Panchwadi: सफर गोव्याची! आपल्या पूर्वजांना पाणी ‘खाता’ येत नाही, ते प्यावे लागते, एवढेच राजकीय ज्ञान होते; म्हैसाळचा ओहळ

Panchwadi Village Stream: वसुंधरेच्या पोटात असणारे पाणी-पदार्थ इतका पातळ आहे की ते कुठल्याही जागी आपले दर्शन देते. पाणी हा पदार्थ अनेक रंगांनी आपल्याला दर्शन देतो.
Panchwadi Village Ponda Goa
Panchwadi Village GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मधू गावकर

दाबोली शिरोडा ओहोळाचा प्रवास संपवून माझे मन वाऱ्यासारखे मापा पंचवाडी गावच्या ओहोळाकडे वळले. पंचवाडी गाव फोंडा तालुक्याचा दक्षिणेकडील शेवटचा भाग. त्या गावाला निसर्गाने पश्चिम बाजूने विशाल जुवारी नदीचा तट दिला आहे, तर पूर्व बाजूने हिरव्या डोंगराची उंच रांग दक्षिणेकडून उत्तर दिशेला पोहोचवली आहे.

मध्य भागात बऱ्याच मोठ्या विस्तीर्ण तलावात निसर्गाने साठवलेले पाणी तिथल्या वनराई बागायती आणि शेतीला बराच मोठा पुरवठा करून जैवविविधता पोसण्याचे काम करते. त्या ओहोळाच्या काठावर तिथल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून शेती बागायतीच्या मातीचा पोत राखला आहे.

या ओहोळाच्या काठावर अनेक प्रकारचे औषधी गुण असलेली झाडे दिसतात. त्यात औदुंबराचे झाड दत्तात्रेयाला प्रिय. म्हणून हिंदू लोक मध्यरात्री फुलणारी औदुंबराची फुले त्या वेळी काढून ती देवाला अर्पण करतात. त्याने मूर्तीची सुंदरता वाढते असे भाविक मानतात. हे औदुंबराचे झाड विशेष करून झर, तळी, ओहोळाच्या काठावर पाहावयास मिळते.

वसुंधरेच्या पोटात असणारे पाणी-पदार्थ इतका पातळ आहे की ते कुठल्याही जागी आपले दर्शन देते. पाणी हा पदार्थ अनेक रंगांनी आपल्याला दर्शन देतो. पाण्याच्या आधारे मानवाने चौसष्ट कला आणि चौदा विद्या घडवल्या. सूर्य आणि पृथ्वी या ग्रहांनी वाऱ्याच्या साहाय्याने पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा निर्माण करून जैवविविधतेचे रक्षण केले आहे.

हिवाळा पृथ्वीवरील पाणी सूर्याला पोहोचवतो. उन्हाळा ते पाणी सूर्याकडे तापवून त्याचे काळे घट्ट ढग बनवतो आणि पावसाळा वाऱ्याच्या मदतीने ते ढग विरघळून त्याचे पाणी परत पृथ्वीला देतो. ब्रह्मांडातील चंद्र सूर्याच्या साहाय्य चक्रावर आपली वसुंधरा टिकून आहे, हे आमच्या पूर्वजांनी जाणले. पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचे पाणी एकत्र होऊन ओहोळातून वाहताना आपण राहतो त्या परिसरात टप्प्याटप्प्यावर बंधाऱ्याच्या साहाय्याने त्यांनी ते अडवले.

त्याचा वापर कृषिक्षेत्रासाठी केला. सुपीक मातीचा कस राखून भविष्य घडवण्यास यशस्वी ठरले होते. वाहणाऱ्या ओहोळाची संकल्पना, व्याप्ती, स्वरूप व्याख्या आणि त्याची परिसंस्था यांना जोड असते ती वायू, जल आणि मृदेची. आपल्या पूर्वजांनी केलेली ओहोळाची व्याख्या म्हणजे केवळ वाहते पाणी नव्हे, तर त्याच्या काठावर वसणारी परिसंस्थाही त्या व्याख्येत अनुस्यूत होती. त्या दृष्टीने त्यांनी या स्थळांचा सखोल अभ्यास केला होता. म्हणूनच या परिसरातील प्रत्येक सजीव जगवण्याकडे ते जाणीवपूर्वक लक्ष देत असत.

भूमी, जीव, वनस्पती, पाणी, प्रवाह, रचना, मृदा, भूगर्भ, हवामान, स्थान, आकार, क्षेत्र हे वाहणाऱ्या ओहोळाला साथ देतात, हे शोधून काढणाऱ्या ऑस्कर पेशेल आणि फ्रेडरिक रॅटझेल या जर्मन जैवभूगोलशास्त्रज्ञांनी भूमीवरील पाण्यावर, मानव आणि पर्यावरणावर विचार मांडले.

