका व्हिडिओत वाळवी आणि झुरळेच सावईकर यांच्या मागे धावताना दाखवून नेटिझन्सनी चांगलाच विनोद रंगवला. ‘वाळवी’ म्हणालात म्हणून तरुणांचा जोश कमी होईल, असे वाटले असेल; पण उलट हा शब्दच आंदोलनाचे नवे घोषवाक्य बनल्याचे तरुणांनी पेजवर म्हटले आहे. आता ही ‘वाळवी’ नेमकी लाकूड खाते की राजकीय प्रतिमा, याचीच रंगतदार चर्चा सुरू झाली आहे!
काँग्रेसकडून भाजप ट्रोल
समाजमाध्यमावर ट्रोल करणे हे आता नवे आयुध निर्माण झाले आहे. भाजपने बुधवारी पणजीत मोर्चा काढला. त्यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काँग्रेस हाऊसखाली आसरा शोधण्याची वेळ आंदोलनकर्त्यांवर आली. त्यावरून काँग्रेस हाऊसवर मोर्चा आणि काँग्रेस हाऊसचाच आसरा या शब्दांत काँग्रेसने भाजपला ट्रोल करणे सुरू केले. पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांचे ‘आमचा पंतप्रधान शंभर टक्के निष्क्रिय आहे,’ हे वाक्यही काँग्रेसने ट्रोल करण्यासाठी वापरले. एवढेच नव्हे तर मोर्चात सहभागी काही महिलांनी सरकारने केलेल्या महागाईच्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरल्याचे सांगितले, तीही माहिती काँग्रेसने ट्रोल करण्यासाठी वापरण्याची संधी काही सोडली नाही.
पर्यटकांचा उद्दामपणा!
गोवा म्हणजे ‘आवो जावो घर तुम्हारा’ असा समज बऱ्याच पर्यटकांत असतो. कुठेही आणि कसेही वागलो तरी आमचे कुणीच काही करणार नाही, असा गैरसमज या बहुतांश पर्यटकांत असल्याने ते मन मानेल तसा कारभार करतात. दोन दिवसांपूर्वी काणकोण येथील एका किनाऱ्यावर कारगाडी थेट समुद्रावर नेण्याचा प्रकार महाराष्ट्रातील पर्यटकांच्या अंगलट आला. ही कारगाडी वाळूत अडकली आणि त्यानंतर त्यांना जीवाचे रान करीत ती रेतीतून बाहेर काढावी लागली. यापूर्वी असे प्रकार बऱ्याचदा घडले आहेत. मात्र, त्याचा धडा काही पर्यटक घेत नाहीत, हेच खरे. नियम तोडणाऱ्या या पर्यटकांना मोठा दंड केला तरच जरब बसेल. नुसताच तोंडदेखलेपणा करून चालणार नाही. सरकार त्यादृष्टीने कारवाई करील काय?
‘ई-चलन’ची वसुली
अत्याधुनिक ई-चलन (तालाव) ऑगस्टपासून सुरू होणार. सगळे हाय टेक करणे हे उत्तम. ज्या प्रगत देशांचे आपण अनुकरण करत आहोत, ते संपूर्ण करावे. अर्धमुर्ध नव्हे. ‘एआय’ कॅमेऱ्याचा तालाव पोहोचल्यावर नंतर ग्रस्त वाहतूकदाराला जर तो मोबाईलवर ऑनलाईन भरावासा वाटला तर पध्दत सोपी हवी. अन्यथा चलन भरायला पणजीत हेलपाटे घालावे लागतील. ‘एआय’ कॅमेरा दिवसाला हजारो चलने पाठवेल. प्रदूषण, इन्शुरन्स या गोष्टी नंबर प्लेट हेरून हा डिजिटल संवेदनशील कॅमेरा झटक्यात तालाव पाठवेल. ऑनलाईन चलन भरायची प्रणालीही तशीच झटपट हवी. नाही तर कार्यालयात गर्दी उसळेल, तो जनसागर नियंत्रित होणार नाही. दंड भरणा प्रणाली ६० सेकंदांच्या आत मोबाईलवरून ऑनलाईन पूर्ण व्हावी, असे चालक म्हणतात. तेव्हाच ते खऱ्या अर्थाने ‘डिजिटल इंडिया’ होईल.
प्रकरणे दडपली होती काय?
‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटीसंदर्भात विरोधी पक्षांनी छेडलेल्या आंदोलनावर टीका करण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला २००७ ते २०१२ या काळातील काँग्रेस सरकारात राज्याचे मुख्यमंत्री असलेले आणि २०२२च्या विधानसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे (पीडब्ल्यूडी) मंत्रिपद मिळवलेल्या दिगंबर कामत यांचीही उपस्थिती होती. कामत यांनीही यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलेल्या राहुल गांधींवर टीकास्र सोडले. सोबतच गेल्या पंधरा वर्षांत पेपरफुटीच्या अशा अनेक गोष्टी घडल्याचा दावाही केला. त्यामुळे काँग्रेस काळात मुख्यमंत्रिपदी असताना माहीत असूनही कामत यांनी राज्यातील अशी प्रकरणे दडपली होती की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
भाजपकडून उमेदवाराचा शोध
एक काळ होता ज्यावेळेला रवी म्हणजे फोंडा, असे समीकरण झाले होते. मात्र, आता पात्रांव गेल्यानंतर फोंडा पोरका झाला आहे. त्याचाच फायदा घेऊन सध्या फोंड्याचा आमदार होण्यासाठी अनेकजण धडपडत आहेत. मात्र, जनाधार कुणाच्या बाजूने आहे, ते पाहावे लागेल. सध्या या ना त्या कारणाने भाजप नामोहरम झाले आहे. काही झाले तरी आमदारांची फोडाफोडी करून सत्ता काबीज करणारच, अशी सत्तापिपासू वृत्ती भाजपकडे असल्याने लोक आता सावधान झाले आहेत. या पार्श्वभूमीवर फोंडाच नव्हे राज्यातील इतर मतदारसंघांतही मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करणारा कुणी उमेदवार मिळतोय काय, याचा शोध सध्या भाजपवाले घेत आहेत. पाहूया नेमके काय होते ते, घोडामैदान तर जवळच आहे ना..!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.