Pilgao: सफर गोव्याची! छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात पिळगावाजवळील घाट प्रमुख महामार्ग बनलेला होता

Pilgao History: कधीकाळी वाघाबद्दल निस्सीम श्रद्धेपायी नावारूपास आलेल्या या गावातील नैसर्गिक वृक्षआच्छादन कमी होत चालले आहे.
Goa Pilgao Village
Goa Pilgao VillageCanva
Published on
Updated on

अ‍ॅड. सूरज मळीक

डिचोली तालुक्यातील पिळगाव हा गाव मांडवी नदीच्या उजव्या किनारी वसलेला आहे. नदीच्या काठावरील परिसर, अन्न-वस्त्र-निवारा ठरलेल्या खारफुटीच्या वृक्षांनी समृद्ध आहे. या गावात आजही उन्हाळ्यातसुद्धा तापमान नियंत्रणात ठेवणारे सदाहरित जंगल अस्तित्वात आहे. जुन्या दफ्तरात या गावाचे नाव ‘पिलीगाव’असे नोंदवले आहे. गावातील माध्यमिक शाळेच्या नावासोबत या गावाचे नाव ‘पिलीगाव’ असेच आहे. ‘पिली’ हा शब्द तुळू भाषेमधील असून त्याचा अर्थ वाघ असा होतो.

भारतातील सिंधू संस्कृतीपासून आजवर निसर्ग आणि पर्यावरणातील विविध घटकांमध्ये लोकांनी देवाचे स्वरूप पाहिले आहे. आजच्या आधुनिक काळातही या गावात वृक्ष, दगड, झरे, रंगीत माती, जंगली श्वापदे यांना देवत्व बहाल केलेले पाहायला मिळते.

व्यापार उद्योगाशी निगडीत असलेल्या या गावात विविध जाती-जमाती आणि धर्माचे लोक राहतात. आदिवासी समाजामध्ये जंगली श्वापदांतील वाघाला पुजण्याची परंपरा पूर्वापार रूढ आहे. या गावाच्या सीमेजवळ असलेल्या डिचोली बाजारपेठेजवळ अवचित वाड्यावर वाघांच्या मूर्तीचे पूजन केले जाते.

वाघाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अतिशय आत्मीयतेने पुजल्या जाणाऱ्या वाघ्रो देवाच्या दोन मूर्ती कधीकाळी इथे वाघाचा संचार असल्याचा प्रत्यय देतात. घनदाट जंगलांपासून खारफुटीच्या जंगलापर्यंत वाघाचा नैसर्गिक अधिवास असतो. पिळगाव आज खाण व्यवसायाच्या विळख्यात सापडलेला आहे तरी या गावातील घनदाट सदाहरित जंगलाचे पैलू आजही अनुभवायला मिळतात.

गावातील राष्ट्रोळी हे कष्टकरी समाजाचे श्रद्धास्थान सदाहरित जंगलाच्या कुशीत वसले आहे. देवळाच्या बाजूलाच वर्षानुवर्षे प्रवाहित असलेला झरा लोकमानसाची तहान भागवत आहे. या झऱ्याचे पाणी छोटेसे तळे बांधून साठवलेले असून त्याला ‘तळेश्वर’ असे नाव दिलेले आहे. सारमानसच्या दिशेने जात असताना या घनदाट काळोखी जंगलातील शीतल हवेचा स्पर्श जाणवतो.

इथे काही क्षण थांबले तर थंड हवामानाच्या ठिकाणावर प्रवेश केल्यासारखे वाटते. उन्हाळ्यातसुद्धा कृमी, कीटक, फुलपाखरे व विविध पक्ष्यांसाठी हे आश्रयस्थान बनलेले आहे. विशेषत: फुलपाखरे दिवसा सक्रिय असतात, तर पतंग रात्री उडताना दिसतात. परंतु ‘नील वाघ’ हा दिवसा उडणारा पतंग आहे. या सदाहरित जंगलात या पतंगाचे मुख्यत्वाने दर्शन घडते.

