Goa Carnival 2025: देशी विदेशी पर्यटकांना आकर्षित करणारा 'गोवा कार्निव्हल' काय आहे? वाचा 500 वर्षांच्या परंपरेचा इतिहास
पणजी: गोवा कार्निव्हल हा गोव्यामधील सर्वात मोठा सांस्कृतिक सोहळा आहे. पोर्तुगीज राजवटीत सुरुवात झालेला हा उत्सव आजही जल्लोषात साजरा होतो. हा सोहळा ख्रिश्चन परंपरेशी निगडित असला, तरी सर्व धर्माचे आणि समुदायाचे लोक यात सहभागी होतात.
गोवा कार्निव्हल हा नेत्रदीपक परेड, उत्साही संगीत, पारंपरिक नृत्य आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांनी भरलेला एक भव्य उत्सव आहे. या काळात संपूर्ण गोवा जल्लोषाच्या रंगात असतो.कार्निव्हल दरम्यान, गोव्याच्या बीचवर आणि शहरांमध्ये विविध संगीत व नृत्य कार्यक्रम आयोजित केले जातात.
स्थानिक कलाकार तसेच नामवंत संगीतकार आणि बँड्स यांचे लाईव्ह परफॉर्मन्सेस पर्यटकांचं विशेष आकर्षण असतं. या सोहळ्यात पारंपरिक गोवन नृत्य, आणि डीजे पार्टीचा मनमुराद आनंद घेता येतो.
कार्निव्हलचा इतिहास
गोवा कार्निव्हलचा उगम हा रोमन कॅथोलिक परंपरेशी संबंधित असून, पोर्तुगीज भारतात आल्यानंतर कार्निव्हल गोव्यात रुजला. ब्राझीलमधील रिओ दि जानेरो कार्निव्हल हा जगातील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध कार्निव्हल मानला जातो. रिओच्याच धर्तीवर गोव्यात होणाऱ्या कार्निव्हलकडे बघितलं जातं. हा सोहळा सण 18व्या शतकात पोर्तुगीज लोकांनी गोव्यात आणला.
कार्निव्हसाठी प्रत्येक वर्षी 'किंग मोमो' या काल्पनिक पात्राची निवड केली जाते, जो या उत्सवाचा प्रमुख असतो. कार्निव्ह सोहळ्यात मिरवणुक काढली जाते. या मिरवणुकीत वेगवेगळ्या थीम असलेल्या सजवलेल्या गाड्या, संगीतकार, ढोल-ताशे आणि पारंपरिक नृत्य पाहायला मिळतं.
पर्यटकांसाठी सुवर्णसंधी
गोव्यातील पणजी, मडगाव, वास्को आणि म्हापसा या शहरांमध्ये भव्य परेडचं आयोजन केलं जाते. यामध्ये स्थानिक कलाकार, सांस्कृतिक संस्था आणि टुरिस्ट मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.
गोवा कार्निव्हल पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गोव्यात येतात. यामुळे राज्याच्या पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळते. हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि बीचजवळील परिसर पर्यटकांनी फुलून जातो.
खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याची पर्वणी
कार्निव्हल दरम्यान गोव्यातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्याची पर्वणी असते. गोव्याच्या रस्त्यांवर स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल लागतात, जिथे फिश करी-राईस, पोई ब्रेड, फेनी आणि विविध समुद्री पदार्थांची चव चाखता येते.
गोवा कार्निव्हल हा केवळ एक सोहळा नसून, गोव्याच्या सांस्कृतिक विविधतेचा आणि परंपरेचा उत्सव आहे. हा सण आधुनिक मनोरंजन, संगीत, नृत्य आणि परंपरेचा उत्तम संगम घडवतो.
२०२५ चा कार्निव्हल कधीपासून?
गोवा पर्यटन विभागाने जाहीर केल्यानुसार, २०२५ चा गोवा कार्निव्हल २८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तर परेड १ मार्चपासून विविध ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. यंदाचा 'किंग मोमो' म्हणून क्लीव्हन मॅथ्यू फर्नांडिस यांची निवड करण्यात आली आहे.
गोवा कार्निव्हल हा जल्लोष, रंग, संगीत आणि परंपरेचा अनोखा संगम आहे. हा उत्सव गोव्याच्या सांस्कृतिक ओळखीचा एक महत्त्वाचा भाग असून, स्थानिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

