Agapur Goa: सफर गोव्याची! चार ओहोळांच्या पाण्यावर जगलेला अगस्तीपूर गाव

Agastipur Goa: पठाराच्या पायथ्याशी आगापूर, आडपई, दुर्भाट, तळावली, कवळे, रामनाथी, तळुले खारवाडा आणि उंडीर गावे विकसित झाली आहेत.
Agapur Goa: सफर गोव्याची! चार ओहोळांच्या पाण्यावर जगलेला अगस्तीपूर गाव
Agastipur GoaDainik Gomantak
Published on
Updated on

गेले पाच आठवडे दर शनिवारी सुरू असलेला फोंडा ओहोळांचा प्रवास संपवून मी पुढील ओहोळांचा शोध घेण्यास आगापूर गावात पोहोचलो. आगापूर गाव क्षेत्रफळाने लहान असला तरी कृषिक्षेत्रात धान्य आणि फळफळावळीने संपन्न आहे. त्या गावाला कवळे पठाराने चार घळी निर्माण करून चार ओहोळांना जन्म दिला आहे.

तिथला प्रत्येक ओहळ वर्षाचे बाराही महिने खालच्या भागातील कुळागर, आंबा, फणस, नारळांच्या बागायती आणि जंगली झाडांना पाणी देतो. हे ओहळ खालच्या भागातील शेतीच्या मध्य भागातून जात खाली मानशीच्या मुखातून जुवारी नदीस गोड पाण्याचा पुरवठा करतात. कवळे पठार अंडाकृती आकृतीने निर्माण झालेले पाहावयास मिळते.

त्या पठाराच्या पायथ्याशी आगापूर, आडपई, दुर्भाट, तळावली, कवळे, रामनाथी, तळुले खारवाडा आणि उंडीर गावे विकसित झाली आहेत. कवळे पठाराने आगापूर गावाला निसर्गाची मोठी भेट देऊन त्या चार ओहोळांनी आगापूर गावाला वनश्रीचा हिरवा शालू नेसवून सजवले आहे. इथल्या ओहोळांना लांबी नाही पण पठाराच्या शिखरावरून वाहणारे ओहळ शहनाई, चौघडा वाजवल्याप्रमाणे उतारावरून पाणी खाली आणताना जी सुरावट उभी करतात, ती ऐकत इथला निसर्ग वैभवशाली बनला आहे.

प्रत्येक ओहळ दीड, दोन कि.मी. प्रवासाने खालच्या शेताच्या खळीत एकत्र होऊन मानशीतून बाहेर पडत जुवारीला मिळतात. प्रथम ओहोळाचा उगम बखलेंच्या कुळागरात उंचावर झरीच्या रूपात होतो. त्या कुळागरास पाटाने पाणी देत तो बांध भागात प्रवेश करतो.

तिथल्या परिसराला पाणी देत सतरकर भाटातून खालच्या बांधाकडून शेताला पाणी पुरवीत खळीच्या रूपाने जुवारीस मिळतो. दुसरा ओहळ कुंडईकर कुळागराच्या डोंगर घळीत उगम पावून तिथल्या कुळागराला पाटाने सिंचन करीत पुढील लसुल्ले भागातून पुढे जात खालच्या शेताला पाणी देतो.

बाबुले भागातील खळीमधून प्रवास करीत बांधावरील मानशीतून जुवारीला मिळतो. तिसरा ओहळ पठाराच्या तेरसे घळीत उगम होऊन परिसरातील जंगल वनराईला पाणी देत प्रवासाने खाली महादेव (माधव) मंदिराकडील कुळागर, बागायतीला पाणी देतो.