मांडवी नदी किनारी असलेला सारमानस हा नदी संगम कधीकाळी सर्वसामान्यांबरोबर व्यापारी, प्रवासी लोकांच्या येण्याजाण्याने गजबजलेला असायचा. येथे दोन नद्यांचा संगम होतो. एक नदी महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यातील तेरेखोल येथे असलेल्या फुलडोंगरावरून उगम पावते व डिचोली नदी बनते, तर दुसरी नदी कर्नाटकातून प्रवाहित होऊन वज्रा सकला धबधब्याच्या रूपात खाली कोसळून वाळवंटी नदी बनून येते. या दोन्ही नद्या एकत्र येऊन मांडवी नदीशी एकरूप होतात.

खारफुटीचे वन आज लाल फुलांनी बहरलेले आहे. त्याची पिकलेली फळे बारीक कापून त्याचे लोणचे करता येते. नदी, नाल्याच्या आधाराने या गावात येण्यासाठी गोवा आणि गोव्याबाहेरील विविध प्रांतातील लोकसमूहासाठी हा भाग प्रवेशद्वार ठरलेला होता. उडुपी भागातील माधवाचार्य या संत पुरुषाने तेराव्या शतकात गोव्यातील वेगवेगळ्या भागांत जाऊन प्रभु रामचंद्रांची उपासना करण्यासाठी प्रसार केला.

पिळगावमधील गिमोणे वाड्यावर रामचंद्र आणि सीतेच्या पुरातन मंदिराचे अवशेष पाहायला मिळतात. १७व्या शतकात मुघल सैन्याने या मंदिराची तोडफोड केली होती त्यामुळे १८व्या शतकात त्याची पुनर्बांधणी करण्यात आली. कर्नाटकातील उडुपी आणि इतर भागात तुळू भाषेतील दशावतारी नाटकाचे प्रयोग होतात.

तुळू भाषेचा प्रभाव गोव्यातही होता. आणि त्यामुळेच हा गाव पिलीगाव म्हणून नावारूपास आला असेल. पिली म्हणजे वाघ. कर्नाटकमध्ये पिली वेष ह्या नृत्य प्रकारात वाघाची वेषभूषा करून वाघ नृत्य केले जाते. गिमोण्यातून डोंगराच्या दिशेने पायवाटेने चालत जाताना ऐतिहासिक पिंपळाच्या झाडाचे दर्शन होते. पिंपळ, त्याच्या गर्द सावलीत पाषाणी दगड आणि त्याचालगतच खालच्या बाजूला बारमाही वाहणारा झरा बघून या वैशिष्ट्यपूर्ण रचनेतील सपाट पाषाणावर चंद्र आणि सूर्य कोरलेले आहेत.

उजव्या बाजूला गोलाकार सूर्य, तर डाव्या बाजूला अर्ध चंद्रकोर दर्शवलेली आहे. आकाराने अगदी हाताच्या तळव्यापेक्षा जरा मोठी असलेली ही चित्रे या गावातील इतिहास, संस्कृती, त्याचबरोबर कधीकाळी या मार्गातून होत असलेल्या व्यापार-उद्योगाची आठवण करून देतात.

ज्यावेळी आधुनिक प्रवासयंत्रणा उपलब्ध नव्हती तेव्हा घाटमार्ग आणि जल मार्गाचा उपयोग व्हायचा. घाट माथ्यावरून प्रवास करीत, डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलेल्या थकलेल्या यात्रेकरू व्यक्तीला झऱ्याचे पाणी पिऊन, पिंपळाच्या छायेत विसावा घेऊन निवांत होण्यासाठी ही जणू खूण होती. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात झऱ्याजवळ चंद्र सूर्याची चित्रे कोरलेली पाहायला मिळतात.

जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत इतिहासाच्या स्मृती इथे नांदत राहतील, असाच त्याचा अर्ध होतो. चंद्र आणि सूर्य हे या प्रकाश, शांतता आणि शीतलतेचे प्रतीक आहेत. देवी शांतादुर्गेचा कळस जेव्हा या ठिकाणी येतो तेव्हा या चंद्र सूर्य देवाची भेट घेताना त्याच्यासमोर मनोभावे प्रार्थना केली जाते.

