Uday Bhembre Controversy: भेंब्रेचा इतिहास व इतिहासातील भेंब्रे

Uday Bhembre: एका इंग्रजी वर्तमानपत्रात उदय भेंब्रेसरांची नात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्याचे प्रसिद्ध झाले होते. त्यात उदय भेंब्रेसरांचे स्पष्टीकरणही छापले होते.
Uday Bhembre Controversy
Uday Bhembre ControversyDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. मधू घोडकिरेकर

खरे तर आजचा लेख नव्या स्वरूपात येऊ घातलेल्या गोमंतकाच्या अस्मितेविषयी लिहायचा होता. तशातच उदय भेंब्रेसरांचा परत एकदा छत्रपती शिवाजीमहाराज वाद पुढे आला. तसा हा थेट मराठी भाषिक विषय नसल्याने, मी त्यावर लिहिण्यासारखे नाही. पण, आमचे ‘गोमंतकाची अस्मिता’ हे मुखपत्र व भेंब्रे कुटुंबाचा थेट संबंध आहे.

कारण लक्ष्मीकांत व्यंकटेश प्रभू भेंब्रे यांचे या मुखपत्राशी जिवलग संबंध. त्यांचे संपूर्ण लेखन ते मराठीतून करत होते. त्यांचे देहावसान १ सप्टेंबर १९८५ रोजी झाले. ‘अस्मिते’च्या सुरुवातीपासून म्हणजे १९७५पासून ते अगदी निधनाच्या जवळच्या काळापर्यंत त्यांनी निरंतर ‘अस्मिते’साठी लेखन केले. त्यात त्यांनी एकूण सहा प्रदीर्घ लेखमाला लिहिल्या.

त्यांचे महत्त्वाचे दोन आवडते विषय असायचे; त्यातील एक विषय असायचा, स्वातंत्र्यसैनिक या नात्याने पाहिलेली पोर्तुगीज राजवट व त्यांनी केलेला अत्याचार, तर दुसरा विषय असायचा तो त्यांच्या मराठी अभिमानाविषयी. त्यांचे सर्व लेख अगदी संशोधनात्मक आहेत. मराठी संशोधन पत्रिकेत जुने लेख प्रसिद्ध करण्याची तरतूद आहे.

या तरतुदीअंतर्गत कै. लक्ष्मीकांत भेंब्रे यांचे लेख नव्या गोमंतकाच्या अस्मितेच्या संशोधन पत्रिकेत निश्चित पुनर्प्रकाशित केले जातील. त्यामुळे एकाच विषयावर वडिलाचे काय मत होते व त्याच विषयावर चिरंजीव अ‍ॅड. उदय भेंब्रें यांची काय मते होती, याचे विवेचन भाषिक व ऐतिहासिक संशोधकांना करता येईल.

उदय भेंब्रेसरांनी ‘अस्मिते’मध्ये लिहिले नाही, पण २०१८साली, ‘अस्मितायेचो कसाय’ या लेखसंग्रहाच्या शीर्षकात ‘अस्मिता’ हा शब्द वापरला आहे. ‘कसाय’ म्हणजे काढा. लक्ष्मीकांत भेंब्रे १९८५ साली जग सोडून गेले तेव्हा त्यांनी आपल्या कपाटात मागे सोडलेल्या वस्तूंत ‘गोमंतकाची अस्मिता’ अंकाच्या प्रतींचा नक्कीच समावेश असेल.

उदय भेंब्रेसरांनी आपल्याला ‘चांन्यच्या राती’ या गाण्याची कल्पना सुचल्यावर त्याचे किती वर्षांनी प्रत्यक्षात गीत झाले, हे सांगितले आहे. यावरून त्यांच्या साहित्य निर्मिती प्रक्रियेचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज येतो. घरात सन १९७५ ते १९८३ पर्यंत वडिलांचे लेख असलेल्या ‘गोमंतकाची अस्मिता’च्या प्रती घरात येत होत्या.

