Goa Colleges: पेडणे येथील सरकारी महाविद्यालयातील प्रकल्पाच्या यशानंतर राज्य सरकार आणखी तीन सरकारी कॉलेजमध्ये 'ऑटोमेटेड गो टू माऊंट' अंतराळ दुर्बिण बसवण्याच्या तयारीत आहे. या दुर्बिणीतून अंतराळातील ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करता येणार आहे.
पेडण्यातील कॉलेजप्रमाणेच या तीन सरकारी महाविद्यालयांच्या आजूबाजूच्या भागातील ग्रामस्थांना देखील खगोल निरीक्षणासाठी या दुर्बिणीचा वापर केला जाईल.
गोव्यातील खगोलशास्त्रज्ञ विठ्ठल तिळवी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, तीन सरकारी महाविद्यालयांसाठी दुर्बिणी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची ओळख करून देण्याबरोबरच, समाजाशी संवाद साधणे हे देखील या योजनेमागील व्यापक उद्दिष्ट आहे.
पणजीतील जनता हाऊसमध्ये दुर्बिणीची सुविधा आहे, परंतु स्टारगेझिंग रात्री केले जाते. त्यामुळे गावातील अनेकजण तिथे येऊन त्यात सहभागी होऊ शकत नाहीत. या नव्या दुर्बिणी पोर्टेबल आहेत आम्ही वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन सत्र घेऊ शकतो."
तिळवी यांनी यापूर्वी 'नासा'शी संबंधित प्रकल्पावर काम केले आहे आणि सध्या ते गोवा गोवा उच्च शिक्षण परिषदेच्या संशोधन, विकास आणि नवकल्पना केंद्रात प्राध्यापक आहेत.
पेडणे कॉलेजमध्ये आम्ही गावकऱ्यांसाठी अवकाश निरीक्षण आयोजित केले तेव्हा सात वर्षांपासून ते 92 वर्षांपर्यंतचे आबालवृद्ध त्यात सहभागी झाले. या दुर्बिणीची किंमत 3 ते 5 लाख रुपये इतकी आहे आणि ती लॅपटॉपवर वायफायद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते.
टेलीस्कोपचे ऑप्टिक्स उत्कृष्ट आहेत आणि चंद्रावरील खड्डे, पर्वतरांगा, खड्ड्यांमधील सावल्या त्यातून पाहता येतात, अशी माहिती तिळवी यांनी दिली.
साखळी, केपे, बोर्डा येथील सरकारी महाविद्यालयांसाठी दुर्बिणी खरेदीचे काम प्रगतीपथावर आहे. भौगोलिकदृष्ट्या जवळ असलेल्या महाविद्यालयांनाही याचा लाभ घेता येईल. पेडणे कॉलेजमध्येही दुर्बिणीचा वापर प्राध्यापकांना आणि विज्ञान शाखेत शिकत नसलेल्या विद्यार्थ्यांनाही खगोलशास्त्राची ओळख करून देण्यासाठी केला जात असे.
तिळवी म्हणाले की, "NEP चा एक भाग म्हणून, आम्ही आता ज्या विद्यार्थ्यांना विज्ञानाची पार्श्वभूमी नाही अशा विद्यार्थ्यांना दुर्बिण सुविधेचा प्रवेश देण्यासाठी काम करत आहोत. शैक्षणिक वर्ष 2023 पासून ज्या विद्यार्थ्यांचा पदवीचा विषय विज्ञान नाही अशा विद्यार्थ्यांना खगोलशास्त्र आणि असे अभ्यासक्रम शिकता येतील. महाविद्यालयीन आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांना खगोलशास्त्राचे प्रशिक्षण सुरू झाले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.