

सर्वेश बोरकर
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात भगूर गाव मातृभूमीसाठी केलेल्या त्यागामुळे ओळखले जाते. महाराष्ट्रातील शहरांमधून नाशिकहून बस किंवा इतर वाहतुकीच्या साधनांनी भगूरला पोहोचता येते. तथापि, या गावाच्या नावामागे शेकडो वर्षांचा इतिहास दडलेला आहे. महर्षी भृगू या ऋषींचा गौरवशाली इतिहास, शिवकाळातील कथा आणि पेशव्यांचा पराक्रम आजही भगूर गावाभोवतीच फिरतात. मुघलांकडून मराठ्यांनी जिंकलेले पहिले नाशिकचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवणीशिवाय ते अपूर्णच. त्याहूनही ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे गाव म्हणून आठवणीत आहे. ’ने मजसी ने परत मातृभूमीला..’ या कवितेचे कवी विनायक दामोदर सावरकरांचे भगूर हे ते गाव.
नाशिक जिल्ह्यातील भगूर हे प्राचीन काळापासून एक प्रसिद्ध गाव. महर्षी भृगू हे भगूरचे सुरुवातीचे रहिवासी होते. भगूरवर लिहिलेल्या सावरकरांच्या ’भार्गव’ या कवितेत गावाच्या महानतेचे वर्णन आहे. सावरकर घराण्यामुळे हे गाव जगप्रसिद्ध झाले. सावरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे, हे गाव नेहमीच चळवळीचे केंद्र मानले जात असे, कारण स्वातंत्र्य चळवळीदरम्यान भगूरमध्ये नेहमीच ब्रिटिश पोलिसांचा बंदोबस्त असे. येथील सशस्त्र आंदोलनांमुळे इंग्लंडमध्ये भगूर हे भारतातील एक ’खोडकर गाव’ म्हणून ओळखले जात असे.
महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व विभागाने नाशिकपासून सुमारे १७ किलोमीटर आणि सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या देवळालीपासून तीन-चार किलोमीटर अंतरावर असलेल्या भगूर येथील त्यांच्या वाड्याच्या संपूर्ण संवर्धनाचे उत्तम काम केले आहे. ६,६५० चौरस मीटर परिसरात पसरलेल्या या वाड्यात, जिथे १८८३मध्ये स्वतंत्र वीर सावरकरांचा जन्म झाला होता, तिथे दररोज पर्यटक भेट देतात. १९९५-१९९६मध्ये या वाड्याला स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. तत्कालीन आघाडी सरकारने सावरकरांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. सावरकरांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी हे स्मारक उभारले. एक स्मारक समितीही स्थापन करण्यात आली.
सावरकरांच्या आईच्या मृत्यूनंतर बांधलेले जुने आणि नवीन असे दोन्ही वाडे जतन केले गेले आहेत. घरामागील दोन सुरक्षा निवासस्थानांचीही पुनर्बांधणी केली गेली. महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व खात्याने सावरकरांच्या निवासस्थानाला ताब्यात घेऊन त्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू केले, पूर्वी वाड्यातली जमीन मातीची होती, आता तिथे फरश्या बसवल्या आहेत, छतावर नवी कौले टाकली आहेत. पूर्वी वाळवी लागलेले जिने भक्कम करून त्यांना व्यवस्थित पॉलिश केलेले आहे. वाड्याची निगा आता उत्तम प्रकारे राखली जातेय. स्वातंत्र्यवीरांचे जन्मस्थान असलेला हा वाडा दुमजली आणि प्रशस्त आहे. व्हरांडा, आतील खोल्या, माजघर, देवघर, अंतर्गत जिने, पोटमाळा यांनी परिपूर्ण आहे.
