Goa Culture Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Culture: थोरली चांदई विरुद्ध धाकटी चांदई! अवघ्या 17 घरांच्या वाड्यात दडलंय गोमंतकीय संस्कृतीचं मोठं गुपित; पर्यटकांना भुरळ घालणारं 'पीर्ण' गाव

Pirna Culture and Traditions In Goa : बार्देश तालुक्याच्या उत्तर-पूर्व टोकाला वसलेले पीर्ण हे गाव म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

नारायण लक्ष्मण चांदेकर

बार्देश तालुक्याच्या उत्तर-पूर्व टोकाला वसलेले पीर्ण हे गाव म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि परंपरेचा सुंदर संगम आहे. या गावातील सात वाड्यांपैकी आमचा वाडा म्हणजे चांदई. विशेष म्हणजे चांदईचे दोन भाग आहेत - थोरली चांदई आणि धाकटी चांदई. थोरल्या चांदईत घरांची संख्या अधिक, तर धाकट्या चांदईत अवघी सतरा-अठरा घरे. जणू एका आईच्या दोन लेकरांप्रमाणे गावकऱ्यांनी त्यांना प्रेमाने ही नावे दिली आहेत.

आजही एखादा परका माणूस ‘चांदई’ शोधत आला, तर गावकरी प्रथम विचारतात, ‘थोरल्या चांदईला की धाकट्या चांदईला?’ कारण या नावांमध्ये केवळ ओळख नाही, तर गावाच्या इतिहासाची आणि आपलेपणाची भावना दडलेली आहे.

पूर्वी पीर्ण हे पूर्णपणे कृषिप्रधान गाव होते. गावाच्या काठाने वाहणारी शापोरा नदी हे येथील जीवनाचे मुख्य आधारस्थान. विशेष म्हणजे ज्या-ज्या गावांतून ही नदी वाहते, त्या त्या गावातील लोक तिला आपल्या गावाच्या नावाने संबोधतात. पीर्णमध्ये ती पीर्ण नदी, कोलवाळमध्ये कोलवाळ नदी, शिवोलीत शिवोलीची न्है, तर शेवटी शापोऱ्यात शापोरा नदी म्हणून ओळखली जाते. ही नावे लोकांच्या नदीवरील प्रेमाचीच साक्ष देतात.

पीर्णची ग्रामदेवता म्हणजे श्री शांतादुर्गा देवी. धाकट्या चांदईतील श्री भवानी देवी आमची कुलदेवता आहे. ग्रामदेवता आणि कुलदेवतेप्रती असलेली श्रद्धा गावकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दरवर्षी पाडवा पंचमीपासून सुरू होणारा श्री शांतादुर्गा देवीचा सप्ताह उत्सव हा गावाच्या सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू असतो. सात ते आठ दिवस चालणाऱ्या या उत्सवात प्रत्येक वाड्याला एक दिवस दिला जातो.

त्या दिवशी गावकरी विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि कलात्मक कार्यक्रम सादर करून देवीच्या चरणी आपली भक्ती अर्पण करतात. सप्ताहभर अखंड भजन सुरू असते. गावातील ज्येष्ठ तसेच नवोदित कलाकार या भजनात सहभागी होतात. त्यामुळे संगीताची आणि भक्तीची परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे पोहोचते.

सप्ताहादरम्यान पंढरपूरच्या विठोबाच्या स्वरूपातील श्री पांडुरंगाची मूर्ती देवळात प्रतिष्ठापित केली जाते. कोलवाळमधील कलाकार ही मूर्ती तयार करतात. उत्सवानंतर ती गावाच्या नदीकाठी विसर्जित केली जाते. हा सोहळा श्रद्धा, परंपरा आणि सामुदायिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो. पीर्ण आणि चांदईचा इतिहासही तितकाच अभिमानास्पद आहे. गोवा मुक्तिसंग्रामात या गावातील अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.

त्यांच्या स्मरणार्थ गावाच्या तिठ्यावर उभारण्यात आलेले स्मारक आजही नव्या पिढीला प्रेरणा देत उभे आहे. धार्मिकतेसोबतच गाव विकासाच्या दिशेनेही वाटचाल करत आहे. ग्रामदेवतेच्या मंदिराबरोबरच देसाईवाड्यात नवीन गणेश मंदिर उभे राहिले आहे. लक्ष्मीनारायण मंदिराचे बांधकामही सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर गावाच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर पडणार आहे.

गावात खाणकाम नाही, मोठे उद्योग नाहीत, रेल्वे नाही किंवा मोठ्या वसाहतीही नाहीत. त्यामुळे येथील जीवन आजही शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यात आहे. मात्र, बदलत्या काळाबरोबर शेती मागे पडत चालली आहे. पूर्वी हिरव्यागार शेतांत राबणारे शेतकरी आता थकले आहेत आणि अनेक शेतजमिनी ओसाड होताना दिसतात.

रस्त्यांवर भटकणारी गाईगुरे पाहून जुन्या पिढीच्या मनात हळहळ निर्माण होते. तरीही विकासाचे नवे चित्र गावात दिसते. वाड्यावाड्यांपर्यंत रस्ते पोहोचले आहेत. श्री शांतादुर्गा विद्यालयानेही मोठी प्रगती केली असून केजीपासून उच्च माध्यमिक तसेच कला आणि वाणिज्य शाखेपर्यंत शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

पावसाळा सुरू झाला की, चांदईचे सौंदर्य अधिक खुलते. भरून वाहणारे ओढे, डोंगरकपारीतून कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेले डोंगर आणि दऱ्या यामुळे संपूर्ण परिसर नववधूप्रमाणे सजून जातो. शापोरा नदीची अखंड साथ आणि निसर्गाची मुक्त उधळण लाभलेली चांदई म्हणजे खऱ्या अर्थाने गोमंतकीय संस्कृती, श्रद्धा आणि सौंदर्य यांचा जिवंत वारसा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

"आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT