

वसुंधरेच्या आभूषणांनी पानाफुलांतून वेगवेगळे गंध मानवाला बहाल केले आहेत, त्या वासाने वनस्पतींची ओळख होते, पृथ्वीच्या मातीलाही वास येतो, तापलेली धरणी पावसाच्या पहिल्या सरीने भिजली की, त्यातून मातीचा गंध बाहेर पसरतो, त्या मृद्गंधाने वेगळा अनुभव येतो, पावसानंतर उगवणारे गवत हिरवा रंग परिधान करते, त्याच्या छटेत जीवाचा अर्क दडलेला असतो, श्रावण वा भाद्रपदाचे सोयरसूतक फक्त मानवाला असते.
पण निसर्गाला नसते, दाटलेल्या ढगांच्या काळोखाने अंधारलेली सकाळ जणू काळोखाच्या रात्रीची आठवण करते, पण क्षणात अंधारलेला पडदा जाऊन सुरम्य सकाळ दिसते, वसुंधरेच्या स्वाद आणि गंधाच वरदान मिळाले नसते तर निसर्गाच्या आनंदाला माणूस पारखा झाला असता. चव आणि वासाने हे भावविश्व व्यापून टाकले आहे, पान झाडाचे अगर पुस्तकाचे असो, त्याच्या गंधस्मृतीनी मन भरलेले असते, मुळात पृथ्वी ही गंधवती आहे, तिने वसुंधरेच्या गंधाला चराचरांनी व्यापले आहे, पावसाळ्यात वाहणारे झरे, ओहोळ,
नदीच्या पाण्यालाही वास येतो, पाणी तांब्यात भरून त्यात तुळशीची पाने टाकली तर त्या पाण्याला वास येतो, सुवासिक फुले अगर मधुर फळांचा गंध वाऱ्याच्या झुळके बरोबर लहरत येतो, त्या गंधाने आपण सुखावतो, माणूस निसर्गपुत्र असल्यामुळे त्याच्यात तो बद्ध झाला आहे. कारण पाण्याने सर्वांना मिठीत घेतले आहे. या विचारांनी ओल्डगोवा फेरीधक्का पार करून दिवाडी, देववाडी, दीपवती, दिवार आणि पिएदाद अशा पाच नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पंचगंगा तीर्थक्षेत्राच्या बेटावर पाय ठेवून स्कूटरने प्रवास सुरू केला.
प्रवासात पाचशे वर्षांपूर्वी मांडवी आणि जुवारीच्या मुखाकडील गोव्याच्या सासष्टी, मुरगाव, तिसवाडी आणि बार्देश तालुक्यात परकीय राजवटींनी आपला धर्म आणि सत्ता वाढीसाठी केलेले अत्याचार डोळ्यांसमोर दिसू लागले. मांडवी जुवारीने जरी तिसवाडी बेटाची निर्मिती केली, तरी विशाल मांडवीने आपल्या पात्रात आठ लाडकी बेटे तयार करून त्या बेटांना जैवविविधतेने संपन्न बनविले आहे, ही बेटे म्हणजे मांडवीच्या गळ्यातील आठ रत्ने आहेत, माणसाने या बेटांवर पाय ठेवला आणि शाश्वत विकासाने प्रगती करून व्यापारीकरणाने गोवा जगाच्या नकाशावर कोरला.
