गोव्यात सध्या आश्विनातल्या नवरात्रीचे चैतन्यमयी दिवस सुरू आहेत. अंत्रुज महाल आणि परिसरातल्या मंदिरांत मखरोत्सव उत्साहाने सुरू आहे. मखरात बसलेली दैवते ही परंपरा आपल्या देशात भाविकांनी भावभक्तीने शेकडो वर्षांपूर्वी निर्माण केलेली आहे. त्यातून भाविकांची कला आणि संस्कृती क्षेत्रातल्या सृजनात्मकतेचा आविष्कार पाहायला मिळतो.
आपल्या आराध्याविषयी अंतःकरणात जी प्रेम आणि भक्तीची उत्कट भावना आहे ती प्रकर्षाने अभिव्यक्त करण्यासाठी भाविकांनी पूर्वापार वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग केलेला आहे. सण, उत्सवांप्रसंगी गर्भगृहात स्थानापन्न केलेल्या पाषाणी आणि धातूच्या मूर्तीशिवाय उत्सवमूर्तीलाही सजवण्यासाठी मखर, तोरणाचा उपयोग प्राचीन काळापासून केलेला पाहायला मिळतो.
महाराष्ट्रातल्या संभाजीनगरजवळ असणाऱ्या वेरूळच्या लेण्यात गंगेचे चित्र आहे त्यात मकर, तोरण दाखवलेले आहे. त्याचप्रमाणे खिद्रापूरातील वर्धमान महावीराच्या मूर्तीवरती मखर, तोरण कोरलेले आहे. बऱ्याच प्राचीन मूर्ती शिल्पात मगरीच्या मुखाचा वापर तोरण म्हणून दाखवण्याची नियोजनबद्ध परंपरा आपल्या मंदिरांत प्रचलित आहे. मूर्तीचे सौंदर्य अभिवृद्ध करण्यासाठी मकर तोरणाचे चित्र कोरण्यातून कालांतराने उत्सव मूर्तीला मखरात आसनस्थ करण्याची परंपरा निर्माण झाली असावी.
गोव्यातील भाविकांनी आराध्य दैवताला मखरात आसनस्थ करण्याची परंपरा तीर्थक्षेत्री विविध देवदेवतांच्या मंदिरातल्या मूर्तीत जे मकर तोरण दाखवलेले आहे त्यातून प्रेरणा घेतली असावी. मगरीच्या मुखाच्या संकल्पनेतून भाद्रपद चतुर्थीला जेव्हा मृण्मय गणपतीची घरोघरी मूर्ती स्थानापन्न केलेली असते, तिच्यासाठी लाकडाच्या तोरणाची कलाकृती वापरून त्यालाच मखर ही संज्ञा दिली.
गोव्यातल्या काही शतकोत्तर इतिहासाचा वारसा असलेल्या राजांगणाने युक्त घरात जी लाकडी मखरे चतुर्थीच्या दिवसांत गणपतीच्या मूर्ती आसनस्थ करण्यासाठी वापरली जातात त्यातून जुन्या काळातल्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या विविधांगी पैलूंचे दर्शन घडत असते. काही घरांत लाकडी चौकोनी मखराला खास आरसे बसवून त्यात देवदेवतांच्या प्रतिमा बसवल्याने त्यातून एकेकाळी प्रचलित भावविश्वाचे दर्शन घडते. अशी लाकडी रंगीत मखरे केवळ अशा घरांत केवळ चतुर्थीच्या कालखंडात वापरली जातात.
गणेशचतुर्थीच्या सणात गोव्यातल्या ज्या घरात जुनी लाकडाची मखरे आहेत, ती केवळ वर्षातून एकदाच काढून त्यांची साफसफाई आणि रंगरंगोटी करून गणपतीची मूर्ती स्थानापन्न करण्यासाठी वापरतात. परंतु नवरात्रीच्या सणात मात्र अशी लाकडाची मखरे कुठे पहिल्या दिवसापासून तर कुठे तिसऱ्या दिवसांपासून ते विजयादशमीपर्यंत आराध्य देवतेच्या उत्सवमूर्तीला फुलांनी सुरेख सजवलेल्या मखरात आसनस्थ करून त्याला गोलाकार फिरवले जाते.
बऱ्याच मंदिरात हे सजवलेले मखर साखळदंडाने टांगलेले असते आणि भाविक उत्सवावेळी ते ढोल, तासा, कासाळे या पारंपरिक लोकवाद्यांच्या जोशपूर्ण वादनात अशा रीतीने फिरवतात की त्यामुळे मखरातली उत्सवमूर्ती प्रत्यक्ष जिवंत झाल्याचा आभास उपस्थितांना होतो आणि भाविकांबरोबर अन्य संस्कृतीप्रेमी मंडळी हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी आवर्जून येतात.
