हिंदुत्ववाद सध्या फणा उभारून उभा आहे. भारतीय इतिहासात कधी नव्हे तेवढी प्रतिष्ठा त्याला मिळते आहे. काही वेळा सत्तेशी निगडित असल्यामुळे, असहाय्यपणे किंवा धाकदपटशा यामुळे. परंतु तरीही हिंदू समाजाचे मूळ प्रश्न, त्यांच्या व्यथा, आधुनिक मत निर्माण करणारी चळवळ, गुलामगिरीची भावना, ब्राह्मण्यवाद याकडे सतत लक्ष वेधले जाते. त्यातून सनातन्यांना काही प्रमाणात शह दिला जातो.
हिंदूंना कट्टरवादाकडे नेण्याचा सनातन्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. कट्टरवाद म्हणजे तालिबान्यांचे अनुकरण, परंतु कट्टरवाद म्हणजे अनुवाद आहे काय, महिलांना अधिकार नसतील, ब्राह्मणांचे पुन्हा वर्चस्व, या प्रश्नांना उत्तर देण्याचे नेहमी टाळले जाते. त्यामुळे हिंदूंवर केलेल्या अन्याय, अत्याचाराबद्दल जेव्हा मुस्लिम - ख्रिस्तींनी माफी मागण्याचा हट्ट बाळगला जातो, तेव्हा हिंदूंनी पिढ्यानपिढ्या दास्यत्व दिलेल्या आपल्याच हिंदू बांधवांची माफी का मागू नये, असे त्यांना विचारले जाते, तेव्हा ते विषय बदलण्याचा प्रयत्न करतात. मग ते समोरच्याला निरुत्तर करण्यासाठी राष्ट्रवाद, देशप्रेम वगैरे मुद्दे पुढे करतात.
या राष्ट्रवादाचाच एक भाग म्हणून ते ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करण्याचा विषय मांडतात. परंतु या कथित हिंदुराष्ट्राची संकल्पनाच त्यांना शास्त्रशुद्धपणे मांडता आलेली नाही. हिंदू राष्ट्र निर्माण करायचे म्हणजे इतर धर्मियांचे विषय नागरिकत्व गृहित धरायचे काय? त्यातून पुढची गोष्ट म्हणजे स्वधर्मियांची अस्पृश्यतेसारखी गुलामी, त्यांच्यावरील अन्याय, पिढीजात भ्रष्टाचार यांचे काय करायचे?
वास्तविक अशा सनातनी धर्माला हिंदूंचीच मान्यता मिळणार नाही. या विषयावर नरहर कुरुंदकरांंनी विस्ताराने लिहिले आहे.ते म्हणतात ः धर्मपरंपरांनी कोणती गुलामी निर्माण केलेली असते, हे सोयिस्करपणे विसरणे वरिष वर्गाला शक्य असते. गुलामी निर्माण केलेली असते, हे सोयिस्करपणे विसरणे वरिष्ठ वर्गाला शक्य असते. जे पशूंप्रमाणे टाकलेले असतात, नागवले गेलेले असतात, त्यांना मागच्या आठवणी विसरू म्हटले तरी विसरणे फार कठीण असते. हिंदू बहुजन समाजाची हिंदू राज्याला मान्यता कशी मिळणार?
बहुजन समाजाचीच कशाला, बुद्धिमान, विचारी हिंदूही अशा संकल्पनेला कधी पाठिंबा देणार नाही. हिंदूंमध्ये जातीयवाद आहे, आकस आहे, काही प्रसंगी वैरही आहे, परंतु तो क्रमाने ढासळत चालला आहे. विकासाच्या प्रत्येक टप्प्याबरोबर जीवनाचे आधुनिकीकरण होत आहे आणि प्रत्येक जातीच्या जाग्या झालेल्या अहंता एकीकडे परस्परांना, दुसरीकडे धार्मिक राजकारणाला आणि तिसरीकडे सनातनी मनोवृत्तीला छेद देऊन जातात.
परंतु देशात अनेक धर्म संकुचित होत गेले व अल्पसंख्य असल्यामुळे त्यांना आपले संघटन महत्त्वाचे वाटले, त्यामुळे त्यांच्यात जातीयवाद वाढला, परिणामी सुशिक्षित हिंदू मनावरही परिणाम अपरिहार्य होता. मुस्लिम जातीयवाद जसाच्या तसा असल्यामुळे हिंदू जातीयवाद नव्या स्वरूपात फणा काढतोय, हिंदूमधील सेक्युलर भावना मावळत आहेत व हिंदू जातीयवादाचे नवे सुशिक्षित नेतृत्व निर्माण झाले आहे.
