

पणजी: गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस (13 जानेवारी) वादळी ठरला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष चर्चेदरम्यान राजकीय ठिणगी पडली. आम आदमी पार्टीचे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सभागृहातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. अखेर सभापतींना हस्तक्षेप करुन व्हिएगस यांनी केलेल्या टिप्पण्या कामकाजातून काढून टाकण्याचा आदेश द्यावा लागला.
सभागृहात 'वंदे मातरम' या गीताचा गौरवशाली इतिहास आणि राष्ट्रवादावर चर्चा सुरु होती. यावेळी बोलताना आमदार वेंझी व्हिएगस यांनी वंदे मातरम आणि राष्ट्रवादाचा संदर्भ देत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काही टिप्पणी केली. व्हिएगस म्हणाले, “RSS मधल्या एकाने तरी वंदे मातरम् म्हटले आहे का? कोणी म्हटले असेल तर त्यांची किमान चार नावे सांगा.” त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. या विधानाचा रोख संघाच्या ऐतिहासिक भूमिकेकडे होता. मात्र, हे विधान करताच सत्ताधारी बाकांवरील भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. भाजप आमदारांनी जागेवर उभे राहून व्हिएगस यांच्या विधानाचा तीव्र निषेध केला, ज्यामुळे सभागृहाचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले.
आप आमदाराच्या विधानावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तात्काळ उभे राहून प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, "आरएसएस ही जगातील सर्वात मोठी राष्ट्रभक्त संघटना आहे. तिच्याबद्दल बोलताना पुराव्याशिवाय किंवा इतिहासाचा चुकीचा अर्थ लावून बोलणे पूर्णपणे अयोग्य आहे." व्हिएगस यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी इतिहासाची मोडतोड करु नये, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुनावले. एवढचं नव्हे तर भाजप आमदारांनी व्हिएगस यांनी माफी मागावी आणि त्यांचे शब्द कामकाजातून हटवावेत, अशी मागणी लावून धरली.
त्याचवेळी, सभागृहातील वाढता तणाव आणि गोंधळ पाहता सभापतींनी मध्यस्थी केली. चर्चा मूळ विषयावरुन भरकटत असल्याचे पाहून सभापतींनी कठोर भूमिका घेतली. आमदार वेंझी व्हिएगस यांनी संघाबाबत केलेली ती विशिष्ट विधाने असंसदीय किंवा पुराव्याविना असल्याचे स्पष्ट करत ती विधानसभेच्या अधिकृत रेकॉर्डमधून काढून टाकण्याचे आदेश दिले. यामुळे आता या विधानांचा अधिकृत कामकाजात समावेश राहणार नाही.
या घटनेमुळे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमधील वैचारिक दरी पुन्हा एकदा समोर आली. 'वंदे मातरम' सारख्या भावनिक आणि राष्ट्रीय मुद्द्यावर झालेल्या या राजकीय संघर्षामुळे अधिवेशनातील आगामी दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला असला, तरी मुख्यमंत्र्यांनी आक्रमक बचावात्मक पवित्रा घेतल्याने सत्ताधारी पक्ष वरचढ ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.