Goa Politics: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत गोव्यातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी उडी घेतली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगर नियोजनमंत्री विश्वजीत राणे मध्यप्रदेशमधील भाजप उमेदवारांचा प्रचार करत आहेत, तर राज्यसभा खासदार व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे तेलंगणातील प्रचारात मग्न आहेत.
गोव्यातील इतर पक्षांच्या नेत्यांत मात्र सामसूम आहे. छत्तीसगड आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला, मध्यप्रदेश मध्ये 17 नोव्हेंबरला आणि तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने देशभरात होत असलेल्या 5 राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका गंभीरपणे घेतल्या आहेत. मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या पाच राज्यांमध्ये या महिन्याभरात निवडणुका होणार असून 3 डिसेंबर रोजी या सर्व पाचही राज्यांमध्ये मतमोजणी होऊन निकाल हाती येतील.
या 5 राज्यांपैकी मध्यप्रदेश वगळता इतर चार राज्यांमध्ये भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांची सरकारे सत्तेवर आहेत. तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती सत्तेवर असून राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेस, तर मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट सत्तेवर आहे. त्यामुळे भाजपने मिझोराम वगळता अन्य ४ राज्यांमधील सत्ता हस्तगत करण्यासाठी निवडणुकांमध्ये जोर लावला आहे.
काँग्रेस आणि इतरांमध्ये सामसूम
राज्यातील भाजप वगळता इतर पक्षांतील नेत्यांचा निवडणुका असणाऱ्या राज्यांमधील मतदारांवर फारसा परिणाम होणार नसल्याने काँग्रेसचे नेते, आमदार प्रचारासाठी इतर राज्यांत जाताना दिसत नाहीत. तसेच मगोप, गोवा फॉरवर्ड, आरजी या राजकीय पक्षांचे अस्तित्व राज्यापुरते मर्यादित आहे. आम आदमी पक्षाचे दोन आमदार विधानसभेत असले, तरी त्यांचा इतर राज्यांमध्ये प्रचारामध्ये फारसा प्रभाव दिसून येणार नसल्याने त्यांनाही प्रचारापासून दूर ठेवले आहे.
मुख्यमंत्री लढवतात बालाघाटमध्ये खिंड
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे मध्यप्रदेशची जबाबदारी दिली असून राजस्थानमध्येही ते प्रचाराला जाणार आहेत. सध्या ते मध्यप्रदेशमधील बालाघाटमधील काही उमेदवारांच्या प्रचार सभांमध्ये भाग घेत मध्यप्रदेशमध्ये डबल इंजिनचे सरकारच विकास करेल असे सांगत भाजप उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.
राणेंकडे 20 मतदारसंघ; तानावडे तेलंगणात
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याकडेही मध्यप्रदेशमधील 20 मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्याकडे तेलंगणामध्ये तीन लोकसभा मतदारसंघातील 20 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली असून सध्या ते हैदराबाद आणि सिकंदराबादमध्ये प्रचार करत आहेत. याशिवाय भाजप केडरमधील अनेक कार्यकर्ते या राज्यांमधील सक्रिय प्रचारात सहभागी झाले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.