Uday Bhembre Controversy Cuncolim Protest
मडगाव/कुंकळ्ळी: छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्याबाबत कोणतेही वादग्रस्त वक्तव्य आम्ही कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. त्यामुळे उदय भेंब्रे यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी कुंकळ्ळी येथे आयोजित निषेध सभेत करण्यात आली.
यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी घोषणा देऊन मैदान दणाणून सोडले. इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याचा कोणताही मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
‘गोव्यात कधीही शिवशाही नव्हती’ असे भेंब्रे यांनी अलीकडेच आपल्या ‘जागोर’ या यू-ट्यूबवरील वक्तव्यात म्हटले होते. त्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जाऊन निर्देशनेही केली होती.
‘शिवाजी महाराजांनी गोवा लुटला, निरपराध ख्रिस्ती धर्मगुरूंना ठार मारले, महिला व मुलांना पळविले’ अशी मुक्ताफळे भेंब्रे यांनी उधळली होती. वास्तविक कल्याण सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी आपल्या आईची उपमा दिली होती. जे तीन धर्मगुरू बळजबरीने धर्मांतर करत होते त्यांना महाराजांनी शिक्षा दिली होती.
पोर्तुगिजांनी शिवरायांना हरविले व ते त्यांचे मित्र होते, हे निखलास खोटे आहे. ते जाणीवपूर्वक तयार केलेले चित्र आहे. आम्ही असा प्रकार खपवून घेणार नाही असे सांगून अखिल गोमंतक मराठा समाजातर्फे उदय भेंब्रे यांच्याविरोधात पोलिस तक्रार करण्यात येणार असल्याचा ठराव मांडण्यात आला.
आपल्या स्वार्थासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी व तसा कायदा करावा असाही ठराव मांडण्यात आला. यावेळी इतिहासकार सचिन मदगे, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाई, अखिल गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष सुहास फळदेसाई, कुंकळ्ळी चिफ्टन मेमोरियल स्मारकाचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्स, ॲड. विपुल सावंत, अरुण रायकर, ॲड. अमित सावंत, मोहन आमशेकर, श्रद्धा शेट्ये, शंकर महाले, भगवान हरमलकर, सुधाकर जोशी, प्रसाद फळदेसाई, सुदेश भिसे, विठोबा देसाई, जितेंद्र आमशेकर, डॉ. मनोज प्रभुदेसाई, विराज देसाई आदींची भाषणे झाली.
या सभेला बजरंग दल प्रमुख मोहन आमशेकर हेही उपस्थित होते. विजयकुमार कोप्रे यांनी सूत्रसंचालन केले. इतिहासकार श्रावणी शेट्ये, प्रजल साखरदांडे यांनीही सोशल मीडियावरून भेंब्रे यांच्या विधानाचा निषेध केला आहे. या सभेला काणकोणपासून पेडणेपर्यंत मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढल्याप्रकरणी उदय भेंब्रे यांच्याविरोधात तक्रारींचा सिलसिला सुरूच आहे. उसगाव अखंड भारत संघटना आणि म्हार्दोळ जय गोमंतक संघटनेतर्फे फोंडा पोलिस स्थानकात आज दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या. तसेच म्हापशात हिंदू जनजागृतीतर्फे, काणकोणात हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे आणि वास्कोत शिवप्रेमींतर्फे पोलिसांत तक्रार करण्यात आली. दरम्यान, काल सोमवारी दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.
उदय भेंब्रे यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेले अवमानकारक विधान हे गंभीर स्वरूपाचे असून तो दखलपात्र गुन्हा ठरतो. अशा प्रकारचे धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांना शिक्षा करण्यासाठी सरकारने कडक कायदे करावेत. भेंब्रे यांना शिवाजी महाराजांबद्दल काडीचाही इतिहास माहीत नाही हेच त्यांच्या विधानातून स्पष्ट होते. त्यांनी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे भेंब्रेंचा जाहीर निषेध करणारा ठराव सभेत मांडण्यात आला.
म्हापसा (वार्ताहर) : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी उदय भेंब्रे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी उद्या बुधवारी ५ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता येथील हुतात्मा चौकातील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ शिवप्रेमी एकवटणार आहेत. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तुषार टोपले व अॅड. महेश राणे यांनी केले आहे.
उदय भेंब्रे हे नेहमीच वादग्रस्त विधाने करतात. त्यांना मराठा इतिहासाची ॲलर्जी आहे. कुंकळ्ळीच्या उठावाला ते ‘केस्तांव’ संबोधतात. आमचा कुंकळ्ळीचा उठाव हा आशिया खंडातील परकीय सत्तेविरुद्धचा पहिला उठाव आहे. आमच्या पूर्वजांचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. पोर्तुगिजांविरोधात लढताना आमचे सोळा महानायक हुतात्मे झाले. भेंब्रे यांच्या विधानाचा आम्ही निषेध करतो.सुहास फळदेसाई, (अध्यक्ष-अखिल गोमंतक मराठा समाज)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.