Nirankal Stream Biodiversity And Natural Beauty Goa
निरंकाल गावच्या सिद्धनाथ डोंगरात उगम पावलेला ओहळ, गावच्या पश्चिम दिशेकडून पूर्वेला वाहत दुधसागर नदीच्या गोड्या पाण्यात सामील होतो. त्या ओहोळाचे पाणी अतिदुर्गम आणि संवेदनशील भागांतून खाली येते. ओहोळाच्या काठाने प्रवास करताना वसंत ऋतूचे आगमन झाल्याने फाल्गुन चैत्र आणि वैशाख हे तीन मास पुष्पमुद्रेचे चिन्ह डोळ्यांसमोर दिसू लागले.
प्रखर उन्हाने भाजणारा, तरी ओहोळातून वाहणाऱ्या पाण्याबरोबर बेसुमार रंगांनी नटून वाऱ्याच्या झुळके बरोबर खेळणारा, सप्तरंगी नलिनीने सुखावणारा प्राणिमात्रांना शक्तीच्या उन्मादक वृत्तीने चेतवणारा, तीन महिन्यात वसंताचे रंग मिसळणारा असला तरी मधला चैत्र खरा मधुमास, ऋतुराज स्पंदन पावणारा आहे. त्या ऋतूत तो परागावर लोळत असतो, ऋतुपर्वाच्या द्वारी नवी पालवी, गर्द फुटून झाकलेली फुले डवरून डोलताना वृक्षवेलीचे दर्शन फाल्गुन मासात घडते. या ऋतूत फुलांचे सौंदर्य आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागण्यासारखे असते.
फुलाफळांतून मधुर रस वाहत असतो. त्यातून पानाफुलांचे सौंदर्य प्रकट होत असते. पक्षी आपल्या स्वरात गाणी गातात. त्यावेळी ओहोळाच्या परिसरातील संयमाची बतावणी निसर्ग-ऋतू झुगारून देतो. जीवजंतूच्या अंगातही प्रेमाची उकळी फुटते आणि जैवविविधता (Biodiversity) नटून थटून आकर्षित करते. स्वतःचे चिमुकले जीवन क्षुद्र असूनही विश्वाच्या भव्य नियतीत पाण्याप्रमाणे एकरूप होते. सारे सजीव प्राणीही अशावेळी मुक्तपणे वावरतात. चैत्रात फुटणाऱ्या नव्या पालवीचे रूप पाहताना मनोहारी दिसते. वारा आला की पिंपळास फुटलेली नवी पालवी वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे सळसळ करते.
त्याचवेळी जुनी पाने गळता गळता पिवळ्या गुलाबी रंगाच्या पताकांखाली वसुंधरेकडे धाव घेतात. शिशिर ऋतूत ती डोळ्यात भरत नाहीत. नव्या पानांवर सूर्याची किरणे पडल्यावर त्याची पाने चकाकतात. त्यावेळी त्यांना फुले आल्याचा भास होतो. इतर झाडांच्या पानांचा वाऱ्याच्या झुळकेने सळसळ आवाज येत नाही. एखाद्या वृक्षावर मधुमालतीची वेल चढून त्या झाडाला गुलाबी गंध फुलांनी खच्चून सजवते आणि तरुलतांच्या आलिंगनाचे काव्यमय वर्णन ऐकावयास मिळते. मधुमालतीला आपल्या पालवीचे मस्तक देणारा वृक्षकोमलतेचे दर्शन देत वसंताची जाण देतो. अशोकाची झाडे पायापासून डोक्यापर्यंत लाल तुऱ्यांनी नटलेली दिसतात.
फुलातील केशर मधाने भरलेले असतात. त्यांच्या प्रत्येक तुऱ्यात एक तरी पांढरे फुल फुलून त्या तांबड्या तुऱ्यांची शोभा वाढवतात. ओहळ नदीत दिसणाऱ्या पाण्याच्या आशीर्वादाने वर्षाकाठी येणारा वसंत आपला सण साजरा करतो. सर्व प्रकारच्या फुलांत अतिशय सुंदर कोण नटली असेल तर उग्रगंध देणारे घाणेरीची शोभिवंत दुरंगी फुले. वसंतात अनेक रंगाची फुले आपले सौंदर्य दाखवतात. आंबा, फणस, अननस रसाळ फळांचा सुगंध आणि चव सर्वांनी घेतल्याशिवाय इच्छा पूर्ण होणार नाही.
झाडाला लटकलेले आंबे फणस पिकले की नाही हे कावळा, खार, पोपट हे चोच मारून पाहतात. ही वसंताची लीला आहे. रुपसंगम वसंतात चैत्राची शोभा पक्षी झाडावर घरटी बांधून वाढवतात. घार आपल्या भुकेल्या पिल्लांना अन्न पुरवण्यासाठी पोपट, कावळा, चिमणी, कबुतराच्या घरट्यातील अंडी पळवतात. त्यांच्या कुटुंबावर संकट आणतात. वसंत ऋतूत मध्यरात्रीच्या प्रहरी नि:श्वास रोखून सृष्टी जरी उभी असली तरी तिच्यावरून वाहणारे झरे ओहळ, नदीचे पाणी सर्वच जीवमात्रांना लागते. पाण्याइतके मऊ काहीच नाही, त्या पाण्याचे रूपांतर पुरात झाले, तर ते डोंगर, धरणेही तोडते.