त्यातूनच भेंब्रेसरांना वैचारिक लेख लिहिण्याचे बाळकडू मिळाले असावे. वडिलांच्या प्रेरणेची आठवण म्हणून पंचवीस वर्षानंतर आपल्या लेखसंग्रहाला नाव दिले असावे.

Uday Bhembre Controversy
Goa RERA: गोवा 'रेरा'चा दणका! रजिस्ट्रेशन न केल्यामुळे पणजीतील बिल्डरला 5 लाखांचा दंड

तसेच ‘गोमंतकाची अस्मिता’मध्ये एक पुस्तक होऊ शकते इतक्या मोठ्या प्रमाणात ज्या पोर्तुगीज अत्याचार या विषयावर वडिलांनी आपल्या सत्तरीच्या वयात मराठीत लेख लिहिले, जवळपास त्याच वयात त्याच्या पुत्राने अशाच मूळ संकल्पनेवर ‘व्हडले घर’ कोकणी कादंबरी प्रकाशित केली. याची तुलना करीत संशोधक असे म्हणू शकतात, - सार्वजनिकरीत्या सांगत नसले तरी - ‘चिरंजीव आपल्या पित्याच्या पावलावरच चालण्याचा प्रयत्न करीत होते’.

या निष्कर्षाच्या आधारे हे संशोधक, उदय भेंब्रेसर नव्वदीच्या जवळ आल्यावर, भाऊसाहेब बांदोडकर, शिवाजी महाराज यांसारख्या विषयावर का म्हणून वाद निर्माण करीत होते, याचेही एक विवेचन तयार करू शकतात. आता भेंब्रे सरांनी असे म्हटले की, ‘मी वडिलांचे एकही मराठी पुस्तक उघडून बघितलेले नाही’, तर संशोधक असाही निष्कर्ष काढतील की त्यांना मराठीची भयंकर अ‍ॅलर्जी होती.

ही अ‍ॅलर्जी इतकी होती की त्यांनी आपल्या जन्मदात्या बापाचे मराठी साहित्य उघडून बघितले नाही. आजच्या घडीला मी फक्त कल्पना करतो, मत नाही. पिता-पुत्राच्या नात्यातील पुत्राची बाजू खुद्द भेंब्रेसर सांगू शकतील, वडिलांनी आपला दृष्टिकोन एक दोन लेखांनी अस्पष्टपणे व्यक्त केला आहे.

जसे उदय भेंब्रेसर इतिहासकार नाहीत, तसा मीही नाही. पण वर्तमानात जे घडते, त्यावर पुढचा इतिहास तयार होतो, हे मला आता कुठे मला कळायला लागले आहे. त्या काळी सत्तेच्याविरुद्ध चळवळ केली, परिणामी तुरुंगवास भोगले, त्यांची इतिहासात स्वातंत्र्यसैनिक म्हणून नोंद झाली.

कै. लक्ष्मीकांत भेंब्रे असेच एक वरिष्ठ स्वातंत्र्यसैनिक. पुढे त्यांनी राजकारणात सक्रिय काम केले, पण त्यात यश मिळाले नाही. शिक्षकी केली, वकिलीही केली. मराठीतून साहित्य निर्मिती केली. एकमेव मराठीला राजभाषा दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न केले.

उदय भेंब्रेसरांनी वडिलांनी निवडलेली सगळी क्षेत्रे अजमावून पाहिली व वडिलांपेक्षा जास्त सफलता मिळविली. मराठीपेक्षा कोकणीला जास्त मान मिळाला, येथे चिरंजीव वडिलांपेक्षा एक पाऊल पुढे. वडिलांपेक्षा चिरंजीवांचे साहित्य निर्मितीचे प्रमाण जास्त. वडिलांपेक्षा त्यांच्या वैचारिक अनुयायाचे प्रमाण जास्त.