आश्विनातल्या नवरात्रीचा कालखंड हा गोव्यातल्या मंदिरांसाठी उत्सवाबरोबर उत्साहाच्या आविष्काराचा परमोच्च बिंदू असतो. त्यामुळे मखरोत्सवाचा सोहळा हा जरी मंदिरातला मुख्य कार्यक्रम असला तरी त्याचबरोबर भजन, कीर्तन यांचे सादरीकरण भाविकांना दिव्यत्वाची प्रचिती देण्यासाठी कारणीभूत ठरत असते. शेकडो वर्षांपासून नवरात्रीतला मखरोत्सवाचा सोहळा हा विशेषत्वाने अंत्रुज महालातल्या काही मोजक्याच मंदिरांत व्हायचा, याचे ऐतिहासिक संदर्भ अल्प प्रमाणात आढळतात.
परंतु आज त्यांच्या मखरोत्सवाचे अनुकरण गोव्यातल्या अन्य मंदिरांच्या व्यवस्थापनांनी केले आहे. त्यामुळे नवरात्रीतल्या जागराचे पुण्य लाभावे म्हणून भाविक त्यात आत्मीयतेनं सहभागी होतात. आपल्या दैनंदिन व्यवहाराचा बोजा सर्वसामान्य माणसे नित्यनेमाने समर्थपणे आपल्या अंगाखांद्यावर वाहत नेत असली तरी त्यांना आपल्या आराध्य दैवताचा कृपाशीर्वाद लाभावा ही तीव्र भावना मनात असते आणि त्यातून मखरोत्सवात सहभागी होणे ही बाब त्यांच्यासाठी अत्यावश्यक असते.
आश्विन नवरात्रीच्या उत्सवाचा नऊ रात्रींचा कालखंड हा जरी शक्तीरूपिणी मातृदेवतेविषयीची उत्कट भावभक्तीची भावना अभिव्यक्त करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेला असला तरी आज काही पुरुष दैवतांच्या मंदिरांनी झुल्यावरच्या मखरात आराध्य दैवताच्या उत्सवमूर्तीला बसवून त्या सोहळ्यात देहभान विसरून सहभागी होण्याला विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे पाहावयास मिळते. त्यामुळे रामनाथ, मंगेश, देवकीकृष्ण मंदिरांत होणारा मखरोत्सव अनुभवणे ही भाविकांसाठी आनंदोत्सवाची बाब ठरलेली आहे.
फोंडा तालुक्यातल्या वरगावातल्या माशेलातील देवकीकृष्ण मंदिरातील झुल्यावरचा मखरोत्सव ढोल, ताशे आणि कासाळे यांद्वारे निर्माण होणाऱ्या पारंपरिक संगीतावरती अनुभवण्यासाठी भाविक केवळ गोव्यातूनच नव्हे तर महाराष्ट्र, कर्नाटकातून उपस्थित होतात. त्यांच्यासाठी देवकीकृष्णाची सजवलेली उत्सवमूर्ती जणू काही सजीव होऊन आपल्या रूपात एकात्म करून घेते आणि त्यामुळे संसाराचे व्याप-ताप काही काळ विसरून ते त्यात सहभागी होण्याला प्राधान्य देतात. मखरोत्सवाचा इथला सोहळा दररात्री चढत्या क्रमाने रंगत जात असला तरी महानवमीच्या रात्रीचा हा सोहळा अनुभवताना भक्त भारावलेल्या अवस्थेला पोहोचतात.
म्हाळसा नारायणी देवीची मूर्ती सदर मंदिर सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात वेर्णा येथील पठारावर ख्रिश्चन मिशनरींनी उद्ध्वस्त केल्यावर अन्यत्र स्थलांतरित करण्यात आली. त्यानंतर फोंड्यातल्या प्रियोळात म्हाळसा नारायणी मंदिर बांधण्यात आले आणि त्या मंदिरात वर्षभर जे कार्यक्रम साजरे केले जातात त्यात आश्विन नवरात्रीतला मखरोत्सव मातृस्वरूपी म्हाळसा नारायणीच्या आगळ्यावेगळ्या आविष्काराचे दर्शन घडवत असल्याने भाविक त्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात.
कवळ्याची शांतादुर्गा, ढवळीची भगवती, मडकईची नवदुर्गा या शक्तिरूपिणी देवतांच्या उत्सवमूर्तींना मखरात स्थानापन्न करून जो उत्सव साजरा होतो तो अनुभवणे हा भाविकांसाठी अप्रूप आणि संस्मरणीय असाच अनुभव असतो. भारतभर आश्विन नवरात्रीचा सण दुर्गापूजनाबरोबर गरबा, दांडिया नृत्यांच्या आविष्करणाने होत असला तरी गोव्यातल्या कृषिप्रधान संस्कृतीत एकेकाळी वावरणाऱ्या आपल्या पूर्वजांनी अन्नधान्यांची समृद्धी आणि वैभव देणाऱ्या या मातृशक्तीविषयीची कृतज्ञता आणि भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी झुल्यावरच्या मखरोत्सवाची आगळीवेगळी परंपरा निर्माण केली आहे, जी इथल्या लोकसंस्कृतीच्या पैलूंचे सुंदर दर्शन घडवत असते!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.