मिलिंद म्हाडगुत
परवा परवा फोंडा येथे झालेल्या माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांच्या शोकसभेत भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काँग्रेस नेत्यांनी रवि नाईक यांच्या निधनाची दखल घेतली नसल्याचे विधान करून काँग्रेसवर जाहीर ताशेरे ओढले.
त्यामुळे श्रद्धांजलीच्या मुद्द्यापेक्षा ‘रविंमुळे गोव्याची काँग्रेस मोठी झाली होती’, या त्यांच्या मुद्द्यावर मुख्य चर्चा सुरू होती. तसे पाहायला गेल्यास दामूंच्या या विधानात अगदीच अतिशयोक्ती आहे असे म्हणता येणार नाही.
गोव्याच्या काँग्रेसजवळ रविंसारखा बहुजन समाजाचा दुसरा नेता नव्हता आणि आजही नाही, हे कोणीही मान्य करेल. २५ जानेवारी १९९१ रोजी रवि मगो सोडून काँग्रेसमध्ये येऊन मुख्यमंत्री झाले. तोपर्यंत काँग्रेसजवळ प्रतापसिंग राणे हे एकमेव मोठे नेते होते.
विली डिसोझा, लूइझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दिन यांसारखे नेते काँग्रेसजवळ होते खरे पण त्यांना राज्यव्यापी नेते म्हणता येणार नाही. त्यामुळे रवींच्या एन्ट्रीने काँग्रेसला फायदा झाला यात शंकाच नाही. रविंमुळे बहुजन समाज - खास करून भंडारी समाज - काँग्रेसकडे वळला हेही तेवढेच खरे आहे.
पूर्वी हा समाज मगोकडे असायचा. रवि काँग्रेसकडे वळल्यावर हाही घटक काँग्रेसकडे वळला. त्यामुळे साहजिकच काँग्रेस पक्ष गोव्यात अधिक बळकट होत गेला. आता रविंना काँग्रेसने न्याय दिला की काय, यावरही विचार करावा लागेल.
१९९१साली काँग्रेसने रविंना मुख्यमंत्री केले. पण ती काँग्रेसची गरज होती. त्यावेळी रविंना काँग्रेसमध्ये आणून मुख्यमंत्री केले नसते तर मगोचे रमाकांत खलप मुख्यमंत्री झाले असते आणि मगो परत सत्तेवर आला असता.
रवि मुख्यमंत्री झाल्यामुळे मगो सत्तेतून बाहेर फेकला गेला तो कायमचाच. १९९४साली मगो- भाजप युती होऊनही काँग्रेस सत्तेवर येऊ शकली ते केवळ रविंच्या प्रभावामुळे. त्यावेळी जरी मडकईमध्ये रविंचा पराभव झाला असला, तरी ‘रवि फॅक्टर’चा परिणाम गोव्यातील बहुजन समाजावर झाला होता, यात संशयच नाही. त्यामुळेच विपरीत परिस्थिती असूनसुद्धा काँग्रेस सत्तेवर येऊ शकली यातही दुमत असण्याचे कारण नाही.
‘तुमचे काम व्हायला हवे तर काँग्रेसमध्ये या’, असे त्यावेळी मुख्यमंत्री असलेले रवि मगो कार्यकर्त्यांना सांगताना दिसायचे. आणि या आव्हानाला भुलून अनेक युवक त्या काळात काँग्रेसमध्ये जाताना दिसत होते.
विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर १९९८मध्ये काँग्रेसने रविंना लोकसभेची उत्तर गोव्याची उमेदवारी दिली. तिथे ते जिंकले खरे पण अगदी कमी फरकाने. आपल्याला उत्तर गोव्यातील काँग्रेस आमदारांनी सहकार्य केले नाही म्हणून आपण अगदी कमी मतांनी निवडून आलो असे रवि त्यावेळी जाहीरपणे सांगायचे. नंतर २००७साली त्यांच्यावर खरा अन्याय झाला. या अन्यायाचे फळ काँग्रेस आजसुद्धा भोगतो आहे.
२००७सालच्या निवडणुकीत रवि गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी गोवा अक्षरशः पिंजून काढला होता. ते फोंड्यातून निवडणूक लढवीत असले तरी ते गोवाभर फिरताना दिसत असत. त्यामुळे साहजिकच त्यांचे फोंड्याकडे दुर्लक्ष होऊ लागले होते.
मला त्यांनी त्यावेळी आपला अधिकृत प्रवक्ता केले होते आणि सगळी जबाबदारी आम्हा कार्यकर्त्यांवर टाकून ते गोवाभर काँग्रेसचा प्रचार करण्याकरता फिरत होते. या त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच काँग्रेसला फोंड्यासह १६ आणि राष्ट्रवादीला ३ अशा युतीला एकूण १९ जागा मिळाल्या होत्या.
त्यामुळे रवि मुख्यमंत्री व्हायला हवे होते असे सर्वांना वाटत होते. ते होणारही होते पण मगोचे ढवळीकर बंधू व त्यावेळी अपक्ष म्हणून निवडून आलेले विश्वजित राणे यांनी, रवि मुख्यमंत्री झाल्यास आपण काँग्रेसला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे रविंच्या हातातोंडाशी आलेला मुख्यमंत्रिपदाचा घास निसटला.
खरे तर त्यावेळी ‘सेव्ह गोवा’तर्फे निवडून आलेले चर्चिल आलेमाव व आलेक्स रेजिनाल्ड यांचा पाठिंबा घेऊन काँग्रेस सरकार स्थापन करू शकली असती. पण तसे न करता काँग्रेसने त्यावेळी नव्यानेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या दिगंबर कामत यांना मुख्यमंत्री करून टाकले.
पण त्यामुळे २०१२साली काँग्रेसचे पानिपत झाले. त्यांना फक्त नऊच जागा प्राप्त होऊ शकल्या. तेव्हापासून काँग्रेस सत्तेवरून गेली ती अजूनपर्यंत परत येऊ शकलेली नाही. रवि मुख्यमंत्री असते तर २०१२साली काँग्रेसची अशी दुर्दशा झाली नसती, असे मानणारा एक वर्ग आजसुद्धा काँग्रेसमध्ये आहे.
याचे मुख्य कारण म्हणजे रविंकडे जे संघटन कौशल्य, जी निर्णयक्षमता होती तेवढी दिगंबर कामत यांच्याकडे त्यावेळी तरी दिसली नव्हती, हेच होय. तत्कालीन विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनीसुद्धा ते त्यावेळी मान्य केले होते. त्यामुळेच काँग्रेसला सत्ता गमवावी लागली असे जे म्हटले जाते ते खरे वाटायला लागत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.