ओहोळाच्या परिघातील डोंगर, पठारे, खडक, मृदा या बाबी मानवाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहेत. डोंगरात झरीच्या रूपाने उगम पावलेला ओहळ जैवविविधतेला पाणी पुरवीत तळी, सरोवरे, खाडी नदीकडून समुद्राकडे पाणी घेऊन जातो. त्या सागराच्या पाण्यात भरती, सुकती, लाटा, वादळ त्सुनामी यांचे दर्शन घडते. मात्र त्यांनी रौद्ररूप धारण केल्यास जैवविविधता आणि मानवाचा निवारा, अन्न, वस्त्र या गरजांवर पाणी फिरते. ओहोळातील पाण्याचा अभ्यास केल्यास मानवाचा व्यवसाय, सवयी, जीवन, चालीरीती, रूढी, परंपरा लक्षांत येतात.

पर्यावरणातील घटकांचा उपयोग करूनच आमचे पूर्वज प्रगती करू शकले. निसर्ग आणि मानव यांचे एकत्रीकरणाचे नाते म्हणजे भूगोल. ओहोळातील पाणी, त्यातील वनस्पती, सभोवतालचे हवामान या साऱ्यांनी एकमेकांशी जळवून घेतलेले पाहावयास मिळते.

पूर्वजांनी त्या विचारातून त्यातील संसाधने कशी जतन करता येतील याचा पूर्ण अभ्यास केला होता. शेती, बागायती, पशुपालन, मासेमारी, सरपण, व्यापार, वाहतूक, तापमान, पर्जन्यमान त्रिभुजाकडील सुपीक शेती, अशा गोष्टींतून त्यांनी भूगोलाचे चक्र सांभाळत आपले आर्थिक चक्र चालवले. आकारक्षेत्र हालचाली, परिवलन, परिभ्रमण, अक्षांश, रेखांश, उत्तरायण, दक्षिणायन, ऋतू, राशी, अनिष्ट संक्रांती, रथसप्तमी, चंद्रोदय, तिथी, चरण, घटिका, मध्यान्ह, मुहूर्त यामागचे विज्ञान त्यांना शालेय शिक्षण नसतानाही माहीत होते. निसर्गानेच त्यांना शिकवले होते, म्हणूनच प्राचीन काळी त्यांचे अंदाज कुठल्याही आधुनिक वेधशाळेपेक्षाही अचूक असत.

मापा पंचवाडीच्या ओहोळाचा उगम चार झरींच्या रूपाने झाला आहे. पहिली बेतुल डोंगरात, दुसरी शेततळीत, तिसरी रुमडे आणि चौथी मालेगाळ भागात वाहते. या चारही ठिकाणांचा उगमाकडील भाग अति संवेदनशील आहे.

त्या परिसरात हिंस्र जनावरे मोठ्या प्रमाणात येतात. चारही झरींचे पाणी ओहळ रूपाने खाली येते व म्हैसाळ या ठिकाणी असलेल्या तळ्यात साठते. येथील स्थानिकांच्या पूर्वजांनी या तळ्यातील पाणी ओहोळातून खाली वाहताना त्याला टप्प्याटप्प्यावर नैसर्गिक बंधारे बांधून अडवले. ते पाणी स्वतः वापरून बाकी बागायती, शेतीस उपयोग करीत होते.

त्या पाण्याच्या आधारावर कुळागरातील वेगवेगळी फळे, भाजीपाला आणि सोन्यासारखा रंग दिसणारा ‘शिट्टा’ नामक भात पिकवीत होते. फोंड्याच्या दक्षिण टोकाकडील ‘शिट्टा’ नावाचे भात बियाणे फोंडाच्या उत्तर सीमेकडील गावांतील शेतकरी प्रत्येक वर्षी पंचवाडीत येऊन विकत घेऊन जात होते.

या ओहोळाच्या पाण्यावर पिकणारे भात खूप रुचकर लागत होते. शिवाय या भाताला पाण्याची जास्त गरज लागत नसे. त्या ओहोळांचे पाणी म्हैसाळ तलावातून ‘दोन वाटो’, ‘काजू रोपले’, ‘रानमाळो’, ‘गुडेभाट’, ‘रायचे मळ’, ‘खानाभाट’ आणि ‘धकतळे’कडून खालच्या शेतीभागातून खळीच्या रूपाने जुवारी नदीच्या बांधकाठावरील मानशीतून विशाल नदीच्या खार पाण्यात मिसळते.

पंचवाडी गावची भलीमोठी वायंगण, सरद शेती अनेक नावांनी ओळखली जाते. ‘देवाभाट’, ‘बानाटी’, ‘मुर्तद’, ‘सुरयेक’, ‘पाटार’, ‘तळे’, ‘अरकणे’, ‘जळक’, ‘वाळाखाणो’ या नावांनी ओळखणाऱ्या शेतात पिकणारे भात तिथल्या पूर्वजांनी आपणही खाल्ले आणि इतरांसही दिले. कष्टाच्या शिदोरीवर जगा आणि जगू द्या हा मंत्र त्यांनी दिला. आपण शिकत शिकत जगतो, ते जगत जगत शिकले.

