गोवा म्हणजे सत्यभामेच्या अंगणातला प्राजक्त फुलांचा सडा. नेहमीच रुक्मिणीच्या अंगणात स्वस्तिक रेखित गेला. तसे कितीतरी सांगीतिक प्राजक्त गोव्याने महाराष्ट्रासाठी लावले. त्यातले एक पंडित सांबप्रसाद सावकार! सावकार कुणाला नंतर हवाहवासा वाटत नसतो; पण हवाहवासा सावकार ही गोव्याची उपज! सांब हे शंकराचे शांत रूप म्हणून पाळण्यात प्रसादाआधी सांब आले असावे आणि प्रसाद म्हणजे ‘प्र’भुचे ‘सा’ क्षात् ‘द’र्शन! सांगीतिक अवकाशात अढळ असे अनेक ‘ध्रुव’ होऊन गेले. पण, गळून पडल्यावरही उल्का होत नाही, असा हा तारा.
शिकवणे म्हणजे तर दुसरा रियाज. या वयात पंडित विश्वनाथजी कान्हेरेंसारखा संवादिनीचा समानार्थी शब्द आणि हुकमत मानणारे लोक त्यांच्या समोर शिष्य म्हणून बसत होते, यावरून ही प्रसाद वाटणारी सावकारी किती निर्व्याज्य वा बिनव्याजी होती हे सहज लक्षात येते. कीर्तीचा स्वर्ग दोन बोटे उरला हा अहंतेचा स्पर्श नको म्हणून तर ९८व्या वर्षी भैरवी गायले नाहीत ना, हा प्रश्न मनात कायम घुमत राहतो.
काही कलाकार स्वर जिंकतात, काही श्रोते जिंकतात; पण प्रसाद सावकार यांनी माणसेही जिंकली. गोवा (Goa), महाराष्ट्रच नाही, तर देशविदेशांत त्यांचे चाहते होते. समर्थ गायक अन् कसलेले अभिनेते असल्याने त्यांच्या सादरीकरणात स्वर, अभिनयाचा अद्वितीय मिलाफ कायम राहिला. स्वरात दर्प नव्हता, दर्पण होते. ज्याने स्वतःचे प्रतिबिंब पाहावे, आत्मपरीक्षण करावे व अधिक निर्मळ व्हावे. त्यांच्या बैठकीत तालीम होती, ताठरपणा नव्हता; शिस्त होती, शिक्षा नव्हती; गुरुत्व होते, गुरुगिरी नव्हती. म्हणून त्यांच्या सहवासातून बाहेर पडणारा प्रत्येक शिष्य गायक राहत नसे, तो संस्कारांचा वाहक बनत असे.
‘रंगदेवता’ ही पदवी ज्यांना प्रत्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल यांचे बंधू व स्वातंत्र्यसेनानी विठ्ठल भाई पटेल यांनी दिली होती, त्या संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ नट रघुवीर सावरकर यांचे पद्मश्री प्रसाद सावकार हे पुत्र. त्यांच्या वडिलांची ‘रंगबोधेच्छू’ ही नाटक कंपनी बडोदे संस्थानच्या दौऱ्यावर असताना तिथल्या मुक्कामी १४ डिसेंबर १९२८ रोजी प्रसाद यांचा जन्म झाला. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी त्यांच्या चेहऱ्याला रंग लावून ‘जिंजीहून सुटका’ या नाटकामध्ये बाल शिवाजी म्हणून उभे केले आणि अशाप्रकारे रंगभूमीवर त्यांचा पहिला प्रवेश झाला.
