

साखळी: गुरववाडा-कुडणे भागात मंगळवारी रात्री एका घराला लागलेल्या भीषण आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शुभम रामकृष्ण सुर्लकर यांच्या घराच्या पडवीला आणि आतील खोलीला रात्री १०:३० च्या सुमारास अचानक आग लागली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी लाखोंची मालमत्ता आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे.
रात्रीच्या शांततेत आगीचे तांडव
घटनेच्या वेळी शुभम सुर्लकर यांची पत्नी आणि आई घरात होत्या. रात्रीच्या वेळी घराच्या पडवीच्या बाजूने काहीतरी जळण्याचा मोठा आवाज आल्याने शुभम यांच्या पत्नीने बाहेर जाऊन पाहिले. त्यावेळी त्यांना आगीच्या ज्वाळांनी रौद्ररूप धारण केल्याचे दिसले. त्यांनी तातडीने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आगीचा वेग इतका प्रचंड होता की ती काही वेळातच पसरत गेली.
घटनेची माहिती मिळताच डिचोली येथील अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, रस्ता अरुंद असल्याने अग्निशामक दलाचा बंब घरापर्यंत पोहोचू शकला नाही. अशा कठीण परिस्थितीत जवानांनी प्रसंगावधान राखत जवळील देव वेताळ मंदिर परिसरातून पाईप जोडले आणि पाण्याची फवारणी सुरू केली. अग्निशामक दलाच्या या अथक परिश्रमांमुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि सुर्लकर यांचे संपूर्ण घर जळून खाक होण्यापासून वाचले.
या आगीत घराची पडवी, साठवून ठेवलेले जळावू लाकूड आणि सुमारे २ टन भाताच्या गोण्या जळून राख झाल्या आहेत. विशेष म्हणजे, घराशेजारी उभी असलेली 'स्विफ्ट' कारही या आगीत पूर्णपणे जळाली आहे. या सर्व घटनेत सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सरपंच दामोदर पेठकर यांनी घटनास्थळी भेट देऊन सुर्लकर कुटुंबाचे सांत्वन केले आणि त्यांना लवकरात लवकर सरकारी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.