Agapur Goa: सफर गोव्याची! चार ओहोळांच्या पाण्यावर जगलेला अगस्तीपूर गाव
Indian Muslim: मुस्लिमांचे काय चुकते, त्यांच्या धर्मात सगळे आलबेल आहे का? विशेष लेख

त्या परिसरात त्याला उपाध्ये कुळागरात वरच्या भागात झरीच्या रूपाने उगम पावलेला ओहळ त्या कुळागराला पाटाने पाणी देत मंदिराकडे येताना मिळतो आणि त्या ओहोळाचा प्रवाह मोठा होतो. पुढच्या प्रवासात त्याला मुळे भाट बागायती मिळते, तिला पाणी देऊन तो पुढील प्रवासात मुख्य रस्ता पार करून तिथली भली मोठी फिरंगी शेती, कातोल, इल्याले, केळेकर या शेतीला पाणी पुरवत नैसर्गिक खळीतून पुढे मानशीच्या मुखातून जुवारी नदीस मिळतो.

चौथा ओहळ पठाराच्या उंचावरील तळ्यात उगम पावत तो खालच्या वनराई भागातून झेपावतो. पुढे खालील कुळागरास पाणी देत पुढे प्रवाहाने भरचेभाटाकडील शेतीला पाणी देत मुख्य रस्ता ओलांडत पुस्कुल, हरीभाट, या शेतीला पाणी पुरवत मानशीतून जुवारीस मिळतो.

आगापूर गावच्या निसर्गाला या लहान चार ओहोळांनी संजीवनी देऊन जैवविविधता वाढवली आहे. त्या परिसरात पठाराच्या उंचावरील लांब पट्टा जंगली झाडांनी व्यापला आहे. मध्य भाग बागायती, कुळागरे आणि लोकवस्तीने व्यापला आहे.

जुवारी नदी काठावरील तिसरा सुपीक पट्टा लांबलचक शेतीने, खाजन शेतीने व्यापला आहे. या गावात प्रवास करताना शांतता पाहावयास मिळते. लोक कष्टकरी आहेत. गावात जुने महादेवाचे मंदिर आहे. तिथले लोक त्या देवाला ‘माधव देव’ म्हणतात. माधव, केशव हा वैष्णव आणि महादेव म्हणजे शैव. पण तिथले लोक महादेवास माधव म्हणतात. विष्णू आणि शंकर दोन रूपात असले तरी देव एकच आहे, हे तिथल्या पूर्वजांनी दाखवून दिले आहे. त्यातून आपल्या पूर्वजांचा एकोपा दिसून येतो.

इवल्याशा आगापूर गावात कवळे पठाराच्या सूर्यास्ताच्या बाजूने लहान चार झऱ्यांचे चार ओहळ देऊन पर्यावरणाचा समतोल निसर्गाने राखला आहे. वाहणाऱ्या त्या ओहोळांच्या पाण्यावर, पठाराच्या उतारावर आमच्या पूर्वजांनी टप्प्याटप्प्यावर कठडे उभारून लांब रुंद चौकोनी वाफे तयार केले. त्यामधून ओहोळाच्या पाण्याचे पाट निर्माण केले.

त्यात सुपारी, नारळ, फणस, आंबा, मिरी, केळ, पपई, मावळींग, कोकम, जाम, नीरफणस ओटम, जायफळ अशा झाडांची लागवड करून हरितक्रांती घडवली. वर्षाकाठी येणारा मान्सून या गावाला वाऱ्याच्या झोताने झोडपून काढतो. कारण आगापूर गाव पठाराच्या एकदम उतारावर असल्याने तिथल्या पठाराचे जंगल आणि बागायती पावसाचे ढग खेचून घेतल्याने त्या भागात जास्त पाऊस पडतो.

त्या गावाला अगस्ती हे नाव का पडले असावे हे सांगणे फार कठीण आहे. कदाचित त्या भागात अगस्ती मुनींचा प्रवास झाला असावा. किंवा आग ओकणारा सूर्य अरबी समुद्रात डुबून अस्ताला जातो, त्या दृश्याने तिथल्या कष्टकरी पूर्वजांनी त्या भागाला अगस्तीपूर नाव ठेवले असावे.

