zoharan mamdani new york mayor Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

zoharan mamdani new york mayor: निवडणुकांच्या माध्यमातून सत्ताधारी बदलता येणे, हे लोकशाहीचे सर्वांत लोभस वैशिष्ट्य असते. मात्र प्रत्येक सत्तांतर म्हणजे जणू काही क्रांतीच घडते, असे नसते.

गोमंतक ऑनलाईन टीम

‘‘न्यूयॉर्क हे स्थलांतरितांचे शहर आहे आणि त्यांच्याकडूनच ते चालवले जाईल’’, अशी ग्वाही देणाऱ्या झोहरान ममदानी यांची महापौरपदी निवड झाली. ट्रम्प यांच्या भूमिकेला छेद देणाऱ्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिले, ही घटना अनेक अर्थांनी महत्त्वाची आहे.

निवडणुकांच्या माध्यमातून सत्ताधारी बदलता येणे, हे लोकशाहीचे सर्वांत लोभस वैशिष्ट्य असते. मात्र प्रत्येक सत्तांतर म्हणजे जणू काही क्रांतीच घडते, असे नसते. त्यातही स्थानिक पातळीवर निवडणुका होत असतील तर त्यांचे महत्त्व त्या भागापुरते मर्यादित असते. देशाच्या एकूण राजकारणासंबंधी त्यावरून काही निष्कर्ष काढणे योग्य नसते.

त्यामुळे अमेरिकेसारख्या मोठ्या देशातील एका शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीची इतरांनी दखल घेणे हे एरवी हास्यास्पदच ठरले असते. परंतु न्यूयॉर्कच्या महापौरांची निवडणूक याला अपवाद ठरली आहे. त्या निवडणुकीत मूळ भारतीय वंशाचे असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार झोहरान ममदानी यांच्या विजयाचे पडसाद केवळ त्या शहरात, त्या देशातच उमटले असे नाही तर जगभर त्याची चर्चा होत आहे.

त्याची कारणे समजून घ्यायला हवीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी झोहरान ममदानी यांच्या उमेदवारीला केलेला जाहीर विरोध, झोहरान यांची ‘मुस्लिम’ ओळख आणि त्यांनी प्रचारात सर्वसामान्य, कष्टकरी वर्गाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना फोडलेली वाचा यांमुळे निवडणुकीत रंगत आली होती.

अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत झोहरान यांनी अपक्ष उमेदवार अॅंड्यू कूमो यांचा पराभव केला. त्यानंतर केलेल्या भाषणात ट्रम्प यांच्या राजकारणावर जोरदार ताशेरे ओढले. ‘मी तरुण आहे, मुस्लिम आहे आणि लोकशाही समाजवादाचा विचार मांडतो…’ असे न्यू यॉर्क शहराच्या सिटी हॉलमध्ये उभे राहून सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. याला कारणही होते. या शहरात ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेतीलच नव्हे तर जगभरातील मुस्लिमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला होता.

त्यामुळे ही ओळख कायम ठेवून राजकारण करणे कठीण जाईल, असा सल्ला अनेकांनी दिला होता. पण तो न मानता आपले मुद्दे ते जिद्दीने मांडत राहिले. सध्या जगभरात धार्मिक विद्वेषावर स्वार होऊन राजकीय इप्सित साध्य करण्याचा सोपा मार्ग राजकारण्यांनी शोधून काढला आहे. ममदानींचा विजय हा अशा राजकारण्यांना सणसणीत चपराक म्हणावी लागेल. ९/११ नंतरच्या वातावरणात झालेला बदल ११/४ म्हणजेच ११व्या महिन्यातील चार तारखेला अधाेरेखित झाला.

ट्रम्प यांच्या कारकीर्दीत अमेरिकेतील ध्रुवीकरण वाढले, अधिक टोकदार झाले. स्थलांतरितांना आर्थिक, सांस्कृतिक कारणांनी विरोध ऊग्र होऊ लागला आहे. चिंतेची बाब ही की, ट्रम्प यांच्या धोरणांमुळे या असहिष्णुतेला एक प्रकारची अधिमान्यता मिळू लागली आहे. त्यातच आयातशुल्कास्त्रे सोडण्याचा सपाटा ट्रम्प यांनी लावल्याने देशांत महागाई वाढू लागली आहे.

