FIFA World Cup 2026: नेमारच्या खेळण्यावर अखेर शिक्कामोर्तब, मैदानावर दिसणार 'नेमार मॅजिक'! ब्राझीलचा संघ जाहीर, प्रतिस्पर्ध्यांचं टेन्शन वाढलं

FIFA World Cup 2026 Brazil squad: फिफा विश्वचषक २०२६ च्या महाकुंभासाठी पाच वेळच्या जगज्जेत्या ब्राझील संघाने आपल्या २६ खेळाडूंच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे.
FIFA World Cup 2026 Brazil squad
FIFA World Cup 2026 Brazil squadDainik Gomantak
Published on
Updated on

फिफा विश्वचषक २०२६ च्या महाकुंभासाठी पाच वेळच्या जगज्जेत्या ब्राझील संघाने आपल्या २६ खेळाडूंच्या नावांची अधिकृत घोषणा केली आहे. मुख्य प्रशिक्षक कार्लो अंसेलोटी यांनी १९ मे रोजी रिओ दि जानेरो येथील प्रसिद्ध 'म्युझियम ऑफ टुमारो'मध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा संघ जाहीर केला. या संघात चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या ३४ वर्षीय अनुभवी स्टार फॉरवर्ड नेमार ज्युनियरचा (Neymar Jr.) समावेश करण्यात आला आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ११ जून ते १९ जुलै या कालावधीत हा फुटबॉलचा थरार रंगणार आहे.

दुखापतींचे सावट झुगारून नेमारची संघात एन्ट्री

गेल्या मार्च महिन्यात झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांमधून वगळण्यात आल्यामुळे नेमारच्या विश्वचषक खेळण्याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. गेल्या वर्षभरात हॅमस्ट्रिंग आणि गुडघ्याच्या गंभीर दुखापतींशी सामना करणाऱ्या या सँटोसच्या फॉरवर्डने २०२३ पासून ब्राझीलसाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नव्हता.

मात्र, देशासाठी विश्वचषक खेळण्याची त्याची तीव्र इच्छा आणि त्याचा अनुभव लक्षात घेता अंसेलोटी यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. नेमारच्या जोडीला रिअल माद्रिदचा विनिशिअस ज्युनियर, बार्सिलोनाचा राफिन्या, पीएसजीचा मार्क्विनहोस आणि आर्सेनलचे गॅब्रिएल मार्टिनेली व गॅब्रिएल मगालेझ यांसारख्या स्टार खेळाडूंना संघात स्थान मिळाले आहे.

"परफेक्ट नव्हे, तर 'लढाऊ' संघ विश्वचषक जिंकणार" - मुख्य प्रशिक्षक

संघाच्या घोषणेदरम्यान माध्यमांशी बोलताना मुख्य प्रशिक्षक कार्लो अंसेलोटी यांनी संघाची रणनीती स्पष्ट केली. ते म्हणाले, "जगात कोणतीही गोष्ट परफेक्ट नसते आणि कोणताही परफेक्ट संघ विश्वचषक जिंकू शकत नाही कारण तसा संघ अस्तित्वातच नाही. जो संघ संकटात अधिक चिवट आणि लढाऊ वृत्ती दाखवेल, तोच जगज्जेता बनेल. आम्हाला जगातील सर्वात लढाऊ संघ बनायचे आहे." याशिवाय, ब्राझीलचे ध्येय फक्त आणि फक्त विजेतेपद मिळवणे हेच असून संघातील खेळाडू त्यासाठी पूर्णपणे प्रेरित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

२४ वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी ब्राझील सज्ज; असे आहे वेळापत्रक

फुटबॉलच्या इतिहासात ब्राझील हा ५ वेळा (१९५८, १९६२, १९७०, १९९४, २००२) विश्वचषक जिंकणारा सर्वात यशस्वी देश आहे, परंतु गेल्या २४ वर्षांपासून त्यांना या ट्रॉफीवर नाव कोरता आलेले नाही. यंदा ग्रुप 'सी' मध्ये असलेल्या ब्राझीलचा पहिला सामना १३ जून रोजी न्यूयॉर्क येथे मोरोक्कोविरुद्ध होणार आहे. त्यानंतर १९ जून रोजी फिलाडेल्फियामध्ये त्यांचा सामना हैतीशी होईल, तर २४ जून रोजी मियामीमध्ये स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्याने त्यांची साखळी फेरी संपेल.

फिफा विश्वचषक २०२६ साठी निवडलेला संपूर्ण ब्राझील संघ:

  • गोलरक्षक: अ‍ॅलिसन, एडरसन, वेव्हर्टन.

  • रक्षक: अ‍ॅलेक्स सँड्रो, ब्रेमर, डॅनिलो, डग्लस सँटोस, गॅब्रिएल मगालेझ, इबानेझ, लिओ पेरेरा, मार्क्विनहोस, वेस्ली.

  • मिडफिल्डर्स: ब्रुनो गुइमारेस, कॅसेमिरो, डॅनिलो सँटोस, फॅबिन्हो, लुकास पाक्वेटा.

  • फॉरवर्ड्स: एंड्रिक, गॅब्रिएल मार्टिनेली, इगोर थियागो, लुईझ हेन्रीक, मॅथ्यूस कुन्हा, नेमार ज्युनियर, राफिन्या, रायन, विनिशिअस ज्युनियर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com