मुंबई: स्थानिक क्रिकेटपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थान मिळेपर्यंत मुंबईत घडलेल्या यशस्वी जयस्वालने मुंबई क्रिकेट सोडून गोव्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने अर्ज केलेले ना हरकत प्रमाणपत्र मुंबई क्रिकेट संघटनेने मान्य केले आहे. त्यामुळे येत्या मोसमात यशस्वी गोव्याकडून खेळताना दिसेल.
मुंबई सोडून गोव्याकडे जाण्याचा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचे तो म्हणतो. आमच्यासाठी हे अनपेक्षित आहे, परंतु असे करण्यासाठी त्याने विचार केला असेल. आम्ही त्याची विनंती मान्य करून त्याला परवानगी दिली आहे, असे मुंबई क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
रणजी क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करून आणि शतके, द्विशतके केल्यानंतर यशस्वी जयस्वालला भारतीय कसोटी सामन्याचे दरवाजे उघडले होते.
जयस्वाल गेल्या मोसमात मुंबईकडून एकमेव रणजी सामना खेळला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नसेल आणि दुखापती नसतील, तर प्रत्येकाने देशांतर्गत सामने खेळायला पाहिजे, असा आदेश बीसीसीआयने काढल्यानंतर रोहित शर्मासह जयस्वालही जम्मू-काश्मीरविरुद्ध झालेल्या सामन्यात खेळला होता. रोहित, जयस्वाल, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे, असे नावाजलेले खेळाडू असतानाही मुंबईने तो सामना गमावला होता. जयस्वालला तर चार आणि २६ धावाच करता आल्या होत्या.
जयस्वालसह अर्जुन तेंडुलकर हे मुंबईचे खेळाडू गोव्यातून खेळतील. अर्जुन २०२२-२३ पासून गोव्यातून खेळत आहे. कसोटी सामन्यात रोहित शर्मानंतर पहिल्या पसंतीचा सलामीवीर आहे.
काय आहे कारण?
मुंबईत घडलेल्या जयस्वालने अचानक मुंबई सोडण्याचा का निर्णय घेतला असेल याचे तर्क लावले जात आहेत. मुंबई निवड समितीचे अध्यक्ष संजय पाटील यांनी व्यक्त केलेली नाराजी या मागचे कारण असू शकेल, अशी चर्चा आहे.
बीसीसीआयने रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची सक्ती केल्यानंतर जयस्वाल जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात खेळला होता, परंतु त्याच्यासह रोहित, सूर्यकुमार यांनीही निराशा केली होती. मुंबईने उपांत्य सामन्यात स्थान मिळवले. त्या सामन्यासाठी जयस्वालची निवडही झाली होती, परंतु सामन्याच्या आदल्या दिवशी त्याने गुडघा दुखावल्याचे कारण देत सामन्यातून अचानक माघार घेतली होती.
मुंबईचा विदर्भविरुद्धच्या त्या सामन्यात पराभव झाला होता आणि त्यानंतर संजय पाटील यांनी एका वर्तमानपत्राला मुलाखत देताना सीनियर खेळाडूंबाबत नाराजी व्यक्त केली होती. बीसीसीआयच्या सक्तीनंतर हे खेळाडू केवळ सहभागासाठी खेळतात. ते मन लावून खेळत नाहीत आणि त्याचा फटका संघाला बसतो, असे ते म्हणाले होते.
बीसीसीआय आणि निवड समितीने अशा खेळाडूंच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावे, असे संजय पाटील म्हणाले होते. ही टीका कदाचित जयस्वालने मुंबई सोडण्यामागे असू शकेल, अशी चर्चा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.