Uday Bhembre Controversy
Goa News: पणजीत मद्यधुंद पर्यटकाने महिलांवर फेकले पैसे; कॅसिनोतून बाहेर येऊन केले लाजीरवाणे कृत्य

वडिलांनी थोडे फार संपादकीय काम पाहिले होते तर त्यांनी पूर्णवेळ संपादकीय जबाबदारी पेलली. राजकारणात तर वडील हयात असताना ते आमदारसुद्धा झाले. एवढे असताना, ज्या प्रकारे ते ऐतिहासिक व्यक्तींवर भाष्य करून जो वाद निर्माण करतात ते पाहता, त्यांना वडिलांना मिळाले तसे स्वातंत्र्यसैनिकांच्या यादीत त्यांना स्थान मिळू शकत नाही, याचे कुठेतरी शल्य वाटत असावे, असे वाटते.

ते अशा व्यक्तीवर भाष्य करीत आहेत, ज्यावरून पोलिसांकडे तक्रार होऊ शकते व अटक होऊन कोकणीप्रेमींसाठी तरी स्वातंत्र्यसैनिक होऊ शकतात. किंवा उलटही होऊ शकते, जशी आता केलेल्या झुंडशाहीमुळे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. अन्यथा त्यांचा स्वभाव, त्यांचे वय व ते उरकून काढत असलेले वाद, यांच्यात वैचारिक ताळमेळ बसत नाही.

जेव्हा चिरंजीव आपल्या वडिलांनी चोखाळलेलीच सगळी क्षेत्रे निवडतात, एकतर वडिलांच्या विरुद्ध पवित्रा घेऊन , किंवा वडिलांनी घेतलेले विषय थोडे उशिरा घेऊन, तर पुढे भेंब्रेंसारख्या एकंदरीत कुटुंबाची नोंद होतेच. या इतिहासात दोघांच्या तुलनात्मक कशा व्यक्तिरेखा तयार रंगविल्या जातील हा विचार करण्याचा विषय आहे.

यावर आपले मत खुद्द उदय भेंब्रेसरांनी २०११साली व्यक्त केले आहे. २०११च्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण या मागणीच्या माध्यमधोरण आंदोलनातचे ते वेलिंगकर सरांसोबत नेतृत्व करीत होते. अशा वेळी एका इंग्रजी वर्तमानपत्रात उदय भेंब्रेसरांची नात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत असल्याचे प्रसिद्ध झाले होते. त्यात उदय भेंब्रेसरांचे स्पष्टीकरणही छापले होते.

ते म्हणाले होते की, त्या मुलीचे ते आजोबा आहेत, वडील नाहीत. तिच्या शिक्षणाविषयी निर्णय घेण्याचा अधिकार तिच्या आईवडिलांना आहे, त्यांना नाही. एकाच कुटुंबात एखाद्या मुद्द्यांवर पुत्राने वडिलांपेक्षा वेगळा विचार करण्याचा वारसा आपल्याकडे पूर्वीपासून आहे, असे त्यांनी सांगितले. याचा पुरावा म्हणून त्यांनी आपले वडील कट्टरतावादी होते याची आठवण करून दिली होती.

परवा झालेल्या - आता विषय चालू असलेल्या वादामुळे वेगळे रूप घेऊन समोर आला आहे - शिवाजीमहाराजांच्या वक्तव्यामुळे त्यांना मानणारे बॅकफुटवर आले होते, पण बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या घराकडे जाऊन झुंडशाही केल्याने, त्यांना सहानुभूती तयार करण्यासारखा मुद्दा मिळाला. पण, माध्यम प्रकरणी जशी त्यांच्या कुटुंबाची भूमिका त्यांच्या वैचारिक पवित्र्याशी समांतर नव्हती, नेमकी येथेही असे समोर आले आहे.