Agapur Goa: सफर गोव्याची! चार ओहोळांच्या पाण्यावर जगलेला अगस्तीपूर गाव
Goa Vegetable Prices: 15 रुपयांना एक शेवग्याची शेंग, 100 ला जुडी; कांदा, बटाटा व टोमॅटो किती महाग? वाचा बाजारभाव

आगापुरातील शेतकरी शेतीचे काम एकत्रित जमून करतात, पूर्वीच्या काळी उन्हाळ्यात प्रत्येक शेतकरी आपापली शेती कुदळीने ढेपळे काढून खणून ठेवत. दहा पंधरा शेतकरी एकमेकांच्या शेतात सकाळ संध्याकाळ एका रांगेत कुदळीने शेत खणत होते. शेतात त्यांच्या कुदळीचे काम पाहताना सीमेवरील देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

पाऊस येण्याच्या अगोदर शेतकरी ओहोळातील अगर खळीतील गाळ उसपून तो चिखल नदी किनाऱ्यावरील बांधावर अगर खळीच्या बांधावर टाकायचे. त्याने भरतीचे पाणी शेतात घुसत नव्हते. पावसाळा सुरू झाला की सर्व शेतकरी खणलेली ढेपळे फोडून त्यावर करंगुट बियाणे पेरणी करायचे.

पेरणी करताना भाताचे कोंब बकुळीच्या फुलाप्रमाणे शेतातील चिखलात रुतायचे. सीमा करण्यास माडाच्या झावळांचे तुकडे (पिडे)शेतात एका रांगेत पुरायचे. महिना दीड महिन्यात हिरव्यागार शेतातील खुरपण काढायचे.

पुढे चतुर्थीच्या दिवसांत भाताला कणस यायचे. दसरा दिवाळीला पिकलेल्या रोपाची कापणी करायचे. करंगुट भाताला साधारण इंचभर लांब टोकदार काट्याचे कूस असते. कणस पाहताना गव्हाच्या कणसाप्रमाणे दिसते, मात्र करंगुट भाताचा रंग काळपट असतो. एकमेकांना सहकार्य करून मळणी करायची.

आगापुरच्या शेतातील बांधावर पावसाळ्यात शेतकरी लोक भेंडी आणि वाल भरपूर पिकवीत होते. तिथली भाजी फार रुचकर लागते. फोंडा तालुक्याच्या बाजूने जुवारीचा काठ निसर्गाने फारच रमणीय बनवला आहे. पारांपई- कर्नाळे, उंडीर, आडपई, दुर्भाट, अडुळशे बोरी, काराय- शिरोडा गावे जुवारीच्या पात्रात घुसली आहेत.

गावणे, आगापूर, वाडी, तरवळे, वाजे, पंचवाडी या भागांत जुवारीचे पात्र बरेच रुंदावले आहे त्या भागात ओहोळातील सुपीक गाळ साचून कैक शतकांपूर्वी तिचे रुंद पात्र चिखलमय झाले असावे. आपल्या पूर्वजांनी कष्टाचे काम करून त्या चिखलमय ओहोळांच्या मुखाकडे सुपीक शेती निर्माण केली. त्या शेतीत धान्य पिकवून आपण जगलो, पुढचे भविष्य घडवले आणि शेजारधर्म पाळला.

आपल्या गोव्यात हिंदू, ख्रिश्चन आणि मुसलमान लोक एकत्र शेती करून गुण्यागोविंदाने जगले होते. त्यांनी एकमेकांची सुखदुःखे सोसली होती. पण आज आपल्या गोव्यातील शेती, त्यातून वाहणाऱ्या ओहळ झऱ्यांचे पाणी, त्यांच्या काठावरील जंगल, तयार केलेल्या बागायती नष्ट करून बंगल्या, इमल्यांची जंगले वाढत आहेत.

आगापूर गावच्या ओहोळांच्या मुखाकडील जुवारी नदीत वेगवेगळ्या प्रकारची गावठी मासळी विपुल प्रमाणात आढळायची. मात्र सर्वत्र ओहोळांच्या प्रदूषित पाण्याने नदी पात्र बिघडून त्याचा मत्स्य धनावर वाईट परिणाम होताना दिसत आहे.

- मधू य. ना. गावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com