दत्ता दामोदर नायक
एकूण लोकसंख्येच्या १० टक्के लोक डावखुरे असतात, असा संख्याशास्त्रीय अंदाज आहे. भारताच्या १४० कोटी लोकसंख्येत सुमारे १४ कोटी लोक डावखुरे आहेत. आपण डावखुऱ्यांकडे नेहमीच तुच्छतेने पाहतो. लहान वयात डाव्या हाताने लिहिणाऱ्या मुलांनी उजव्या हाताने लिहावे असा आईवडिलांचा आग्रह असतो. डावखुऱ्यांकडे आपण अधिक सहृदयतेने, आपुलकीने पाहावे, हा १३ ऑगस्ट डावखुऱ्यांचा दिवस म्हणून साजरा करण्यामागचा हेतू आहे.
जगामधील अनेक ख्यातनाम कलाकार, साहित्यिक, खेळाडू, राजकारणी हे डावखुरे होते व आहेत. ह्यामध्ये सिस्टिम चॅपेलचे अर्धगोलाकार छत रंगवणारा मायकेल एंजेलो, ज्युलियस सीझर, नेपोलियन, बिल गेट्स, बराक ओबामा, बिल लिटंन, रतन टाटा, सर गारफिल्ड सोबर्स, अॅन्जेलिना ज्योली, ज्युलिया रॉबर्टस, रॉड लिवर्स, सौरव गांगुली, अमिताभ बच्चन ह्यांचा समावेश होतो.
मला स्वतःला डावखुऱ्या माणसांबद्दल अतिशय ममत्व आहे. माझ्या व्यापारी तथा औद्योगिक आस्थापनांत डावखुरे व्यवस्थापक व कर्मचारी असावेत हे मी पाहतो.
मुलाखत घेताना सेल्स, मार्केटिंग, फायनान्स अशा क्षेत्रांतील डावखुऱ्या उमेदवारांचे दहा गुण मी वाढवतो; पण, फॅटरी फ्लोअरवर काम करणाऱ्या कामगारांची मुलाखत जो व्यवस्थापक घेतो त्याला डावखुऱ्या उमेदवाराचे मी दहा गुण कमी करायला लावतो. त्याला तसेच कारण आहे. डावखुरी माणसे उजव्या माणसांपेक्षा अधिक बुद्धिमान नसली तरी अधिक सर्जनशील खचितच असतात आणि एखाद्या व्यापारी तथा औद्योगिक आस्थापनाला अशीच सर्जनशील माणसे हवी असतात.
पण डावखुरी माणसे अपघातप्रवण (अॅक्सिडेंट प्रोन) असतात. त्यांचा ज्या ज्या वेळी यंत्रांशी संबंध येतो, त्या त्या वेळी त्यांनी सावध राहणे गरजेचे असते; कारण, सर्व यंत्रे ही जगातील माणसे उजव्या हाताने काम करतात हे गृहीत धरून केलेली असतात.
त्यामुळे डावखुऱ्या कामगारांची ती चालवताना गैरसोय होते व अपघात होतात. यंत्रेच काय, आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू डोळ्यांपुढे आणा. शर्टाची बटणे पाहा. मोबाइलची स्क्रीन पाहा. शिवणयंत्रे घ्या. गाडीचे गिअर्स घ्या.
मोटरसायकलची किक मारायची आहे असे समजा. साधी कात्री हातात घ्या. ह्या सगळ्या वस्तू डावखुऱ्यांना फार गैरसोयीच्या आहेत. उजव्या लोकांच्या ध्यानीमनी येणार नाही की डावखुऱ्यांची किती गैरसोय होत असेल! आपण असा विचार करू, की मोटरसायकलची किक विरुद्ध दिशेला आहे. शर्टची बटणे, कातरी, शिवणयंत्रे ही सगळी डावखुऱ्या लोकांनी आपल्या सोयीप्रमाणे बनवली तर उजव्या लोकांची किती अडचण होईल बरे!
ह्याच प्रकारे जागतिक लोकसंख्येच्या १० टक्के डावखुऱ्या लोकांसाठी हव्या असणाऱ्या दैनंदिन वस्तूची मागणी पाहून अमेरिकेत leftys नावाचे दुकान उघडले असून, त्याला डावखुऱ्या ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे. आता इतर देशांत leftysच्या शाखा उघडल्या जात आहेत. डावखुऱ्यांना जेव्हा त्यांना सोयीची अशी अवजारे, यंत्रे उपलब्ध होतील; तेव्हा त्यांची उत्पादकता वाढेल. डावखुऱ्यांना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी होईल.