पण काही राजवटींनी धर्माच्या नावाने त्या आठही बेटावरील हिंदू लोकसंस्कृतीची नाळ तोडण्याचा प्रयत्न केला. धर्मांध अनुयायी तिथली भक्तीची मंदिरे तोडू शकले पण संस्कृती बुडवू शकले नाहीत, हे या बेटांवर प्रवास करताना पहावयास मिळते. दिवाडी बेटावर गणपती, भावकादेवी, रवळनाथ, बेताळ, काळभैरव, सातेरी, लक्ष्मी, राम, दत्तात्रय, धोंडेश्वर, ब्रम्हा आणि सप्तकोटेश्वर अशा देवदेवतांची पूर्वकाळी भूमी होती, बेटाच्या पूर्वेला पंचगंगा तीर्थक्षेत्र, पश्चिमेला मांडवीचे पात्र, उत्तरेला मांडवी आणि चोडण, दक्षिणेला मांडवी आणि जुने गोवे, पूर्वकाळी त्या बेटावर जाण्या-येण्यास जुने गोवे, विठोजे, वाशी, नार्वा, आखाडा, कर्पीन, हे जलमार्ग होते,
हल्लीच रायबंदर-दिवाडी फेरीमार्ग निर्माण केला आहे. या बेटावर मालार भागात ऐतिहासीक गुंफा आहे, बेटाचा परिसर मारजुवे, मरडवाडा, फेतोरीम, गोलती, नावेली, माडान, सोनारभाट, सातेरीभाट, मधला वाडा, विठोजे, शिकेरी, नार्वा, बेलसूर, आंबीये, सांमातीयश, पोरनेतीर्थ, वाणजुवे, भाक्रावाडा, उसकीवाडा आणि मुड्डी अशा अनेक नावांनी ओळखला जातो. दिवाडी बेट जरी चोडणपेक्षा लहान असले, तरी ते दोन महसुली भागात विभागले आहे. बेटावर हिंदू, ख्रिश्चनांचे दोन धर्म जरी त्या बेटावर रहात असले, तरी दोन्ही धर्म एकमेकांत मिळून मिसळून राहतात, हा एकोपा पवित्र मांडवीने शिकवला आहे, हे म्हणणे गैर नाही.
वर्तुळाकार बेटावरील शेतीचे खाऱ्या पाण्यापासून रक्षण करण्यास बांधाच्या कडेला कांदळवनाचे साम्राज्य पसरले आहे. त्या वनाने बेटाचे सौंदर्य हिरवेगार दिसते, शेतीच्या रक्षणासाठी पूर्वज शेतकऱ्यांनी मांडवीच्या सभोवार तटावरील बांधास बारा मानस उभारून कृषी क्षेत्राचे रक्षण केले आहे. या बारा मानसावर आंबेय खाजन, धोर खाजन, नय खाजन, नार्वा खाजन, गोलती खाजन आणि विठोजे खाजन हे कृषी क्षेत्र अवलंबून आहे, त्या बारा मानसा मांडवी पात्राने वेढलेले खारे पाणी थोपवून धरून त्या बेटावरील जैविक संपत्तीचे रक्षण करतात.
तिथल्या बारा मानशी खाऱ्या आणि गोड पाण्याचे मिलन घडवून मत्स्य संपदेला जन्म देतात, दिवाडी बेट सर्वच बाबतीत कृषी संपन्न आहे. नदीच्या काठावर वर्तुळाकार बांध उभारून कृषीक्षेत्र तयार करण्यास पूर्वजांना किती शतके कष्ट करावे लागले, हे सांगणे फार कठीण आहे. दिवाडी बेटावरील शेती खाजन असल्याने तापणाऱ्या उन्हात कुदळीने खणून ढेकळे सुकवत असे आणि मॉन्सून सुरू झाला म्हणजे शेतात करंगुट, बेळो, खोचरी, मुडगा, मुणो, नवण भाताची लागवड करायचे.
पंधरा वीस दिवसांत पिवळी माती हिरवा शालू नेसून सजायची, महिना दीड महिन्यात खुरपण काढायचे अन् दसरा-दिवाळीला भात कापणी, मळणी करून सोनेरी साळू-मुडया बांधून घरी आणायचे. दिवाडी बेटावरील प्रत्येक खाजनात ओहळाप्रमाणे शेती रक्षणासाठी खळ्या आहेत, त्यातील पाणी सुकती वेळी नदीत जाते आणि भरती वेळी आत येते, त्या पाण्याला तराजू प्रमाणे मापन करून शेतीचे रक्षण करण्याचे काम बांधावरील मानस करते.
याच मानशीतून भरतीच्या वेळी नदीतील शेवटा, खरचाणी, काळूंद्र, चोणकूल, शेतूक, सांगट, पालू, तामसा, बुराटा, खेकडा, झिंगे, वागी मासळी खळ्यात येऊन आपले खाद्य खाऊन त्या पाण्यात मोठी होऊन परत मानशीतून सुकती असल्यावर नदीत जाते. त्यावेळी शेतकरी वा मच्छीमार जाळे लावून मासळी पकडतात. या चवदार मासळीचे कालवण आणि शेतात पिकलेला भात या अन्नावर जगून तिथल्या पूर्वजांनी बेटावरील जैवविविधता जपत कृषी संस्कृती जगवली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.