पणजी: गोव्यात येत्या दोन-तीन दिवसांत कार्निव्हलची सुरुवात होणार आहे. किंग मोमो आणि कार्निव्हलचे फ्लोट्स पाहायला इच्छुक असाल तर गोव्याच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात करा. येत्या २८ फेब्रुवारी पासून पुढील चार दिवसांसाठी गोव्यात कार्निव्हलची धूम असेल.
गोव्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्निव्हलचे परेड भरणार आहेत. पण या ठिकाणी पोहोचावं कसं? कार्निव्हलसाठी काही 'फी'ज असतात का किंवा नेमकं किती वाजता याची सुरुवात होते असे प्रश्न असतील तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
गोव्यात २५ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२५ दरम्यान साजरा केला जाईल. हा पाच दिवसांचा उत्सव संगीत, नृत्य, स्वादिष्ट जेवण आणि विविध रंगांची एक पर्वणीच असते.
गोव्यात कार्निव्हलचा उत्साह एकूण पाच ठिकाणी पाहायला मिळेल. यात पर्वरी, पणजी, म्हापसा, वास्को आणि मडगाव या शहरांचा समावेश आहे. कार्निव्हलच्या कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे:
२८ फेब्रुवारी: दरवर्षी पर्वरीमधून कार्निव्हलची सुरुवात होत असते. पण, पर्वरीत सुरु असलेल्या उड्डाण पुलाच्या कामामुळे अडथळा निर्माण होऊ नये म्हणून यावर्षीचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे.
१ मार्च: पणजी (Panjim)
२ मार्च: मडगाव (Margao/ Madgaon)
३ मार्च: वास्को (Vasco)
४ मार्च: म्हापसा (Mapusa) येथे कार्निव्हलची सांगता होईल.
कार्निव्हलचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे किंग मोमो परेड. ही एक भव्य मिरवणूक असते, ज्यात विविध रंगांचे फ्लॅट्स, नर्तक आणि संगीतकार सहभागी होतात. किंग मोमो, एक काल्पनिक व्यक्तिरेखा असून तो उत्सवाचा प्रमुख असतो आणि तो लोकांना आनंद साजरा करण्याचे आवाहन करतो.
खास खाद्यसंस्कृतीचा अनुभव (Goa Food Culture)
या उत्सवात खाद्यपदार्थांना विशेष महत्त्व दिले जाते. येथे येणारे लोक पारंपरिक गोव्याच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतात, ज्यात मसालेदार सीफूड करीपासून ते गोड पदार्थांपर्यंत अनेक विविध पर्याय उपलब्ध असतात. कार्निव्हल हा गोव्याच्या खास खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी एक उत्तम संधी असते.
रेड अँड ब्लॅक डान्स (Red And Black Dance)
कार्निव्हलमध्ये लाईव्ह बँड्ससह रस्त्यांवर संगीताचा आनंद घेता येतो तर रंगीबेरंगी वेशभूषा केलेले नर्तक आपल्या नृत्याने लोकांना मंत्रमुग्ध करतात. विशेष म्हणजे, शेवटच्या दिवशी रेड अँड ब्लॅक डान्स आयोजित केला जातो, ज्यात सहभागी लोकं लाल आणि काळ्या रंगाचे कपडे घालून नृत्य करतात.
संध्याकळी ३-४ वाजता गोव्यात कार्निव्हलची सुरुवात होते आणि हा कार्यक्रम साधारण पुढील तीन ते चार तास चालतो. गोव्याच्या कार्निव्हलमध्ये प्रवेश शुल्क नाही, त्यामुळे कोणालाही या आनंदात सहभागी होता येते. फक्त रेड अँड ब्लॅक डान्ससाठी सुमारे १०० रुपये शुल्क आकारले जातात.
वेगवेगळ्या भागांमधून गोव्यात येण्यासाठी तुम्ही बस, रेल्वे किंवा विमानसेवाचा वापर करू शकता. उत्तर गोव्यात पेडणे तालुक्यातील मोपा येथे असणाऱ्या मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळाचा वापर करता येतो. तसेच रेल्वेचे प्रवासी थिवी रेल्वेस्थानकावर उतरू शकतात. तुम्ही दक्षिण गोव्यात उतरणार असाल तर वास्कोमधील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाने येऊ शकता किंवा मडगाव किंवा वास्को-द-गामा रेल्वे स्टेशनवर पोहोचता येतं.
पणजी (Panjim)
राजधानी पणजीत परेडचा मार्ग नव्या पाटो पूल ते कांपाल ग्राउंड असा असतो. कार्निव्हलचा अनुभव घ्यायचा असेल तर मोपा विमानतळापासून पणजीला जाण्यासाठी तुम्ही स्थानिक बसचा वापर करू शकता. आणि गाडी घेऊन जाणार असाल तर पर्वरीहून जाता येतं, तसेच दक्षिण गोव्याहून दाबोळीमधून पणजीला जाणार असल्यास चिखली, आगशी मार्गे पणजीत पोहोचता येतं. पणजी शहरात पोहोचल्यानंतर पाटो ब्रिजजवळ Avenida Dom Joao de Castro या रस्त्याने जाता येतं.
मडगाव (Margao/ Madgaon)
मडगावात परेड होली स्पिरिट चर्चजवळून कार्निव्हल सुरु होतो आणि नगरपरिषदेच्या चौकापर्यंत जातो. पणजीहून मडगावला जाण्यासाठी NH 66 हाच मार्ग सोयीस्कर ठरतो. मडगावात कार्निव्हलजवळ पोहोचण्यासाठी सेंट जोकिम रोड सर्वात सोयीस्कर आहे.
वास्को (Vasco)
वास्कोत सेंट अँड्र्यूज जंक्शन जवळून कार्निव्हलची सुरुवात होते. मडगावहून वास्कोला जाताना नुवेच्या मार्गे जाणं सोपं ठरतं. वास्को शहरातून कार्निव्हल पर्यंत पोहोचण्यासाठी मंगोर हिल रस्त्याने जाता येतं.
म्हापसा (Mapusa)
म्हापशात कोर्टपासून बस स्टॅन्ड पर्यंत कार्निव्हलची फेरी जाते. वास्को किंवा मडगावातून म्हापश्यात पोहोचण्यासाठी बांबोळी, पणजी आणि पर्वरीमार्गे पोहोचता येतं. म्हापशात कार्निव्हलच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी धुळेर रस्त्याने जाता येतं.
पुणे, मुंबई किंवा बंगळुरुमधून गोव्याला स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर खालील मार्गांचा वापर करू शकता: (Pune, Mumbai Banglore)
पुणे: NH48 (AH47) (9-10 तास) किंवा NH48 (12-13 तास)
मुंबई: NH48 (12-14 तास)
बंगळूर: NH48 आणि NH66 (11-12 तास)
कार्निव्हलच्या पाच ठिकाणांपैकी तीन ठिकाणं म्हणजेच पणजी, पर्वरी आणि म्हापसा हे उत्तर गोव्यात आहे आणि याठिकाणी पोहोचण्यासाठी मोपा विमानतळ किंवा थिवी रेल्वे स्थानकाचा वापर करता येतो.
पणजी किंवा पर्वरीला पोहोचण्यासाठी करमाळी रेल्वे स्थानक हा मार्ग देखील सोयीस्कर आहे. दक्षिण गोव्यात वास्को आणि मडगाव येथे कार्निव्हल होईल आणि इथे पोहोचण्यासाठी तुम्ही दाबोळी विमानतळ किंवा मडगाव आणि वास्को रेल्वे स्थानकाचा वापर करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.