वास्को: बायणा-वास्कोतील दरोडा प्रकरणी दोन दिवस उलटले; मात्र पोलिसांचे हात रितेच आहेत. वरकरणी पोलिसांनी पहिल्याच दिवशी महत्त्वाचे धागेदोरे हाती आल्याचा दावा केला असला तरी पोलिस अद्याप या प्रकरणात चाचपडत असल्याचे दिसून येत आहे.
संशयावरून बुधवारी काही जणांना ताब्यात घेण्यात आले असले तरी त्यांच्याकडून काही ठोस पुरावे हाती लागले नसल्याने पोलिसांनी अधिक बोलणे टाळले आहे. दरोड्यात रोख रक्कम, दागिने मिळून ३५ लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरोडा पडलेल्या सागर नायक यांच्या घरी तिजोरी असल्याची माहिती दरोडेखोरांना आधीच असणे, नायक यांच्याकडून कारच्या चाव्या मागून घेऊन नेमक्या त्यांच्याच कारमध्ये जाणे, घरात प्रवेश करण्यासाठी नेमक्या ग्रील नसलेल्या खिडकीची काच फोडणे या गोष्टी पोलिसांना हैराण करणाऱ्या आहेत. दोन प्रकरणात बांगलादेशी दरोडेखोर होते असे म्हणून पोलिसांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणात अशी माहिती स्थानिकाच्या सहभागाशिवाय मिळणे शक्य नसल्याने पोलिसांनी तसा कोणताही दावा केलेला नाही.
या प्रकरणात पुढे काय झाले, याची माहिती देण्यास पोलिस असमर्थ ठरत आहेत. दरोडेखोरांनी परिसरातील सीसीटीव्हींनी चकवा दिला. निर्जन भागातून ते इमारतीपर्यंत आले यावरून त्यांना परिसराची पूर्ण माहिती कोणीतरी दिली होती या शक्यतेने पोलिस तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात काही संशयितांना पोलिस ठाण्यात आणून मुरगाव पोलिस तपास करत असले तरी त्यातून महत्त्वाची माहिती हाती आली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
कायदा व सुव्यवस्था ढासळली : विरियातो
‘गोवा गुन्हेगारांची राजधानी होत चालली आहे’, अशी टीका दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आज केली. त्यांनी बायणा येथील ‘चामुंडी आर्केड’ इमारतीत जाऊन दरोडा पडलेल्या फ्लॅटची पाहणी केली.
‘सशस्त्र गुन्हेगार आता सहजतेने घरांमध्ये घुसून दहशत निर्माण करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. दरोडेखोर निघून गेल्यावर सागर नायक यांची मुलगी नक्षत्रा हिने जी हिंमत दाखविली त्याबद्दल तिला शौर्यपदक मिळायला हवे’, असेही ते म्हणाले.
१. राज्यात सध्या पर्यटन हंगाम सुरू झाल्याने देश-विदेशातील पर्यटक गोव्यात येण्यास सुरुवात झाली आहे. शिवाय गोमंतकीय नागरिकही घरे बंद करून इतर देश, राज्यामध्ये पर्यटनासाठी जात आहेत.
२. त्यामुळे दिवसा आणि रात्रीच्यावेळीही सर्वच भागांत गस्त वाढवा, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पर्यटकांची माहिती मिळताच तत्काळ त्यांच्यावर कारवाई करा, राज्यातील सराईत गुन्हेगारांवर पाळत ठेवा.
३. गेल्या काही महिन्यांत घडलेल्या घटनांतील आरोपींच्या लवकरात लवकर मुसक्या आवळा अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिल्याची माहिती बैठकीला उपस्थित राहिलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याने ''गोमन्तक''शी बोलताना दिली.
रात्री आणि दिवसाही पोलिस बंदोबस्त वाढवण्यासह गेल्या काही दिवसांत घडलेल्या वेगवेगळ्या गुन्ह्यांतील आरोपींवर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना दिले.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गुन्हेगारीला ऊत आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज पणजीत पोलिस महासंचालक आलोक कुमार व इतर पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कठोर शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे आणि चोवीस तास सतर्क राहण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांची यापुढे प्राधान्याने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. बायणा दरोड्याचा तपास लवकरच लागेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
पोलिस आपल्यापरिने कामाला लागले आहेत. निरनिराळ्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यातून काही सुगावा लागतो की काय हे पाहिले जात आहे. बायणा येथील चामुंडी आर्केड इमारत ही मुरगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत येते. सहा सात मीटरच्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या इमारती, घरे वास्को पोलिस स्थानकाच्या हद्दीत येतात. त्यामुळे मुरगाव पोलिस या घटनेचा तपास करीत आहे. पोलिस अधिकारी व इतरांचा सहभाग असलेली चार पथके तयार करण्यात आली आहेत.
त्यांना पूर्ण माहिती कशी?
सागर नायक यांच्या फ्लॅटची दरोडेखोरांना पूर्ण माहिती होती, त्यामुळेच त्यांनी फ्लॅटमध्ये दारातून प्रवेश न करता ग्रिल्स नसलेल्या खिडकीची काच फोडून बेडमध्ये प्रवेश केला. त्यांना तेथे तिजोरी असल्याचेही माहित होते. त्यांनी तिजोरीच्या चाव्याची मागणी केली होती.
नायक यांच्या कारची चावी घेऊन थेट त्या कारजवळ जाणे. मागच्या निर्जन भागातून इमारतीमध्ये प्रवेश करणे, सीसीटिव्ही कॅमेऱ्यांना चुकविणे इत्यादींचा अर्थ म्हणजे त्यांना या सर्व गोष्टींची पूर्णपणे माहिती कोणीतरी पुरविली होती. किंवा ती व्यक्ती त्यांच्यासमावेत असावी असा कयास व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सूचना
गुन्हे घडूच नयेत यासाठी सदैव सतर्क राहा.
गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी नवीन कल्पना अमलात आणा.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा कसून तपास करा.
नाकाबंदी प्रभावी होण्यासाठी लक्ष द्या, वेळोवेळी सूचना करा.
शहांनी आता हस्तक्षेप करावा : अमित पाटकर
राज्यातील कायदा–सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे वारंवार घडत असलेल्या खून, दरोडे, मारहाणीच्या घटनांतून सिद्ध होत आहे. कायदा–सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीच यात हस्तक्षेप करावा.
हा दरोडा भरवस्तीत; पोलिसही हैराण : भरवस्तीतील व मुख्य रस्त्याकडेला असलेल्या चामुंडी आर्केड या इमारतीतील सागर नायक यांच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटवर दरोडा वास्कोवासीयांच्या चर्चेत आला. म्हापसा, दोनापावला येथील दरोडे हे निर्जन स्थळी असलेल्या बंगल्यावर घालण्यात आले होते.
परंतु भरवस्तीतील इमारतीत इतर शेकडो लोक असतानाही दरोडा घालून दरोडेखोरांनी आपली हिंमत वाढली असल्याचे दाखविले की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे हा दरोडा आम्ही एक आव्हान म्हणून स्वीकारत असल्याचे डीआयजी वर्षा वर्मा यांनी सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.