वाड्यात आता ठिकठिकाणी स्वातंत्र्यवीरांच्या जीवनातील विविध छायाचित्रे, त्यांचा जीवनपट व्यवस्थितरीत्या मांडलेला आहे. सावरकरांनी स्वतः त्यांच्या आत्मचरित्रात त्यांच्या जन्मस्थानाबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे, ज्यात सावरकर कुटुंब भगूरला कसे आले याचे वर्णन आहे. सावरकर कुटुंब मूळचे रत्नागिरीतील गुहागर येथील सावर गावातील दीक्षित घराण्याचे होते. सावर गावचे रहिवासी असल्याने त्यांना सावरकर म्हटले जात असे.
पेशव्यांच्या वसई मोहिमेनंतर, पेशवे बाळाजी बाजीराव यांनी नारायण दीक्षित (स्वातंत्र्यवीर सावरकर हे नारायण दीक्षित यांच्या आठव्या पिढीतील वंशज होते), पेशव्यांचे सरदार रानोजी बलकवडे आणि सरदार धोपावकर यांना नाशिक प्रदेश ताब्यात घेण्याची जबाबदारी दिली. या त्रिकुटाच्या सैन्याने त्रिंगलवाडी किल्ला आणि कवनाई किल्ला ताब्यात घेऊन नाशिक शहरात प्रवेश केला.
काझीगडी येथे मुघलांविरुद्ध एक मोठी आघाडी उघडली गेली आणि नाशिक पहिल्यांदाच पेशव्यांच्या नियंत्रणाखाली आले. या कामगिरीने प्रसन्न होऊन पेशव्यांनी भगूरजवळील राहुरी गाव सावरकर आणि धोपावकर यांना, तर जहांगीर गाव बलकवडे यांना दिले. कालांतराने, सावरकर कुटुंब भगूरला स्थायिक झाले. त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केले आहे की, लहानपणी राहुरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जहांगीरपुत्र म्हणून स्वागत केले जात असे.
त्यांचे पूर्वीचे घर म्हणजे आजचा सावरकरवाडा. त्यांचे वडील दामोदर सावरकर यांच्या आई, पणजोबा कधी काळी एकदा चोरांचा पाठलाग करत असताना त्यांना अष्टभुजा भवानीची मूर्ती सापडली. ही मूर्ती पुढे सावरकर घराण्याची कुलदेवता बनली. ही मूर्ती खंडोबा येथील मंदिरात स्थापित करण्यात आली. तथापि, दामोदरच्या स्वप्नात देवीने सांगितले, मला घरी घेऊन जा, आणि ही मूर्ती सावरकरवाड्याची शान बनली. तथापि, १८९८च्या प्लेगच्या साथीनंतर, वयाच्या १५व्या वर्षी, सावरकरांनी देवी अष्टभुजाच्या मूर्तीसमोर शंखनाद करून, ‘सशस्त्र क्रांतीचा सेतू बांधेत आणि मरेस्तोवर लढेन’, अशी शपथ घेतली. तेव्हापासून अष्टभुजा देवी स्वातंत्र्यलक्ष्मी म्हणूनही ओळखली जाऊ लागली.
सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान सर्वश्रुत आहे. सावरकरांचे मोठे बंधू, गणेश(बाबाराव)देखील स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत तरुणांना संघटित करण्यासाठी मित्रमेळ्याची स्थापना केली. सावरकरांनी स्वातंत्र्याची शपथ घेतल्यानंतर, देवीला अर्पण करण्यासाठी मूर्ती खंडोबा मंदिरात परत आणण्यात आली आणि ती आजही तिथेच आहे. खंडोबा मंदिरात सावरकर कुटुंबाची पालखीसुद्धा ठेवली जात असे.
नाशिकला भेट देत असताना, भगूरमधील सावरकर यांच्या वाड्याला भेट देणे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात रमून जाणाऱ्या अनुभवाची अनुभूती. अशा ह्या अतुलनीय साहस, असीम राष्ट्रभक्ती तसेच मृत्यूलाही न जुमानणारी प्रचंड ध्येय शक्ती व समुद्रालाही शरण आणणारी निर्भिडता आणि हजारो क्रांतिकारकांची प्रेरणा असणाऱ्या स्वातंत्र्य क्षितिजावरील सूर्याला म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना परवा झालेल्या त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.