पहिले नमन घालू धर्तरी माते गा,

दुसरे नमन घालू गायतरी माते गा,

तिसरे नमन घालू चांद सूर्या देवा

पिळगाव गावात शतकोत्तर इतिहास असलेल्या या झाडाचे आजही श्रद्धेने पावित्र्य जपलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात हा घाटमार्ग व्यापारी, प्रवासी व सैन्यासाठी प्रमुख महामार्ग बनलेला होता. या गावातील डोंगरावर जांभ्या सड्याला सपाट करून बांधण्यात आलेली ‘पाज’ या घडामोडींची साक्ष देते. ‘पाज’ म्हणजे प्रामुख्याने घोडेस्वारीसाठी बांधलेला महामार्ग.

गोव्यातील चांदसूर्या घाट म्हणून नावारूपास आलेला महामार्ग सत्तरीतील नगरगावमध्ये सुरू होऊन साट्रे गावातून कर्नाटकातील पारवड गावापर्यंत जातो. महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या आंब्याचा गवर या गावातसुद्धा अशीच चांद सूर्याची प्रतीके होती.

पण आज भू-स्खलनामुळे हा गावच नामशेष झालेला आहे. या मंदिराच्या प्रांगणात सुंदर ध्वजस्तंभ आहे. काब दे राम येथे असलेले रामाचे भूशिर, लतेलपूर येथील रामनाथाचे मंदिर इथे पूर्वापार चालत आलेल्या राम उपासनेची प्रचिती आणते. गोवा आणि महाराष्ट्र कर्नाटकातल्या काही संलग्न असलेल्या भागांत कावि चित्रकलेचा आविष्कार पाहायला मिळतो.

Goa Pilgao Village
Shiroda: सफर गोव्याची! शिरोड्याचा ओहळ सिद्धनाथ पर्वतावरून वाहत कामाक्षीच्या चरणांवरून पुढे शिवाचे दर्शन घेतो

पिळगावतील चामुंडेश्वरी देवळाच्या भिंती आजही गेल्या काही शतकांपासून जोपासलेल्या या वैविध्यपूर्ण चित्रकलेचे दर्शन घडवतात. इथल्या माती आणि संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या लोकमानसाने पूर्णपणे नैसर्गिक घटकांचा वापर करून हा आविष्कार घडवलेला आहे.

जांभ्या दगडाने युक्त या प्रदेशात उपलब्ध असलेल्या लाल माती आणि समुद्रातील काळ्या खुब्यांपासून पांढरा चुना तयार केला जातो. चिरेबंदी वास्तूत केवळ पांढरा आणि तांबडा अशा दोनच रंगाचा उपयोग करून अतिशय सुंदर देवदेवता, पशुपक्षी व इतर नक्षीदार पानाफुलांच्या आकृतीने भिंती सुशोभित केल्या जातात.

Goa Pilgao Village
Old Goa History: सफर गोव्याची! खिलजीच्या आक्रमणानंतर मांडवी किनाऱ्यावरच्या 'हेळे'ला राजधानीचा दर्जा लाभला

कधीकाळी गवंडी, चितारी, च्यारी या कष्टकरी लोकसमूहाने आपल्या प्रावीण्य आणि कल्पनेतून ही चित्रे विविध मंदिर आणि घरांच्या भिंतीवर उतरवलेली पाहायला मिळतात. पूर्वी लोकमानसात सृजनशीलता आणि सर्जनशीलता होती. निसर्गाच्या सान्निध्यात कष्टाची कामे करत असताना त्यांच्यात नावीन्यपूर्ण आविष्कार घडत गेले.

पेयजलाचे संरक्षण व्हावे आणि ते वर्षानुवर्ष पुरावे यासाठी विशिष्ट बांधकामाचे काम करून पाण्याचा संचय कसा करावा याचे ज्ञान त्यांना होते. चामुंडेश्वरी देवळाच्या बाजूला प्रचंड मोठ्या टाकीद्वारे पेयजलाचे संवर्धन केलेले पाहायला मिळते. आज पाणी प्रदूषित होत चालले आहे. कधीकाळी वाघाबद्दल निस्सीम श्रद्धेपायी नावारूपास आलेल्या या गावातील नैसर्गिक वृक्षआच्छादन कमी होत चालले आहे. गावातील बोअरवेल निरुपयोगी ठरलेली आहे. आज खाण व्यावसायिक आणि इतर बेकायदेशीर कृतींमुळे भूगर्भातील पाण्याचा साठा कमी झालेला आहे, ही खेदजनक बाब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com