आधुनिक, सुशिक्षित हिंदू हा जातीयवादी, हिंदुत्वाच्या चक्रात कसा अडकला? कारण आधुनिकतेची व्याख्या त्याचा नैतिक विकास होण्याशी निगडित होती. उच्च शिक्षणात त्याला ती मिळाली नाही व उंची गॅझेट आल्यामुळे, बाळगल्यामुळे त्यांचा नैतिक विकास होणे शक्यच नव्हते. आमच्या उच्च शिक्षणात आधुनिक बनविण्याची सोय नाही, नाहीतर आयआयटीत गेलेले व अमेरिकेसारख्या देशात उच्च पदावर असलेले हिंदुत्वाच्या गर्तेत सापडले नसते. हा वर्ग धर्मांध बनतोय ही चिंतेची बाब आहे.
गंमत म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातही जातीयवाद होता. किंबहुना तो जास्त चिवट होता, परंतु हिंदूंच्या जातीयवादी चळवळीचे स्वरूपच सुधारणांचे होते. हिंदूंच्या जातीयवादाने कधी स्मृतीचा कायदा पुन्हा भारतात लागू करावा, तो निर्दोष आहे, अशी भूमिका घेतली नव्हती.
नरहर कुरुंदकर लिहितात ः स्वातंत्र्यपूर्व काळी आजच्यापेक्षा हिंदू समाज मनाने जास्त सनातनी होता. हिंदू महासभेला हिंदू सुशिक्षित हिंदुवर्गाचा फारसा पाठिंबा का मिळाला नाही? इतर लोक सोडा, पण ब्राह्मणही हिंदू महासभेच्या मागे नव्हते. सर्व लोकप्रिय ब्राह्मण नेते बहुसंख्येने काँग्रेसमध्ये होते.
तशा गोवा मुक्तीशी भारतातील हिंदुत्ववादी संघटना निगडित नव्हत्या. दादरा-नगर हवेली मुक्त करण्यात त्यांनी जोरदारपणे सहभाग घेतला, परंतु गोव्यात संघटनात्मकरीत्या त्यांचे काम नाही, मोहन रानडे यांच्यासारखे काही सेनानी वैयक्तिकरीत्या सहभागी झाले व राष्ट्रवादाचे धडे देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. परंतु मग गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याचा जो प्रयत्न झाला, त्यात हिंदुत्ववादाचे योगदान कितपत? या प्रश्नाचे उत्तर साधे सरळ सापडत नाही. गोवा महाराष्ट्रात विलीन करण्याचा विचार तसा १९व्या शतकापासून चर्चेत आला होता.
१८७०पासून अनेक नियतकालिकांमध्ये सारस्वत विचारवंतांनी त्याबाबतचा आग्रह चालवला व मडगावच्या गोमंत विद्यानिकेतनातील व्याख्यानांमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या वक्त्यांनी तसा सूर - निग्रह आळविला. तो हिंदुत्ववादापेक्षा काहीसा सांस्कृतिकवादाचा भाग होता व गोवा मुक्त झाल्यानंतर ते ‘स्वतंत्र राष्ट्र’ म्हणून उदयास येऊ शकते व ख्रिस्ती प्राबल्यापासून मुक्त होण्यासाठी महाराष्ट्रात विलिनीकरण हा उतारा शोधण्यात येत होता. महाराष्ट्रात विलिनीकरणाचा सारस्वत प्रभावातून मुक्त होण्यासाठीही पुरस्कार केला जात होता असा एक मुद्दा मानला जातो. परंतु त्यावेळच्या वैचारिक चळवळी आणि भाषा, विलिनीकरण यांच्या बाजूने व विरोधात सारस्वत शक्तीच प्रबळ होत्या. विद्यानिकेतनातूनच मराठीची चळवळ चालविली जात होती व तेच धुरीण महाराष्ट्राच्या बाजूनेही होते.
गोवा वेगळा ठेवण्यात सारस्वतांमधील बंडखोर तरुण व ख्रिस्ती समाज एकवटला, परंतु १९६७ मध्ये जर विलिनीकरण वादाला मूठमाती मिळाली असेल, तर मग अजूनही ‘मराठी’ची भीती ख्रिस्ती वर्ग का बाळगेल? अजूनही त्यांना मराठी म्हणजे आक्रमक आकांक्षा, विस्तारवाद व तिची श्रेष्ठतत्वाची जाणीव याची आठवण का करून देते?