झालेला गोंधळ, उदय भेंब्रेसरांच्या कुटुंबातील महिलांनी धैर्याने हाताळला म्हणून त्यांचे कौतुक करणारा संदेश एका कोकणी अभिमानी कार्यकर्तीने टाकला. त्यावर भेंब्रे सरांच्या सूनबाईंनी असा काही कमेन्ट टाकला की त्या पोस्टचा

‘अँटी क्लायमॅक्स’ झाला. सूनबाई इंग्रजीत म्हणाल्या, ‘बाई मी आपल्याला थोडे स्पष्ट करून सांगते. आमच्यावर कुणी दगड मारले नाहीत किंवा आम्हांला कुणी धमक्या दिल्या नाहीत. त्यांच्या भावना दुखावल्याने ते आंदोलन करण्यासाठी आले होते. मान्य आहे की त्यांच्या विरोधकांचे वय पाहता, त्यांच्या आंदोलनाची वेळ चुकीची होती. पण ते गुंड नव्हते, तर शिवप्रेमी होते.

’ पुढे तिने, ‘शिवप्रेमी महिलांना त्रास करीत नाहीत’ असे कुणीतरी टाकलेल्या पोस्टला त्या सहमती दाखवतात. येथे, सासर्‍याने त्यांच्या भावना दुखावल्या म्हणून ते आक्रमक झाले व त्यासाठी त्यांना दोष देता येत नाही असे अप्रत्यक्षपणे सुनावले.

जे लोकांना चुकीचे वाटले तसे ते सूनबाईंना का वाटले नाही, याचा दोष उदय भेंब्रेसरांनाच इतिहास देणार आहे. कोकणीत एक युक्ती आहे, ‘पाद्रीचे शर्माव उन्हीक न्हय’ त्याची आठवण येथे करून दिली जाईल.

कोकणीचे महत्त्व ते वडिलांना पटवून देऊ शकले नाहीत, मातृभाषा माध्यमाचे महत्त्व आपल्याच मुलाला समजावू शकले नाहीत तर आता महाराजांवर भाष्य करण्याचे लॉजिक आपल्या सूनबाईंना. वडिलांनी स्वातंत्र्यसैनिकांना शोभेल असे वर्तन शेवटपर्यंत राखले. पुढील काळात त्यांनी जे काही लिहिले व त्यांच्या विषयी सरकार दरबारी जे काही लिखित आहे, इतक्या मर्यादेतच ते इतिहासाच्या कागदोपत्री दिसणार आहे.

पण त्यांच्या मागे वादाचे विशेषण दिसणार नाही. उदय भेंब्रेसरांचे सरकार दरबारी एका वेळचे आमदार अशी सरकार नोंदणी राहणार आहे. साहित्यिक जगात त्यांचे साहित्य राहणार आहे, पण इतिहासात, त्यांच्या नावापुढे आवश्यक वाद करणारे व अनावश्यक वाद उरकून जाणणारे, अशी विरुद्धार्थी दोन विशेषणे लागणार आहे.

आपण हयात असेपर्यंत आपण किंवा आपले अनुयायी त्याचे स्पष्टीकरण देऊ शकतील, पुढील काळात लोकांचे सोडाच, पण कुटुंबीयही समर्थनार्थ पुढे येत नाहीत. जेव्हा उदय भेंब्रेसरांनी भाऊसाहेबांवर गोवा विलीनीकरणावरून टीका केली, तेव्हा सामान्य जनतेकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या, मगो पक्षाने निषेधाची औपचारिकता केली.

पण, भाऊंची बाजू घेऊन त्यांचे कुटुंबीय पुढे आले नाहीत. उदय भेंब्रेसरांनी यातून आपल्यासाठीही असेच काही भविष्यातही वाढून ठेवलेले असू शकते, याची जाणीव ठेवायला हवी. पुढचे सोडा, आता मागणी जोर धरतेय त्याप्रमाणे बजरंग दलाच्या युवकांना अटक झाली तर प्रत्यक्ष साक्षीदाराने टाकलेली ही पोस्ट त्यांना निर्दोष ठरविण्यात पुरेशी आहे.

