AAP BJP political clash over RSS: गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस (१३ जानेवारी) गोंधळाचा ठरला. 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित विशेष चर्चेदरम्यान, बाणावलीचे 'आप' आमदार वेंझी व्हिएगस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावरून सत्ताधारी भाजपचे आमदार आणि मुख्यमंत्री आक्रमक झाले, ज्यामुळे सभागृहात मोठी खडाजंगी पाहायला मिळाली.
आता आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी या वादात उडी घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे. नाईक म्हणाले, "आमदार वेंझी व्हिएगस यांनी सत्य मांडल्यामुळे संपूर्ण भाजपची धावपळ उडाली आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आरएसएसचा कोणताही सहभाग नव्हता, हे वास्तव आहे.
एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने सभागृहात काय बोलावे आणि काय बोलू नये, हे सांगण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही. आमदारांना त्यांचे मत मांडण्यासाठी विधीमंडळ विशेषाधिकाराचे संरक्षण असते." भाजपने 'वंदे मातरम'च्या भावनेनुसार काम करण्यात अपयश मिळवले असून त्यांच्या कृतीची त्यांना लाज वाटली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
आमदार वेंझी यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कडक शब्दांत टीका केली. "आमदार वेंझी यांना देशाचा आणि संघाचा इतिहास माहित नाही. जर एखाद्याला एखाद्या संस्थेचा इतिहास समजत नसेल, तर त्यांनी त्यावर भाष्य करणे टाळावे. वक्तव्य करण्यापूर्वी त्यांनी आधी आरएसएसबद्दल अभ्यास करावा," असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही वेंझी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
काल विधानसभेतील वातावरण अधिकच चिघळल्याने सभापतींनी मध्यस्थी केली. आमदार वेंझी व्हिएगस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या टिप्पण्या असंसदीय ठरवत त्या विधानसभेच्या कामकाजातून काढून टाकण्याचे आदेश सभापतींनी दिले. 'वंदे मातरम' सारख्या पवित्र विषयावर चर्चा होत असताना अशा प्रकारचे वाद होणे दुर्दैवी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.