या सगळ्याची खदखद कुठे ना कुठे या निवडणुकीवरही परिणाम करून गेली असणार, असे मानायला जागा आहे. अमेरिकेत पॅलेस्टाईनला पाठिंबा देणाऱ्यांची खुलेआम मुस्कटदाबी सुरु आहे. गाझापट्टीत हजारो बालक विध्वंसक हल्ल्यांमध्ये नाहीतर भूकेने जीव सोडताहेत, पण शक्तिशाली अमेरिकेत त्याविषयी आवाज काढण्याची मनाई आहे. झोहरान हे तरूण आहेत. त्यांचे कुटुंबीय हे मूळचे गुजरातचे, भारतीय वंशाचे. ममदानी कुटुंब गुजरातमधून अनेक वर्षांपूर्वी आफ्रिकेतील युगांडामध्ये स्थलांतरित झाले होते.

झोहरान यांचे वडील प्राध्यापक महमूद ममदानी हे न्यू यॉर्कमधील प्रसिद्ध कोलंबिया विद्यापीठात राज्यशास्त्र शिकवायचे. त्यांचे ‘गुड मुस्लिम, बॅड मुस्लिम’ हे पुस्तक गाजले होते. झोहरान यांची आई मीरा नायर या मूळच्या पंजाबी हिंदू. त्या नावाजलेल्या दिग्दर्शिका आहेत. न्यूयॉर्क हा तसा डेमोक्रेटिक पक्षाचा बालेकिल्ला. पण ट्रम्प यांनी या निवडणुकीत खास रस घेतला होता.

ममदानी निवडून आल्यास न्यूयॉर्कच्या एकूण अर्थसंकल्पातील ६.४ टक्के इतका केंद्रीय निधी रोखण्याची धमकी त्यांनी दिली. कायद्यानुसार काँग्रेसच्या मंजुरीशिवाय असे निधी थांबवण्याचा अधिकार नसतो. अगदी मतदानाच्या शेवटच्या रात्री ट्रम्प यांनी ‘एक्स’वरुन झोहरान यांच्याविरोधात पोस्ट केली होती.

स्वतःच्या म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार रिंगणात असतानासुद्धा ट्रम्प यांनी अपक्ष उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करून राजकीय खेळी खेळण्याचा शेवटचा प्रयत्न करुन पाहिला. पण ते सर्व प्रयत्न फोल ठरले. न्यूयॉर्क हे स्थलांतरितांचे शहर आहे आणि त्यांच्याकडूनच ते चालवले जाईल, अशीही ग्वाही देत ट्रम्प यांच्या भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

पंडित नेहरूंच्या ‘नियतीशी करार’ या भाषणातलं ‘इतिहासात क्वचितच असा क्षण येतो, जेव्हा आपण जुन्यातून नव्याकडे पाऊल टाकतो, जेव्हा एक युग संपते आणि दीर्घकाळ दाबून ठेवलेल्या राष्ट्राच्या आत्म्याला अभिव्यक्ती मिळते…’ हे वाक्य विजयानंतरच्या सभेत बोलताना झोहरान यांनी उद्‍धृत करून एकप्रकारे आपली नाळ लोकशाही समाजवादाचे पुरस्कर्ते असलेल्या नेहरूंशी जोडली.

यावरूनही या निवडणुकीला लाभलेले व्यापक परिमाण लक्षात येते. ऩ्यूयॉर्कमध्ये मूळ गुजरातेतील ममदानी हे महापौर झाले, तर व्हर्जिनियात मूळ हैदराबादच्या गजाला हाश्मी यांची `लेफ्टनंट गव्हर्नर’ पदावर निवड झाली. एकूणच ट्रम्पप्रणित राजकारणाच्या विरोधातील आवाज अधिकाधिक तीव्र होत आहे. स्थानिक निवडणुकीची दखल त्यासाठीच घ्यायची.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT