डिचोली: मधमाशांनी जमावावर केलेल्या हल्ल्यात दहाहून अधिकजण जखमी होण्याची घटना डिचोलीतील नानोडा परिसरात घडली. या हल्ल्यात सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नसला, तरी मधमाशांच्या चाव्यांमुळे सहाजणांना उपचारार्थ इस्पितळात दाखल करावे लागले.
पैकी पाचजणांना डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात तर एका जखमीला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अन्यजण किरकोळ जखमी झाले. मधमाशांच्या हल्ल्यात स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये सुखरुप राहिले असले, तरी त्यांना किरकोळ बाधा पोचली, अशी माहिती मिळाली आहे.
शुक्रवारी सायंकाळी नानोडा येथे वीज ट्रान्सफॉर्मर केंद्राचा पायाभरणी समारंभ होता. या समारंभाला स्थानिक आमदार डॉ. शेट्ये, जिल्हा पंचायत सदस्य पद्माकर मळीक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला ४० हून अधिक ग्रामस्थ जमले होते. पायाभरणी समारंभ सुरू असताना तेथीलच एका झाडावर आणि उंचावर असलेल्या पोळ्यातील मधमाशा अचानक चवताळल्या आणि या मधमाशांनी अचानक पायाभरणी समारंभास त्याठिकाणी उपस्थित असलेल्या जमावावर हल्ला केला.
मधमाशांच्या अचानक हल्ल्यामुळे घटनास्थळी पळापळ सुरू झाली. या हल्ल्यात मधमाशांनी जवळपास पंधराजणांना चावे घेतल्याची माहिती मिळाली आहे. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांनाही मधमाशांनी सोडले नाही. पैकी माजी सरपंच श्याम हरमलकर मिळून सहाजणांना लागलीच उपचारासाठी डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
एकाचा रक्तदाब कमी झाल्याने त्याला तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले. मधमाशा नेमक्या कशा चवताळल्या ते समजू शकले नाही. मात्र पायाभरणी समारंभावेळी त्याठिकाणी लावलेल्या उदबत्तीच्या सुगंधी धुरामुळे ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. दरम्यान, डिचोलीच्या सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलेल्या जखमींना उपचारानंतर रात्री उशिरा घरी पाठवण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.