रंगभूमीवरचा त्यांचा वावर सात दशकांचा. ‘सौभद्र’मध्ये अर्जुन, नारद आणि कृष्ण या तीनही भूमिका त्यांनी केल्या. ‘संशयकल्लोळ’मधील साधू, वैशाखशेठ, अश्वीनशेठ, फाल्गुनराव आणि कृतिकाही रंगवली. ‘कट्यार काळजात घुसली’मध्ये सुरवातीला मोठा सदाशिव व शंकर घाणेकरांच्या मृत्यूनंतर कविराज बाँकेबिहारी केला. ‘भावबंधन’मध्ये प्रभाकर, ‘एकच प्याला’मध्ये रामलाल; ‘राजसंन्यास’मध्ये रायाजी, ‘प्रेम संन्यास’मध्ये जयंत; भालचंद्र पेंढारकरांच्या पंडीतराज जगन्नाथमध्ये ‘दरबारी गायक जमनालाल’ अशा अनेक भूमिका आजही लोकांच्या काळजात घर करून आहेत. त्यांनी काही चित्रपटही केले, पण मन तेथे रमले नाही.
यशस्वी सात दशकानंतर, २२ वर्षांचा मधला काळ नाटकाशिवाय काढल्यावर आयुष्याच्या उत्तरार्धात ‘अवघा रंग एकचि झाला’च्या निमित्ताने त्यांनी पुन्हा चेहऱ्याला रंग लावला. ‘रंगभूमीचे पुनश्च बोलावणे आले’ हे त्यांचेच शब्द होते. चार वर्षांत या नाटकाचे ३५० वर प्रयोग झाले, अन् संगीत नाटक रंगभूमीला नवचेतना मिळाली.
तत्पूर्वी मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागल्याने प्रसाद सावकार गोव्यात परतले होते. जिथे नक्षत्रे वेचली तिथे गोवऱ्या वेचायच्या नाहीत हा त्यातील भाव होता. साधेपणा ही त्यांची श्रीमंती होती. मातीशी नाळ कायम होती. गोव्यातील देवळात उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या नाटकांत देखील त्यांनी काम केले. वयाची ऐशी पार केल्यावरही स्कुटरवरून फिरत, पणजीतील चिरंजीवाच्या दुकानात येत, लोकांशी गप्पा मारत, आपल्याकडील प्रासादिक अनुभूती इतरांना दिली. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे बंदिशींचा खजिना होता. ‘बंदिशींचे खाँसाहेब’ असेही त्यांना आदराने म्हणत. २००६ साली पद्मश्रीचा बहुमान त्यांच्या नावापुढे लागला; पण तो त्यांच्या मनात कधी शिरला नाही. कीर्ती आली, सन्मान आले, पण नम्रता कधी सोडून गेली नाही.
आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर येऊनही त्यांनी स्वरांची मशाल विझू दिली नाही. ती अधिक शांत, अधिक स्थिर आणि अधिक प्रकाशमान केली. गेल्या वर्षी त्यांच्या वाढदिनी त्याची प्रचिती अनेकांना आली. चिरतरुण गायकीने शिष्यांना मंत्रमुग्ध केले. मृत्यू हा पूर्णविराम नसतो, तो एका दीर्घ आलापानंतर घेतलेला विराम असतो. पं. सावकार यांच्या जाण्यानेही तसेच झाले आहे. स्वरांचा हा प्रवासी आता दृष्टीआड झाला असेल; पण त्याने पायाखाली घातलेली सुरांची वाट कायम उजळलेली राहील. काही कलावंत काळाच्या पानांवर नोंदले जातात; काही काळाच्या कंठात वसतात. प्रसाद सावकार हे दुसऱ्या प्रकारातील होते.
अशा ऋषितुल्य कलावंतासाठी अश्रू नव्हे, तर अंतःकरणातून उमटलेला एकच स्वर योग्य ठरतो- भैरवी संपली असेल, पण तिचा नाद अजूनही थांबलेला नाही. पडद्यामागे उभे राहून जीवनाच्या अखंड प्रयोगाकडे आपल्या अंगभूत मिश्किलपणाने पाहत, चेहऱ्यावरचा रंग हळुवार पुसत सावकार आता रंगदेवतेच्या सान्निध्यात विसावले असतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.