

मडगाव: दक्षिण पश्चिम (एसडब्ल्यूआर) रेल्वेने फेब्रुवारीमध्ये आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवत आर्थिक आणि परिचालन क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये फेब्रुवारीअखेरपर्यंत या विभागाने एकूण ८,५५० कोटी रुपयांचा महसूल गोळा केला असून, मागील वर्षाच्या तुलनेत यात १४.३१ टक्क्यांची वाढ झाली आहे.
द. प. रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मंजुनाथ कनमडी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतूक महसूल हा या यशाचा मुख्य आधार ठरला आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत मालवाहतुकीतून ४,८७६ कोटी रुपये (१८.२७ टक्के वाढ) तर प्रवासी वाहतुकीतून ३,१५४ कोटी रुपये (९.२५ टक्के वाढ) महसूल मिळाला आहे. केवळ फेब्रुवारी महिन्यात रेल्वेने ७८० कोटी रुपयांची कमाई केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.२५ टक्क्यांनी अधिक आहे.
फेब्रुवारी महिन्यात साऊथ वेस्टर्न रेल्वेने ४.२६ दशलक्ष टन मालाची लोडिंग केली, जी या महिन्यातील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. पोलाद वाहतुकीने (०.८९ दशलक्ष टन) नवा विक्रम प्रस्थापित केला असून, कोळसा वाहतुकीत १९.६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
संपूर्ण वर्षाचा विचार करता, लोहखनिज १९ दशलक्ष टन (१०.७ टक्के वाढ), पोलाद ९.८ दशलक्ष टन (३५.९ टक्के वाढ) आणि कोळसा ९.३ दशलक्ष टन (१६.६ टक्के वाढ) अशी दमदार कामगिरी राहिली आहे.
१३.६६ दशलक्ष प्रवाशांचा प्रवास
फेब्रुवारी महिन्यात तब्बल १३.६६ दशलक्ष प्रवाशांनी या रेल्वेने प्रवास केला, ज्यामुळे ३०७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत १४.५ टक्क्यांनी जास्त आहे. याव्यतिरिक्त, तिकीट तपासणी मोहिमेतून ६.३२ कोटी रुपये रेल्वेला मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.