पणजी: डावखुरा अभिनव तेजराणा याचे मोसमातील तिसरे शतक, तसेच दहाव्या क्रमांकावरील राजशेखर हरिकांत याच्या आक्रमक अर्धशतकानंतरही गोव्याला रणजी करंडक क्रिकेट सामन्यात सौराष्ट्राविरुद्ध फॉलोऑनची नामुष्की टाळता आली नाही. २२७ धावांच्या पिछाडीनंतर तिसऱ्या दिवसअखेर दोन विकेट गमावल्यामुळे त्यांची आता पराभव टाळण्यासाठी धडपड सुरू आहे.
गोव्याचा संघ अजून दीडशे धावांनी मागे असून सौराष्ट्राला डावाने विजय मिळविण्यासाठी आणखी आठ विकेटची गरज आहे. एलिट ब गट सामना राजकोट येथे सुरू असून बुधवारी अखेरचा दिवस आहे. मंगळवारी दिवसाच्या अखेरच्या षटकात पहिल्या डावातील शतकवीर अभिनव तेजराणा (३४) याला पार्थ भूत याने पायचीत केल्यामुळे गोव्याला मोठा धक्का बसला.
त्यांनी दुसऱ्या डावात २ बाद ७७ धावा केल्या आहेत. सलामीचा मंथन खुटकर ३४ धावांवर खेळत आहे. पहिल्या डावात शून्यावर बाद झालेल्या सुयश प्रभुदेसाई (४) याला दुसऱ्या डावातही प्रतिस्पर्धी कर्णधार जयदेव उनाडकट याने पायचीत बाद केले.
सौराष्ट्राच्या ७ बाद ५८५ या घोषित धावसंख्येला उत्तर देताना गोव्याचा पहिला डाव २ बाद १२५ धावांवरुन ३५८ धावांत संपुष्टात आला. अभिनव याने १६७ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ११८ धावा केल्या. युवराजसिंग डोडिया याने त्याला बाद केले.
त्याने ललित यादव (५९) याच्यासमवेत तिसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. अभिनव बाद झाल्यानंतर गोव्याने १२ धावांत ४ विकेट गमावल्यामुळे त्यांची ६ बाद २११ अशी दाणादाण उडाली, त्यापैकी तीन विकेट एका धावेत पडल्या. सोमवारी जखमी निवृत्त झालेला कर्णधार स्नेहल कवठणकर पुन्हा फलंदाजीस आला, पण लगेच धावबाद झाला.
दीपराज गावकर (३३) व अर्जुन तेंडुलकर (२६) यांनी सातव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला पुन्हा दिलासा मिळाला, पण १४ धावांत आणखी ३ गडी बाद झाल्यामुळे गोव्याची ९ बाद २८५ अशी स्थिती होऊन फॉलोऑन निश्चित झाला.
तिसराच रणजी सामना खेळणाऱ्या राजशेखर याने अखेरचा गडी वासुकी कौशिक याच्यासमवेत किल्ला लढविला, पण डोडिया याने राजशेखरला पायचीत बाद करून गोव्याला फॉलोऑन निश्चित केला.
५५ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ६९ धावा केलेल्या राजशेखरने कौशिक याच्यासमवेत अखेरच्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. सौराष्ट्राचा २५ वर्षीय ऑफस्पिनर युवराजसिंग डोडिया याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना ९८ धावांत ६ गडी बाद केले. २५व्या प्रथम श्रेणी सामन्यात त्याने दुसऱ्यांदा डावात निम्मा संघ गारद करण्याची किमया साधली.
सौराष्ट्र, पहिला डाव : ७ बाद ५८५ घोषित
गोवा, पहिला डाव (२ बाद १२५ वरुन) : १०६.२ षटकांत सर्वबाद ३५८ (अभिनव तेजराणा ११८, स्नेहल कवठणकर १०, ललित यादव ५९, दीपराज गावकर ३३, दर्शन मिसाळ ०, अर्जुन तेंडुलकर २६, मोहित रेडकर ६, राजशेखर हरिकांत ६९, वासुकी कौशिक नाबाद ७, जयदेव उनाडकट १-४८, युवराजसिंग डोडिया ६-९८, पार्थ भूत २-७१).
गोवा, फॉलोऑननंतर दुसरा डाव : १६.३ षटकांत २ बाद ७७ (मंथन खुटकर नाबाद ३४, सुयश प्रभुदेसाई ४, अभिनव तेजराणा ३४, जयदेव उनाडकट १-१२, पार्थ भूत १-१७).
सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर ७५ धावांवर नाबाद असलेल्या अभिनव याने मंगळवारी सकाळी मोसमातील तिसरे शतक (११८) पूर्ण केले. याअगोदर त्याने चंडीगडविरुद्ध पदार्पणात २०५, तर पंजाबविरुद्ध १३१ धावा केल्या होत्या.
त्याने दोन अर्धशतकेही नोंदविली आहेत. रणजी करंडक स्पर्धेच्या एका मोसमात तीन शतके नोंदविणारा तो गोव्याचा नववा फलंदाज ठरला आहे. यंदा त्याने पाच सामन्यांतील आठ धावांत ९३च्या सरासरीने ६५१ धावा केल्या असून स्पर्धेतील फलंदाजांत तो सध्या अव्वल आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.