

मिलिंद म्हाडगुत
माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांना जाऊन आता अकरा दिवस होत आहेत; पण अजूनही त्यांच्या स्मृतींचा दरवळ बहरत आहे. त्यांच्या अगणित आठवणी संपता संपत नाहीत. रवि म्हणजे अनेक क्षेत्रात एकाच वेळी वावरणारे असे बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व होते.
१९८६ साली झालेल्या भाषिक आंदोलनातील त्यांचा सहभागही असाच लक्षणीय होता. त्यावेळी रवि फोंड्याचे आमदार असले तरी ते विरोधी पक्ष मगोत होते. मगो पक्ष मराठीच्या बाजूने असल्यामुळे रविही मैदानात उतरले होते. त्यावेळची ती चळवळ म्हणजे एक युद्धच होते. रस्त्यावर उतरून केलेले युद्ध. त्यावेळी गोवा या भाषिक मुद्द्यावरून विभागला गेला होता. दक्षिण गोव्यात कोकणी राजभाषा व्हावी म्हणून चळवळ, तर उत्तर गोव्यात मराठी राजभाषा व्हावी म्हणून चळवळ.
मी फोंड्यात राहत असलो तरी मी ज्या महाविद्यालयात शिकवत होतो ते जुवारीनगर-दाबोळी येथे असल्यामुळे मला स्कूटरवरून लोटलीमार्गे जावे लागत असे. तेव्हा आंदोलन हिंसेच्या वाटेने जायला लागले होते. त्यामुळे वाटेवरून जाणाऱ्या लोकांना अडविणे, त्यांच्या वाहनाच्या टायरातली हवा काढणे, दमदाटी करणे, प्रसंगी मारहाणसुद्धा करणे असे प्रकार त्या भागात सुरू झाले होते.
फोंड्याहून वास्को आदी भागाकडे जाणाऱ्या बसेस बंद असल्यामुळे स्कूटरशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नसायचा. तरीसुद्धा ते एक झपाटलेपण होते यात शंकाच नाही. माझ्यासारखे अनेक युवक असा धोका पत्करून त्याकाळी या मराठीच्या चळवळीत सहभागी झाले होते आणि आमचे नेते होते ते रवि नाईक!
ते प्रथमच आमदार झाले असले, तरी त्यांच्याकडे नेतृत्वाचा अनुभव होता. कूळ-मुंडकार संघटना असो वा जनमत कौलाच्या वेळी केलेले विलीनीकरण विरोधकांचे नेतृत्व असो, रविंना सकारात्मक नेतृत्वाचा बराच अनुभव होता. या त्यांच्या अनुभवाचा आम्हाला ठायी ठायी प्रत्यय येत होता. बोरी पुलापासून बाणस्तारी पुलापर्यंत त्यांचा संचार असायचा.
त्यावेळचे आंदोलन हे रस्त्यावरचे आंदोलन असल्यामुळे त्यांचे अस्तित्व आम्हाला ऊर्जा देऊन जात असे. तसे त्यावेळचे कुंभारजुव्याचे आमदार डॉक्टर काशिनाथ जल्मी तसेच फोंड्याचे माजी आमदार रोहिदास नाईक, गजानन रायकर हेही आमच्याबरोबर असायचे. पण ते रस्त्यावर येत नसत. त्यामुळे, रविंचे नेतृत्व जास्त प्रभावी ठरले होते.
बैठ्या आंदोलनात रवि आमच्याबरोबर रस्त्यावर धरणे धरून बसत असत. हिंसेचे उत्तर हिंसेने द्यायची तयारीही त्यांनी ठेवली होती. त्यामुळे फोंड्यात तरी भाषिक चळवळीस हिंसक वळण लागले नाही. इथे तशी ती मवाळच राहिली. पण दक्षिण गोवा मात्र भाषिक चळवळीने पेटला होता. त्याची धग अप्रत्यक्षरीत्या का होईना आम्हालाही लागत होती. शेवटी कोकणी भाषा गोव्याची राजभाषा झाली.
पण खरे सांगायचे तर त्यावेळी एक रवि वगळता या चळवळीतले इतर नेते अगदीच थिटे पडले असेच म्हणावे लागेल. म्हणूनच तर मडगाव जेव्हा पेटले होते तेव्हा एक रवि वगळता त्या मडगावकर मराठीप्रेमींच्या मदतीला जाण्याचे धाडस मराठी चळवळीतला एकही नेता दाखवू शकला नाही. रवि मात्र एकटेच बंदूक घेऊन मडगावात फिरताना दिसत होते. आणि त्यांच्यामुळेच मडगावातील बंद झालेली दुकाने उघडू शकली. ‘रविंमुळेच मडगाव उघडले’ असा मथळा त्यावेळी गोव्यातील अनेक दैनिकांनी दिला होता!
एकंदरीत मराठी गोव्याची राजभाषा व्हावी म्हणून केलेले आंदोलन फसले असूनही रवि ‘हिरो’ ठरले होते. त्यानंतरही अनेक वेळा याचा उल्लेख केला जात असे. नंतर ‘गोमंतक मराठी अकादमी’च्या स्थापनेसाठी निधी जमवण्याकरता दैनिक ‘गोमन्तका’चे तत्कालीन संपादक नारायण आठवले यांनी जी झोळी यात्रा काढली होती तेव्हाही फोंड्यात आमच्याबरोबर रवि होते.
आणि रविमुळे काही तासातच आठवलेंच्या झोळीत पंधरा हजार रुपये (१९८७सालचे) जमा झाले होते. रविंचा करिष्माच असा असायचा. पण नंतर मात्र रवि या राजभाषा मुद्द्यावर विशेष बोलत नाहीसे झाले. कोकणी ही गोव्याची राजभाषा आहे ही वस्तुस्थिती मान्य करून इंग्रजी बोलणाऱ्या गोव्याबाहेरच्या अधिकाऱ्यांना, ‘अरे कोकणी गोव्याची राजभाषा आहे, कोकणीत बोल!’, असा आग्रह करायचे.
मराठी चळवळीत स्वतःला झोकून देऊन मराठीकरता झगडणारे ते ‘डॅशिंग’ रवि आजही स्मृतीतून पुसले जात नाहीत हेच खरे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.