मराठी राजभाषा - कोकणीच्या बरोबरीने बनली तर सरकारी रोजगारासाठी महाराष्ट्रातून तरुण येतील, ही भीती आजच्या काळात कितपत संयुक्तिक? कारण गोव्यात मराठी राजभाषा नसताना मूळ गोवेकर त्यांच्याच राज्यात यापूर्वीच अल्पसंख्य बनले आहेत. १७ लाख लोकसंख्येच्या गोव्यात मूळ गोवेकर केवळ सात लाख आहेत. राजभाषा प्रश्नावर संवेदनशील बनत असताना राज्याचे अर्थकारण घरंगळत गेले. राजकारणावर स्वार्थी-सत्तालोलुप घटकांनी ताबा मिळविला व एकेकाळी हिंदुत्ववादी भाजपात ख्रिस्तींची संख्या हिंदू आमदारांपेक्षा अधिक होती! एका बाजूला ख्रिस्तीबहुल भागांमध्ये अनेक पर्यावरणवादी आंदोलने - जी राज्याच्या ‘केरिंग’ कॅपेसिटीच्या नावाने चालली आहे - परंतु जी ख्रिस्तींमध्ये आणखी अल्पसंख्य होण्याच्या भीतीनेच चालली आहेत - त्यांचाच एक आमदार मॉविन गुदिन्हो काही वादग्रस्त विधाने बिनदिक्कत करतो. सारे प्रश्न व मुद्दे कसे राजकारणाशी निगडित बनलेले आहेत, त्याचाच हा नमुना, त्यात मग बहुसंख्यांक - अल्पसंख्यांकांचे अस्तित्व, सुशिक्षितांची भूमिका, भाषा, अस्तित्व गुरफटतात व तर्क लावणे कठीण बनते!
वास्तविक राष्ट्रांची, राज्यांची भवितव्ये केवळ चर्चांनी ठरत नसतात. त्यामागे जुने प्रवाह असतात. भवितव्य बदलण्यासाठी नवे प्रवाह बलवान करावे लागतात. नवे प्रवाह कोणते? सनातनीपणा मोडून पडावा. आधुनिक गोवा निर्माण करावा. त्यासाठी आधुनिक लोकशाहीला योग्य वातावरण निर्माण करावे. सेक्युलर प्रेरणा बळकट व्हाव्यात.
कोणताही धर्म ही एक सामाजिक घटना असते. काही प्रमाणात धार्मिक ग्रंथ या सामाजिक घटनेला आकार देतात. त्यातील काही गुरू समाजघटना निर्माण करतात. पण या दोन्हींपेक्षा धर्माचे सामाजिक स्वरूप कितीतरी जास्त असते. त्याला इतिहास व परंपरा असते. त्याचे रूप धर्माच्या पोथ्या वाचून कधीच सापडणार नाही. त्यामुळे कोणत्याही धर्मात किंवा समाजजीवनात धार्मिक चिकित्सा हीच मूलगामी व मानवाच्या आधुनिकतेची खूण असते. धर्माला न्याय, समता, शांतता, बहुधर्मी राष्ट्र अभिप्रेत असावे. विचारांचे आदानप्रदान खुलेपणाने व्हावे. दुर्दैवाने धर्माचे अनुयायी त्याचे स्वरूप स्वतःला हवे तसे - राजकारणाला पूरक - पद्धतीने बदलत असतात. इतरांवर अन्याय करणारीच ही वृत्ती असते. आधुनिक विद्येनेच या अपप्रवृत्तींवर मात करता येते.
वास्तविक साऱ्या धर्मांची शिकवण एकच आहे. गीता, कुराण व बायबलमध्येही सर्वधर्म खरे, परंतु सगळे धर्म अपुरे राहिलेत. अर्धे राहिलेत, कच्चे राहिलेत.रामकृष्ण परमहंस यांनी हे सांगितले. धर्म जिवंत राखायचे असतील तर ते एकमेकांच्या जवळ यायला हवेत. धर्मसमन्वयाचा मंत्र आपल्या देशात अनेकांनीही दिला. प्रत्येकाच्या अस्तित्वाला बाधा न आणता एकत्र आणून ते चालवा. म्हणजे कुटुंबात हिंदू हिंदूच राहील, पण तो फक्त हिंदूंचा असणार नाही. हा एक भव्य आदर्शवाद आहे. ख्रिस्ताने म्हटलेय, ज्याचे मन निर्मळ, ज्याचे हृदय पवित्र त्यालाच परमेश्वराचे दर्शन होईल. साऱ्या धर्मांची तर तीच शिकवण आहे - माणूस निर्मळ, प्रेमळ, नम्र, ऋजुहृदयी असावा. उपनिषदामध्येही तेच सांगितलेय, माणुसकीला धरून चाल.
वास्तविक देश मुक्त होताच आपण खूप आर्थिकदृष्ट्या प्रगती केली, पण आपण राष्ट्रीय चारित्र्य घडवू शकलो तर? सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून, एकमेकांना सांभाळत, एकमेकांच्या आधाराने आपण देशाला पुढे घेऊन जायला हवे, त्या दिशेने आपण प्रयत्न करतोय काय? ज्या प्रकारचा ‘धर्म’ आपल्याला अभिप्रेत आहे, त्याने राष्ट्रीय चारित्र्य घडविण्याच्या कामी देशाला मदत करायला नको? आपल्या ‘धर्मा’कडे देश-परिवर्तनाचा असा कोणता बरे कार्यक्रम आहे? अशी ‘क्रांती’ करण्याची क्षमता आहे, तोच धर्म खरा असे आपण का मानू नये?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.