Vijai Sardesai Cash For Job
सासष्टी: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणाचा शेवट तेव्हाच होईल, जेव्हा यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध लागेल. त्यासाठी त्याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना सांगितले. ‘व्ही फॉर फातोर्डा’ संघटनेतर्फे क्रिएटीव्ह एचआर सोल्युशन यांच्या सहकार्याने फातोर्ड्यात आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, की ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळा दाबून टाकण्यासाठी सरकारकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. गोव्यात खासगी आस्थापनांमध्ये ८० टक्के गोमंतकीयांना नोकरी मिळायलाच हवी, पण तसे घडत नाही. त्याचबरोबर आई वडील आपल्या मुलांना शिकवतात, पण जे गुणवंत, योग्य व पात्र विद्यार्थी असतात त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत व नंतर ते इतर राज्यात किंवा विदेशात जातात.
गोव्यात माहिती तंत्रज्ञानाची सात महाविद्यालये आहेत, पण आयटी पार्क आहे कुठे? याच्या उलट एक फार्मसी महाविद्यालय आहे व अनेक फार्मास्युटीकल कंपन्या आहेत. त्यामुळे या कंपन्यांमध्ये गोमंतकीयांना रोजगार मिळणे कठीण आहे.
गोव्यात जास्त रोजगार उपलब्ध करण्यासाठी राज्याची आर्थिक घडी मजबूत पाहिजे. गोमंतकीयांना अनुरूप अशी रोजगार योजना पाहिजे, पण सरकारचे लक्ष भलतीकडेच आहे, अशी टीका करून सरदेसाई म्हणाले, गोव्यात सरकारी खात्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. कामगार, कौशल्य विकास, शिक्षण यामध्ये रोजगारासाठी समित्या पाहिजे.
या रोजगार मेळाव्यात ३० कंपन्या सहभागी झाल्या असून विविध कंपन्यांमध्ये एकूण १०१ पदांची भरती करायची आहे. त्यासाठी ५६५ अर्ज आल्याचे क्रिएटीव्ह एचआर सोल्युशनच्या संगिता दळवी यांनी सांगितले. या कंपन्यांमध्ये हॉस्पिटल, हॉटेल, आदी कंपन्यांचा समावेश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.