Uday Bhembre Controversy
Uday Bhembre: बजरंग दलाच्या विराज देसाईं आणि अन्य कार्यकर्त्यांविरोधात भेंब्रे यांची पोलिस तक्रार; वादग्रस्त वक्तव्य प्रकरण

आपल्या व्हिडिओमध्ये उदय भेंब्रेसरांनी दावा केला नाही की आजची पिढी इतिहास वाचत नाही, राजकारणीही इतिहास वाचत नाहीत, तसे मुख्यमंत्रीही तो वाचत नसावेत. येथे मी म्हणेन की पुढील काळात लोक इतिहास वाचणार नाहीत, पण त्यांच्या आवडीचा इतिहास आभासी जगात शोधणार. कृत्रिम बुद्धी त्याचे विश्लेषणही करून देणार आहे.

आज जे उदर भेंब्रेसर व्हिडिओच्या रूपात जे वाद आभासी जगात पेरत आहेत, ते त्यांच्या पणतूच्याही पुढच्या पिढ्यांना उपलब्ध होणार आहेत. आभासी जगाचा स्वस्त:चा असा इतिहासाचा नवा प्रकार भविष्यात तयार होणार आहे. आधी एकदा , ‘ब्रह्मास्त्र’ नावाचा उदय भेंब्रेसरांनी महाराजांवर टिप्पणी करणारा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

Uday Bhembre Controversy
Uday Bhembre: "शिवरायांचे ध्येय गोवा मुक्तीचेच होते" शिवव्याख्याते ॲड. देसाईंचे भेंब्रेंना सडेतोड उत्तर

वाद होतो असे दिसल्यावर त्या चॅनलने तो व्हिडिओ आपल्या वेबसाइटवरून काढून टाकला. या उलट, त्यांचे मुद्दे खोडून काढणारे व्हिडिओ अजूनही सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. आभासी जगाचे नॅरेटीव्ह तयार होतील ते अशा उपलब्ध आभासी कंटेंटमुळे.

लिखित पुस्तकातला वाद अगदी मर्यादित स्वरूपात तयार होतो, पण आभासी प्लॅटफॉर्मवर तयार झालेला वाद वणव्याचे रूप घेऊ शकतो. पण याच प्लॅटफॉर्मवर आपल्या नव्वदीत आपल्या अनुभवातून सकारात्मक कंटेंट टाकल्यास, आपल्या विचारधारेनुसार आपण भविष्यातील विवेकानंद, साने गुरुजी वा विनोबा भावे बनू शकता, पण ऐतिहासिक व्यक्तींना लहान करून आपण स्वतः: महान बनू शकत नाही.

आकाशवाणीचे एक चांगले आहे, त्यांचा कंटेंट सोशल मीडियावर उपलब्ध होत नाही. उदय भेंब्रेसर, अजूनही आपण आकाशवाणीसाठी कंटेंट तयार करतो तसा कंटेंट तयार करून आभासी प्लॅटफॉर्मवर टाकत असतील, तर ते आपण जे काही कमावले ते कायमचे हरवून बसण्याचा धोका पत्करीत आहेत. याचे उदाहरण ‘छावा’ चित्रपटातून देता येते.

संभाजी सावंताची कादंबरी कितीतरी वर्षांपासून आहे, पण त्याला शिर्केंच्यावंशजांनी आक्षेप घेतला नाही. ‘येथे ओशाळला मृत्यू’मध्येही असेच काही कथानक दाखविले आहे, पण तेथेही आक्षेप समोर आला नाही. पण चित्रपट स्वरूपात हे कथानक लाखोंच्या समोर येताच वंशज आक्षेप घेऊन पुढे आले.

कोकणी प्रेमी असो वा मराठी प्रेमी, दोन्ही बाजूसाठी भेंब्रे कुटुंब आदरणीय आहेत. इतिहास या कुटुंबाची नोंद राखणारच. कधीकाळी वडिलांची भूमिका विरुद्ध चिरंजीवाची भूमिका यांच्या तुलनेवर भविष्यात काही नॅरेटिव्ह तयार झाले तर पिता-पुत्राच्या वंशजांना डोक्याला हात लावण्याची पाळी येणार आहे. उदय भेंब्रेसरांनी स्वत:स वेळीच रोखणे सर्वांच्याच भल्याचे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com