कला अकादमीच्या नाट्यस्पर्धेच्या लाच प्रकरणात जी नामुष्की, नालस्ती व नाचक्की ओढवली आहे त्यावर ‘गोमन्तक’ने टाकलेला प्रकाशझोत अद्वितीय आहे. त्यासाठी संपादक-संचालकांचे व संपूर्ण टीमचे अभिनंदन.
खरे म्हणजे नाव ‘प्रदीप’ असले तरी अकादमीला नैतिकतेपासून दूर अंधारात नेण्याचे ‘श्रेय’ या अधिकाऱ्याला जाते. मला कैक अनुभव आहेत. भजनस्पर्धेत मी अनेकदा परीक्षक म्हणून काम केले आहे.
त्यावेळी अमुक संस्थेला ‘वर खेचा’, ‘रेटा’, ‘ओढा’ हे संकेत हा आदेशासारखे देण्याचा प्रयत्न करतो. मी तत्क्षणी त्याचे वाभाडे काढले होते. परीक्षकपद मी स्वीकारतो कारण संगीत, नाटक, साहित्य हे आमच्या कुटुंबाचे पिढीजात जगणे आहे, जीवनशैली आहे. बाकी वकिली व्यवसायापुढे योग्य तो वेळ पुरत नाही, हे त्याला खडसावून सांगितले.
रही बात सुशांतकी... सुशांत विद्यार्थी दशेत असतानापासून माझ्याकडे येतो. काका, म्हणत फोन करून विचारपूसही करतो. पण हल्ली त्याच्या डोक्यात कसली नशा चढली आहे ते कळत नाही. निकालावेळी सुशांतने अशांत होऊन हे कारनामे करण्याची गरज नव्हती.
मित्रहो, मी ताबडतोब त्याला फोनवरून संपर्क केला आणि बोललोही. दिल्लीत होता. पण त्याने अळीमिळी गुपचिळी केले. ‘प्रदीपने तुला स्पीकरवरून फोन लावून दिला त्यावेळी तू त्या परीक्षकांना (ज्यात एक महिलाही होती) मद्य पार्टी, पैसा आमिष याविषयी बोलला होतास का?
’ या प्रश्नावर तो ‘नाही, नाही ते मी नंतर बोललो होतो’ असे काहीसे तो टाळाटाळ करत बोलला. नाटकातील अभिनय नव्हे पण वेगळ्याच प्रकारे हसू लागला. असो. आम्हांला कोर्टात उलट तपासणी वा इतर अशिलांशी ऑफिसात बोलताना असे असंख्य अनुभव आहेत.
चौकश्या होतील तेव्हा होतील. त्या आम्ही बघतच आहोत. पण जो अन्याय प्रामाणिक रंगसाधकांवर होतो तो असहनीय आहे. मुळात जी कृती कैक वर्षांअगोदरची आहे, ती आज मंचाला पचणारी नाही. ती निवड करणे हीच एक घोडचूक. नंतर हे घोडं दामटवून त्याला ‘पहिलाच क्रमांक द्या’ असे म्हणणे म्हणजे गुन्हा. ज्याची शहानिशा झालीच पाहिजे. सर्व कलाकारांनी एकवटून याचा निषेध केला पाहिजे.
प्राप्त परिस्थितीत, आतापर्यंत जी नाटके प्रथम आली आहेत त्यांच्या सत्यतेविषयी ‘ऑडिट’ घेणे गरजेचे आहे असे मला वाटते. या अधिकाऱ्यांद्वारे ‘सेटिंग’, ‘फिक्सिंग’ करण्याची संस्कृती फारच बोकाळली आहे असे कानावर पडत होते.
पण उगाच ठोस पुरावा नसल्याने लोक काहीही बोलत असू शकतात असे मनाचे समाधान करून घेतले. आता परीक्षकांवर आणलेला हा मोठा दबाव, एक प्रकारची मुजोरी यावरून हा रोग कैक वर्षांचा ‘क्रॉनिक’ आहे हे सिद्ध झाले आहे. याला कला अकादमीच सर्वस्वी जबाबदार आहे. कारण जे अधिकारी नाट्यस्पर्धा, भजनस्पर्धा यात आपली दादागिरी करून आपल्याला हव्या त्या संस्थेला हवे ते परीक्षक घालून बक्षिसे देतात त्यांचा धिक्कार झाला पाहिजे.
कला अकादमीच्या जखमा खूप आहेत. त्या भरून यायला दीर्घ काळ जाईल. कारवाईचा औषधोपचार चालताना परत काही चटावलेले लोक भ्रष्टाचार चालू ठेवू शकतात. एक जखम भरून येते न येते तोच दुसरी भरलेली जखम उसवू शकते.
वाङ्मयचौर्य ही अशीच एक भळभळणारी जखम. कोकणी नाट्यस्पर्धेला लागलेले एक लांच्छन. खग्रास ग्रहण. आपल्या नावावर अनुवाद खपवणारा तो यंदा सापडला. त्याच्यावर लेख आले तरी कला अकादमीला त्याचे काहीच देणेघेणे नाही. अशा बेफिकीर कलाकारावर तीन वर्षे बंदी व संस्थेवरही बंदी तीन वर्षे तरी घालायला हवी. कोकणीचे ‘म्हालगडे’ एक म्हण सांगायचे :
निळू म्हजो निळू, कोलत्यांनी खेळूं,
घर म्हजें जळूं पूण निळू म्हजो खेळूं.
काही ‘निळू’ कला अकादमीलाच कोलीत घेऊन आग लावत आहेत. म्हणून अग्निशमन नको का कारवाईचे?
कोकणी नाटकाला उतरण, घसरण लागली आहे. मौलिक संहिता आल्या तर एक तर त्या सुमार दर्जाच्या असतात. जत्रेची नाटकं असतात किंवा कॉपी मारलेल्या असतात जे यंदा उघड झाले. संवाद लेखनाचे मर्म नवलेखकांना समजावण्यासाठी कोकणी अकादमीने काहीच केलेले नाही.
भविष्यात केले तरी फुटकळ एक दोन नाटकं लिहिणाऱ्यांना बोलावून ते ठरावीक टेप ऐकवतील. ही गटबाजी, कळपशाही, कंपूशाही फारच वाढत आहे. बेटांची संख्या खूप. बेटांचा आकारही आकुंचित होत आहे. बेटे मनुष्यांची, बेटे कथित लेखकांची व कलाकारांची. कुठून तरी ओरबाडून आपल्याला काय मिळेल, ही वांच्छा. पदे किंवा पुरस्कार.
‘मला दोरेमोची राखी पाहिजे’ असे एक मुलगा पणजी बाजारात रडताना पाहिला. बहीण राखी बांधणार, ती आणेल ती. पण हा आईकडे हट्ट धरून बसला, ‘मला दोरेमोची मोठ्ठी राखी पाहिजे’. तिने रडू थांबवण्यासाठी एकदाची ती घेतली.
याच प्रकारे ‘माझ्या ‘कार्मेलिन’ला पहिलेच बक्षीस द्या’ असा हट्ट या अधिकाऱ्यांनी धरला. हे नाटक त्या दर्जाचे नाही असे परीक्षकांनी स्पष्ट बजावले. लहान मुलासारखा हट्ट हे धरत होते. यांनी मद्य, प्रत्येकी ५० हजार रुपये लाच दाखवली.
तिथेच गोमंतकीय कलाकारांची मान खाली गेली. बांगडा चुलीत भाजतात तशी लाज शरम भाजून खाल्लेले हे लोक. कायदा अस्तित्वात आहे, हे या बेमुर्वतखोरांना कारवाई करून अनुभव करवून द्यायला पाहिजे. केलेले पचते ही सवय झाली आहे.
बाष्कळपणा करायला कुणी धजू नये असा धाक हवा, जरब हवी. कला अकादमीचे अंगांग कुजवणाऱ्या जखमा भरून येण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. अकादमीची सर्वार्थाने रया गेलीच आहे. ती आणखीन जाईल. वाङ्मयचोर असोत, की असे भ्रष्टाचारी अधिकारी असोत; मुजोरीची गर्दन आवळण्यासाठी या शिक्षेची गरज आहे. अकादमी वाचवायची असेल तर तो उपचार व्हावा ही मागणी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.