डावखुरेपणा आनुवंशिक आहे काय? खचितच असावे! डावखुरेपणावर शास्त्रज्ञांनी भरपूर संशोधन केले आहे; पण, त्यांना म्हणावे तसे यश मिळालेले नाही. डावखुरेपण हे ’पीसीएसके ६’ या जीनमुळे येत असावे असे शास्त्रज्ञांना वाटते; पण ह्याबद्दल ते ठाम मत मांडू शकत नाहीत.
डावखुऱ्या माणसांचा उजवा मेंदू अधिक तल्लख असतो; कारण उजवा मेंदू हा माणसाचे डावे स्नायू नियंत्रित करत असतो. डावखुऱ्या लोकांच्या उजव्या व डाव्या मेंदूमधला नर्व्ह फायबर उजव्या लोकांपेक्षा ११ टक्के जाड असतो, असेही शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. पण डावखुरेपणावर ठामपणे पक्का सिद्धान्त मांडण्यात सर्व शास्त्रज्ञ अपयशी ठरले आहेत.
डावखुरा पती व डावखुरी पत्नी ह्यांच्या विवाहानंतर जन्मणारे अपत्य हे डावखुरे होण्याची संभाव्यता अधिक असेल काय? प्राणी किंवा पक्षी डावखुरे असतात काय? उजव्या माणसांना उत्क्रांतीच्या वाटेवर काही फायदे झाले काय? सुरुवातीसुरुवातीला ५० टक्के माणसे उजवी आणि ५० टक्के डावखुरी होती आणि पुढे शेपटीसारखे ४० टक्के लोकांचे डावखुरेपण गळून पडले काय? अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत!
एखाद्याला प्रशिक्षित करून डावखुरा करणे शक्य आहे का? उदाहरणार्थ; क्रिकेट संघात डावखुरा फलंदाज असणे गरजेचे असते. एक फलंदाज उजवीकडून खेळणारा आणि दुसरा डावखुरा असला की प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाची अडचण होते.
किंवा डावखुऱ्याला प्रशिक्षित करून उजव्या हाताने काम करणारा बनवता येईल का? आणि सरतेशेवटी, जागतिक उत्पादकता वाढवण्यासाठी जगातील सर्व माणसांना दोन्ही हातांचा सारखाच उपयोग करण्यासाठी लहानपणापासून प्रशिक्षित करता येईल का?
जे महात्मा गांधींसारखे दोन्ही हातांनी पत्रे लिहू शकतात किंवा सर्व व्यवहार करू शकतात, त्यांच्या जीन्समध्ये काय आहे? मी सध्या सिद्धार्थ मुखर्जीचे ’द जीन’ हे पुस्तक वाचतो आहे. ’खुल जा सीम सीम’ म्हणत ’जेनेटिस’ मधली ही अल्लादिनची विज्ञानाची नवी गुहा आपल्यापुढे आता उघडते आहे. मानवी ज्ञानाच्या परिसीमेवर आपण आज उभे आहोत.
आपल्या आजवरच्या ज्ञानाचे थिटेपण आपल्याला उमगले आहे. म्हणून आपला बौद्धिक अहंकार पानगळीच्या पानाप्रमाणे एकेक करून गळला आहे आणि आपण निष्पर्ण झालो आहोत. ही निष्पर्ण नम्रताच आपल्याला नव्या ज्ञानाच्या वसंत ऋतूकडे घेऊन जाणार आहे.
हे ज्ञान तिहेरी असेल. खगोलशास्त्रज्ञ काळोख्या अंतरिक्षातील गुरुत्वाकर्षणीय लाटांवर स्वार होऊन दूरस्थ ताऱ्यांनी गुणसूत्रे शोधत आहेत. पदार्थ विज्ञानात नॅनो टेनॉलॉजीवर स्वार होऊन अणुरेणूचे अंतरंग धुंडाळत आहेत आणि शरीरशास्त्रात मानवी शरीराच्या रक्तवाहिन्यातून पाणबुड्यांतून प्रवास करीत मानवी जेनेटिसाची गुणसूत्रे शोधत आहेत. ही तीन दिशांचा तिहेरी प्रवास मानवी ज्ञानात अनंत भर घालणार आहे. ह्या प्रवासात कदाचित डावखुरेपणाचे गूढ उलगडेलही!
तोपर्यंत, आपण आपल्या अवतीभोवतीच्या आपल्या डावखुऱ्या सग्यासोयऱ्यांशी, इष्ट मित्रांशी आपुलकीने वागूया. १३ ऑगस्ट हा डावखुऱ्यांचा दिवस साजरा करण्यामागची हीच तर भावना आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.