Monsoon Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Monsoon: पावसाची वाट, पृथ्वीची गोष्ट

Monsoon Rain Importance: गोव्यात किंवा कोकणात पडणाऱ्या एखाद्या पावसाच्या थेंबाचा प्रवास काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात सुरू झालेला असू शकतो.

दैनिक गोमन्तक डिजिटल

अतुल पु. नायक

गोव्यात किंवा कोकणात पडणाऱ्या एखाद्या पावसाच्या थेंबाचा प्रवास काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात सुरू झालेला असू शकतो. हा जलचक्राचा प्रवास लाखो वर्षांपासून अखंड सुरू आहे. त्यावरच नद्या, जंगले, शेती, गावे, शहरे आणि मानवी संस्कृती उभी आहे.

गोव्यात किंवा कोकणात पडणाऱ्या एखाद्या पावसाच्या थेंबाचा प्रवास काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात सुरू झालेला असू शकतो. हा जलचक्राचा प्रवास लाखो वर्षांपासून अखंड सुरू आहे. त्यावरच नद्या, जंगले, शेती, गावे, शहरे आणि मानवी संस्कृती उभी आहे. ये रे, ये रे पावसा, तुला देतो पैसा... पावसाची वाट पाहताना हे बालगीत गोवा आणि महाराष्ट्रात अनेक पिढ्या गुणगुणत आल्या आहेत.

पावसाबद्दलचे आकर्षण, त्याची आतुरतेने वाट पाहणे आणि त्याच्या आगमनाचा आनंद आपल्या संस्कृतीत इतका खोलवर रुजला आहे की हे साधेसे बालगीत आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या ओठांवर सहज येते. यंदा मात्र ‘ये रे ये रे पावसा’ म्हणणाऱ्या अनेकांच्या मनात नकळत एक प्रश्‍‍न दडलेला आहे , ‘पावसा, तू येणार तरी कधी?’ जूनचा बराचसा महिना उलटून गेला, पण अनेक भागांत अजूनही आकाशाकडे अपेक्षेने पाहण्याचे दिवस संपलेले नाहीत.

गोवा, कोकण आणि महाराष्ट्रातील अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे लागली आहे. धरणांतील पाणीसाठ्यांवर चर्चा सुरू आहे. हवामानाच्या अंदाजांमध्येही नेहमीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त होत आहे. काही ठिकाणी दुष्काळाचीही चिंता व्यक्त केली जात आहे. पाऊस वेळेवर आणि पुरेसा झाला की आपण त्याचा फारसा विचार करत नाही. नद्या वाहतात, विहिरी भरतात, पिके वाढतात आणि जीवन नेहमीप्रमाणे पुढे सुरू राहते.

पण पावसाने दांडी मारली की त्याचे खरे महत्त्व जाणवते. कारण, पाऊस म्हणजे फक्त हवामान नाही. पाऊस म्हणजे पाणी. आणि पाणी म्हणजे जीवन. पाण्याचा शोध आपल्या ताटातील भात, बागेतील फुले, झाडांवरील फळे, आकाशात उडणारे पक्षी आणि आपण स्वतः सगळे पाण्यावर अवलंबून आहोत. पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या अस्तित्वामागे पाण्याची गोष्ट दडलेली आहे.

पहिल्या पावसाबरोबर मातीमधून दरवळणारा सुगंध आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे. त्या सुगंधालाही एक सुंदर नाव आहे - ‘पेट्रिकोर’. कदाचित हे नाव अनेकांनी प्रथमच ऐकले असेल; पण त्याचा अनुभव मात्र आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. कोरड्या जमिनीवर पावसाचे थेंब पडल्यावर निर्माण होणारा हा सुगंध अनेकांच्या मनात जुन्या आठवणी जाग्या करतो. विज्ञान त्याचे कारण सांगू शकते, पण त्या सुगंधात दडलेली भावना शब्दांत मांडणे कठीण आहे.

पाणी आणि जीवन यांचे हे नाते इतके मूलभूत आहे की विश्वात इतरत्र जीवनाचा शोध घेणारे शास्त्रज्ञसुद्धा सर्वप्रथम पाण्याचाच शोध घेतात. त्यांचा पहिला प्रश्न असतो, ‘तिथे द्रवरूप पाणी आहे का?’ जिथे पाणी असण्याची शक्यता असते, तिथे जीवनाचीही शक्यता असते. म्हणूनच पाण्याचा विचार करताना नकळत आपल्याला आपल्या स्वतःच्या ग्रहाकडे पाहावे लागते.आपल्या ग्रहाकडे एक नजर गेल्या काही महिन्यांत आपण या सदरातून शुक्र आणि गुरू ग्रहांविषयी जाणून घेतले.