भल्या मोठ्या सरद, वायंगण शेताला गोड्या पाण्याचा पुरवठा करीत तो ओहळ शेताच्या खळीतून वाहत जुवारीच्या पाण्यात विसावतो. जुवारी नदीतून ‘चोणकुल’, ‘तामसा’, ‘काळुंद्र’, ‘शेवटा’, ‘पालू’, ‘खरचाणी’, ‘झिंगे’, ‘खेकडे’ भरतीच्या पाण्यासोबत खळीत येतात.

त्या माशांना वरून वाहत येणारे ओहोळातील खाद्य मिळाल्याने ते खळीतल्या पाण्यातच थांबतात. सुकती आल्यावर खळीचे पाणी कमी होते, त्यावेळी ते पाण्यात उड्या मारून नाचतात. त्यांचा नाच पाहून कामात दंग असणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष त्यांच्यावर जाते. शेतकरी लोक खळीत उतरून त्यांना पकडून घरी नेतात आणि दुपारच्या अगर रात्रीच्या जेवणात कालवण करून रुचकर भोजनाचा आस्वाद घेतात.

आता सरकारने पंचवाडी गावातील ओहोळाच्या सान्निध्यात असलेल्या भल्यामोठ्या म्हैसाळ तलावावर धरण बांधून परिसरातील गावांच्या लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. आपल्या दारात अगर घराच्या मागीलदारी असणारी विहीर, स्वच्छ पाण्याचे रूप दाखवणारी झर, कमळे फुलवणारे तलाव, निर्झर रूपाने वाहणारे ओहळ, पाणथळ या पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांची सर नळाला कशी बरे येईल?

पूर्वजांनी जे तयार करून, हजारो वर्षे जपून ठेवले होते, ते आम्ही टाकाऊ मालाप्रमाणे त्यांच्यात बिघाड करून मोकळे झालो. वाहणाऱ्या ओहोळांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांचे पाणी प्रदूषित झाले. झरीच्या ठिकाणी खनन केल्याने उगमस्थान सुके झाले.

Panchwadi Village Ponda Goa
Shigao: सफर गोव्याची! दूधसागराच्या खोऱ्यातून भटकंती करत आलेल्या आदिमानवाची पावले 'शिगावा'त काही काळ स्थिरावली होती

विहिरीच्या शेजारी सांडपाण्याचा खड्डा खोदल्याने तिचे पाणी पिवळे, हिरवे झाले व ते पिण्यायोग्य राहिले नाही. तोटी फिरवून सहज येणाऱ्या पाण्यामुळे ओढून काढायचे कष्ट विसरलो. कष्टांची जागा घेणारे जेवढे सहज, सुलभ असते ते भविष्यासाठी घातक असते, हे आपण सर्वांनी ध्यानात ठेवले पाहिजे. आमच्या पूर्वजांनी भविष्याची आणि पर्यावरणाची जाण होती, म्हणून त्यांनी जलनियोजन केले व गावागावांत भल्या मोठ्या शेतजमिनी तयार केल्या.

गेली किमान हजार, दीड हजार वर्षांपासून शेतजमिनीचा कस राखला. वाहणाऱ्या पाण्यात संजीवनी असल्याने पाण्याला जल-देवता, गंगा मानून त्याचे पूजन केले. पूर्वजांनी वाहणाऱ्या पाण्याला गंगा, भागीरथी, कावेरी ब्रह्मपुत्रा, यमुना, सरस्वती, गोदावरी, मांडवी, जुवारी अशी नावे दिली. पाणी, उदक, तीर्थ, नीर हे शब्द वापरून त्यातील गुणांप्रमाणे त्याचे महत्त्व जपले.

Panchwadi Village Ponda Goa
Pilgao: सफर गोव्याची! छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात पिळगावाजवळील घाट प्रमुख महामार्ग बनलेला होता

निसर्गातील जलतत्त्वाचे सगळे गुण पेयजलात राखले जातील याची त्यांनी काळजी घेतली. त्यासाठी ओहळ व त्याची परिसंस्था जपली. पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ओहळ, झरी, नद्या प्राणपणाने जपणाऱ्या आपल्या पूर्वजांना पेयजलासाठी स्वतंत्र ‘खाते’ निर्माण करण्याची कधी गरजच भासली नाही. पाणी ‘खाता’ येत नाही, ते प्यावे लागते, एवढेच मर्यादित राजकीय ज्ञान त्या बिचाऱ्यांना होते बहुधा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com