अशा निसर्गाच्या जैवविविधतेत, वसुंधरेच्या अंगावरून वाहणारा निरंकालचा ओहळ, त्यांच्या काठाने फिरताना मला वसंत ऋतूचा चांगला अनुभव आला. माझे मन भारावून गेले. मला फोंडा तालुक्याच्या ‘जाऊ ओहोळाच्या गावा’ परिक्रमेत निसर्गाची राखण करून निरंकालच्या जैवविविधतेचे रक्षण करणाऱ्या तिथल्या ओहोळाचे सुंदर रूप पाहावयास मिळाले.
आत्तापर्यंत पाहिलेल्या ओहोळांत हा ओहळ खरोखरच व्यवस्थित राखला गेला आहे. आपल्या पूर्वजांची शिकवण त्यांच्या भावी पिढीने त्या ओहोळाच्या काठावर जपून, ते आपल्या भविष्याला घडवण्याचा प्रयत्न करताना पाहावयास मिळते. त्या ओहोळाच्या काठाच्या परिसरात सरपटणारे प्राणी हिंस्र जनावरे, पक्षी, कृमी, कीटक, गोड्या पाण्यातील मासळी, पाळीव जनावरे तिथल्या आद्य पूर्वजांची भावी पिढी, डोंगर पठारावर राहणारा धनगर समाज आणि माझे जिवलग मित्र समाजसेवक, गोव्याचे नामांकित वकील कै.सतीश सोनक. त्यांनी वानरमारे समाजाला मानवीय हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न केले. ते वानरमारे आदिवासी लोक त्या सिद्धनाथ पर्वताच्या दाट जंगल भागात उगम पावलेल्या ओहोळाच्या काठांवर गुण्यागोविंदाने राहतात.
निरंकाल ओहोळाच्या वाहणाऱ्या पाण्याच्या पात्रात तिथल्या पूर्वजांनी टप्प्याटप्प्यावर नैसर्गिक बांध घालून वसुंधरा फुलवली आहे. तिथली हिंस्र जनावरे मानवाचे मित्र बनून वावरतात. आम्ही दररोज वाघ, अस्वल, बिबटा, नागसर्प, गवा, भुजंग यांचे फोटो पाहून अगर दैनिकांत बातम्या वाचून घाबरतो. पण निरंकाल, कोनशे, पाज या भागातील शेतकरी लोक त्यांचे खरे मित्र आहेत. त्यांच्या सहवासात ते एकमेकांना दर्शन देऊन आपापले काम करतात.
निरंकाल ओहोळाचा उगम सिद्धनाथ डोंगराच्या परिसरात दाट जंगल भागातील केळबे, ठाणे या ठिकाणी होतो. तिथून तो कडपो डोंगराकडून शेळ परिसरात येतो. वरील भागातील शेतकरी ओहोळाच्या पात्रात बंधारे घालून बागायतीस पाणी पुरवतात. शेळ परिसरात त्याला शेळफाटा नावाचा दुसरा ओहळ मिळून त्याचा प्रवाह मोठा होतो आणि पुढच्या प्रवासात गडगडा डोंगर परिसराला पाणी देत त्या खालच्या चानडी, पाणबो, गुरिखाटे परिसरातील बागायतीला पाणी देतो.
पुढच्या प्रवासात निरंकाल कोडार रस्ता पार करून शिग्नेव्हाळ केळीन परिसरातील कुळागर, सरद वायंगण शेतीला पाणी देत दुधसागर-खांडेपार नदीच्या गोड पाण्यात विलीन होतो. त्या परिसरात नदी आणि ओहोळच्या पाण्यात मळ्ये, थिगुर, वाळेर, खेकडे, पिठ्ठोळ आदी मासळी मिळते. निरंकालच्या सरद वायंगण शेतात ‘कोंगा’ नावाचे शंख शिंपले मोठ्या प्रमाणात मिळत होते. ते कोंगे शेताच्या मातीचा कस वाढवतात. निरंकाल गावच्या डोंगर भागात तिथल्या पूर्वजांनी ओहोळाच्या काठावर त्यातून वाहणाऱ्या पाण्याचा व्यवस्थित उपयोग करून मोठमोठी कुळागरे वसवली. त्यात मिरी, सुपारी, नारळ, आंबा, अननस, केळी, कॉफी, जायफळ, जांब अशा फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलेले पाहावयास मिळते. ओहोळाच्या पात्रात सरकारने शेळीन, एटलीगाळ आणि गुरिखाटा ठिकाणी बंधारे उभारून त्या ओहोळातील पाणी शेतकऱ्यांच्या कुळागरांस पुरवले आहे.
ओहोळाच्या परिक्रमेत कैक ओहोळांच्या भागात प्रवास केला. त्या परिसरात मला हिंस्र प्राण्यांची भीती वाटली नाही. मात्र पंचवाडी, आमळाय आणि निरंकाल ओहोळाच्या काठाने प्रवास करताना हिंस्र प्राणी मिळेल काय? याची भीती वाटत होती. पण ‘निसर्ग तारी त्याला कोण मारी?’, या म्हणीप्रमाणे तिथे हिंस्र जनावरे असूनसुद्धा मला त्यांचे दर्शन झाले नाही. म्हणजेच मी निसर्गाच्या देवळात जाऊन मला देव भेटला नाही? तरी त्या ओहोळाच्या काठावर राहणारे तिथले शेतकरी, बागायतदार शेळ्या पाळणारे धनगर आणि माकडमारे आदिवासी (Tribal) भेटले. ते खरे त्या वसुंधरेचे भक्त होते. त्यांनी मला फिरताना माहिती दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.