पुढील काही महिन्यांत शनि आणि मंगळ यांच्याविषयीही बोलू. पण सध्या ढगांनी आकाश झाकलेले आहे. ग्रह-ताऱ्यांचे निरीक्षण फारसे शक्य नाही. म्हणून यावेळी आपल्या सर्वांत जवळच्या ग्रहाबद्दल बोलुया, पृथ्वीबद्दल. आपण रोज तिच्यावर चालतो, राहतो आणि जगतो. त्यामुळे तिचे वैशिष्ट्य आपल्या लक्षातच येत नाही. घरातील एखादी मौल्यवान वस्तू सतत नजरेसमोर असल्याने जशी दुर्लक्षित राहते, तशीच काहीशी पृथ्वीची गोष्ट आहे.

पण अंतराळातून पाहिले तर पृथ्वी विलक्षण दिसते. निळ्याशार महासागरांनी व्यापलेला हा ग्रह सौरमालेतील इतर ग्रहांपेक्षा वेगळाच भासतो. पृथ्वीच्या सुमारे दोन-तृतीयांश पृष्ठभागावर पाणी आहे. म्हणूनच अंतराळवीर पृथ्वीला अनेकदा ‘निळा ग्रह’ असे संबोधतात. आपण वाट पाहत असलेला पाऊसही अखेरीस याच महासागरांतून येतो. समुद्रातून आकाशात, आकाशातून ढगांमध्ये आणि ढगांतून पुन्हा पृथ्वीवर पाण्याचा हा प्रवास लाखो वर्षांपासून सुरू आहे.

आपण वाट पाहत असलेला प्रत्येक पावसाचा थेंब या अखंड चक्राचा भाग असतो. गोव्यात किंवा कोकणात पडणाऱ्या एखाद्या पावसाच्या थेंबाचा प्रवास काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात सुरू झालेला असू शकतो. हा जलचक्राचा प्रवास लाखो वर्षांपासून अखंड सुरू आहे. त्यावरच नद्या, जंगले, शेती, गावे, शहरे आणि मानवी संस्कृती उभी आहे. पृथ्वी एवढी विशेष का?

सौरमालेतील इतर ग्रहांकडे पाहिले की पृथ्वीचे भाग्य अधिक स्पष्ट होते. बुध सूर्याच्या उष्णतेने भाजून निघतो. शुक्रावरील तापमान इतके जास्त आहे की शिसेही वितळू शकेल. मंगळावर कधीकाळी पाणी असावे असे संकेत मिळतात; पण आज तो थंड आणि कोरडा दिसतो. पृथ्वी मात्र वेगळी आहे. सूर्यापासून योग्य अंतरावर असलेला हा ग्रह द्रवरूप पाणी टिकवून ठेवू शकतो. याच कारणामुळे पृथ्वीवर असंख्य प्रकारचे जीव निर्माण झाले.

सूक्ष्म जीवांपासून ते विशाल वृक्षांपर्यंत, फुलपाखरांपासून ते गरुडांपर्यंत आणि स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करणाऱ्या मानवापर्यंत सर्वजण या ग्रहाच्या उदारतेचे लाभार्थी आहेत. पावसाचा खरा अर्थ यंदाच्या पावसाबद्दलची अनिश्चितता आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. पाण्याची किंमत आपल्याला त्याची कमतरता जाणवली की कळते. पण पाणी म्हणजे फक्त धरणे, विहिरी किंवा पावसाची आकडेवारी नाही.

पाणी म्हणजे जीवनाला जोडणारा अदृश्य धागा आहे. ढग, समुद्र, नद्या, जंगले, शेती, पक्षी, प्राणी आणि मानव यांना एकमेकांशी जोडणारा धागा. पुढील काही आठवडे आपण सर्वजण आकाशाकडे पाहत राहू. भरपूर पावसाची आशा करत राहू. तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायला हरकत नाही. आपण एका विलक्षण ग्रहावर राहतो. अशा ग्रहावर, जिथे महासागर, वातावरण, सूर्यप्रकाश आणि जीवन यांचा संवाद अब्जावधी वर्षांपासून अखंड सुरू आहे. आणि जिथे पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब त्या संवादाचाच एक भाग आहे. कदाचित म्हणूनच पावसाची वाट पाहणे म्हणजे केवळ हवामानाची वाट पाहणे नाही; ती जीवनाची वाट पाहणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

एकामागून एक पक्षफुटी; मोदी सरकारला नेमकं काय साधायचंय?

Panjim: दारू पिऊन नग्नावस्थेत रोडवरच पडतात; पणजीत मद्यपी, भिकाऱ्यांचा सुळसुळाट; पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष

Monsoon Update: रुसवा संपला, पाऊस बरसला; गोवेकरांना दिलासा, पुढील काही दिवसांत वाढ शक्य; हवामान खात्‍याचा अंदाज

वाहतूक नियमांचे डोळ्यांसमोर उल्लंघन, रक्षक सुस्तच; राजधानी पणजीत पाटो पुलावर रात्रीची स्‍थिती गंभीर; 'नो एन्‍ट्री'तूनही शिरतात वाहने

Drowning Death: कुळेत आणखी दोघांचा बुडून मृत्‍यू, दोघेही मूळ कर्नाटकचे; राज्यात गेल्‍या 21 दिवसांत 12 जणांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT