Goa Marathi Natyaspardha: '..असे प्रकार घडत राहिले तर मात्र सगळ्या नाट्यस्पर्धांवरच पडदा पडेल'; निकालांवरच प्रश्नचिन्ह?

Goa marathi natya spardha controversy: ‘अ’ गट स्पर्धेत फक्त अकरा नाटकेच असल्यामुळे स्पर्धेतील प्रथम येणाऱ्या नाटकालाच मुंबई येथे होणाऱ्या अंतिम नाट्य स्पर्धेचा दरवाजा उघडा होणार होता.
Goa marathi natya spardha controversy
Goa marathi natya spardha controversyDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

कला अकादमीचे परीक्षक लाच प्रकरण सध्या अनेकांना धक्का देणारे ठरले आहे. कलाक्षेत्रातसुद्धा असे प्रकार होऊ शकतात हे बघून कालकारांबरोबर या कलेचा आस्वाद घेणारे रसिकसुद्धा हादरले आहेत. कला अकादमीची ‘अ’ गट मराठी नाट्यस्पर्धा ही गोव्यातली सर्वांत महत्त्वाची नाट्यस्पर्धा.

याचे कारण म्हणजे या स्पर्धेत पहिले (स्पर्धेत जास्त नाटके असली तर दुसरे) येणाऱ्या नाटकाचा मुंबई इथे होणाऱ्या अंतिम महाराष्ट्र राज्यनाट्य स्पर्धेत समावेश केला जातो. पूर्वी या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून महाराष्ट्रातील दोन व गोव्यातील एक अशी नेमणूक केली जात असे.

पण आता स्पर्धेत पारदर्शकता राहावी म्हणून तीनही परीक्षक महाराष्ट्रातले नेमले जातात. यंदाच्या ‘अ’ गट स्पर्धेत फक्त अकरा नाटकेच असल्यामुळे स्पर्धेतील प्रथम येणाऱ्या नाटकालाच मुंबई येथे होणाऱ्या अंतिम नाट्य स्पर्धेचा दरवाजा उघडा होणार होता. आणि याचसाठी हा ’अट्टहास’ करण्यात आला हे उघडच आहे. पण या प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत.

‘अ’ गट नाट्यस्पर्धा होऊन आता जवळजवळ दीड महिना झाला आहे. इतक्या दिवसांत हे प्रकरण कसे काय उघडकीला आले नाही, हा पहिला प्रश्न. कदाचित दैनिक ‘गोमन्तक’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणले नसते तर या प्रकरणाला वाचा कधीच फुटली नसती, असे वाटते. याबाबतीत ‘गोमन्तक’चे कौतुक करावे तेवढे थोडेच. गडकरी- आठवलेंसारख्या ‘गोमन्तक’च्या संपादकांनी जो निर्भीड पत्रकारितेचा वसा घेतला होता तो विद्यमान संपादक- संचालकांनी पुढे चालू ठेवल्याचे या प्रकरणावरून परत एकदा सिद्ध झाले आहे.

परत एकदा हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार आहे हेही तेवढेच खरे आहे. कला अकादमीचे अधिकारीच यात गुंतलेले असल्यामुळे आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा, हाही प्रश्न निर्माण झाला आहे.

या स्पर्धेचे परीक्षक निरपेक्ष असल्यामुळे त्यांनी याबाबतीत तक्रार केली. पण यापूर्वीही असे प्रकार झाले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. संबंधित स्पर्धेचे परीक्षक हे बाहेरचे असल्यामुळे म्हणा वा कलेशी प्रामाणिक असल्यामुळे म्हणा ते दबाव झुगारू शकले.

पण सगळ्याच परीक्षकांबाबत अशी खात्री देता येणे शक्य नाही. गेली तीन वर्षे कला अकादमीच्या कोकणी नाट्यस्पर्धेचे ‘गोमन्तक’करता समीक्षण करत असल्यामुळे अनेक अनपेक्षित निकालांचा मी अनुभव घेतला आहे. समीक्षण करताना काही नियमितपणे येणाऱ्या प्रेक्षकांची मते विचारात घेऊन निकालाची ढोबळ रूपरेषा मी तयार करत असतो.

पण बऱ्याच वेळा या रूपरेषेत व परीक्षकांच्या अंतिम निकालात तफावत असल्याचे मी बघितले आहे. पण कदाचित हा वैयक्तिक मतामधला फरक असावा असे वाटून मी त्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण आता या परीक्षकांना लाच देण्याच्या प्रकरणामुळे मनात संशयाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. केवळ मलाच नव्हे तर अनेकांना तसे वाटायला लागले आहे.

कला क्षेत्रातील या अनिष्ट प्रवृत्तीचा उगम कधी झाला असावा हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. आणि ‘गोमन्तक’ने हे प्रकरण उघडे केले नसते तर ही प्रवृत्ती कायमच पडद्याआड राहिली असती. यामुळे आता सगळ्याच नाट्यस्पर्धांच्या निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सगळेच परीक्षक असे आहेत असे कुणीही म्हणणार नाही. पण त्याचबरोबर सगळ्यांनाच अशा प्रकारच्या दबावाच्या कवचातून बाहेर पडता येऊ शकते असे म्हणणेही धारिष्टाचे आहे. निकालाबाबत तशा पूर्वीही अनेक तक्रारी होत्या आणि आजही आहेत.

‘विष्णुपुराणात’ कै. विष्णू वाघांनी आपल्या ‘तुका अभंग अभंग’ या त्यांच्या नाटकावर कला अकादमीच्या ‘अ’ गट नाट्यस्पर्धेत कसा अन्याय झाला होता याचे संपूर्ण विवेचन केले आहे. परवाच्या फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिर आयोजित महिला नाट्यस्पर्धेचा निकाल कसा अयोग्य होता यावर एका संस्थेने लेखी तक्रार केली आहे.

Goa marathi natya spardha controversy
Kala Academy: नाट्यगृह व्यवस्थापकाचे नाटक स्पर्धेत कसे? दबक्या आवाजात चर्चा; संबंधित कर्मचारी करणार खुलासे सादर

पण या तक्रारींना पैशाची वा मद्याची किनार नव्हती. आणि या तक्रारींचा रोख प्रामुख्याने परीक्षकांवर होता. आयोजक संस्थेच्या अधिकाऱ्यांबाबत या तक्रारीत कोणतेच भाष्य नव्हते. आता मात्र तक्रारीचे स्वरूप विस्तृत झाले आहे. त्यामुळे सर्व नाट्य स्पर्धाच संशयाच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्यासारख्या वाटायला लागल्या आहेत. आता चेंडू कला अकादमीच्या रिंगणात आहे.

नाट्यस्पर्धेची मूल्ये अबाधित राखण्याकरता कला अकादमी काय करते हे आता बघावे लागेल. पण मोठ्या आशा ठेवता येत नाहीत, हेही तेवढेच खरे आहे. पूजा नाईकचे नोकरभरती प्रकरण कसे हळूहळू बंद पडत गेले तसेच या प्रकरणाबाबत होण्याची शक्यता अधिक.

Goa marathi natya spardha controversy
Kala Academy: कलेच्या दरबारात लाचेचा बाजार! दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; प्रकरण दडपण्यासाठी 'अकादमी'तच रंगली होती चर्चा

तशी कला अकादमी सध्या होत चाललेल्या नाट्यस्पर्धांबाबत गंभीर आहे असे कधी वाटलेच नाही. म्हणूनच तर अजूनपर्यंत परीक्षक नेमणुकीचा निकषच ठरलेला नाही. कला संस्कृती खात्याचे राज्य पुरस्कार मिळालेल्या कलाकारांना डावलून भरीव असे योगदान नसलेल्यांची परीक्षक म्हणून नियुक्ती केली जात आहे.

वाङ्मयचौर्य करून स्पर्धेत नाटकाच्या संहिता लिहिणाऱ्यांकडेही डोळेझाक केली जात आहे. आणि त्यामुळेच ’खोगीर भरती’ तत्त्वावर या स्पर्धा आयोजित केल्या जातात की काय, अशी शंका सध्याच्या या नाट्यस्पर्धा बघून निर्माण व्हायला लागली आहे. मात्र ‘गोमन्तका’ने हे प्रकरण उजेडात आणल्यामुळे नाट्यरसिक जागृत झाला आहे एवढे मात्र खरे. कला अकादमीने भविष्यात जर योग्य काळजी घेतली नाही व असे प्रकार घडत राहिले तर मात्र सगळ्या नाट्यस्पर्धांवरच पडदा पडेल, एवढे निश्चित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com