

Man Slips Catching Moving Train Viral Video: सोशल मीडिया हे आजच्या काळात असे एक माध्यम बनले आहे, जिथे दररोज हजारो व्हिडिओ पोस्ट केले जातात. यात कधी मनोरंजक तर कधी डोक्याला ताण देणारे स्टंट पाहायला मिळतात. मात्र, सध्या इंटरनेटवर एक असा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून कोणाचाही थरकाप उडेल. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील हा व्हिडिओ निष्काळजीपणाचा कळस दाखवणारा असून, एका व्यक्तीने स्वतःचा जीव कसा धोक्यात घातला, हे यात स्पष्टपणे दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभे असल्याचे दिसतात. तितक्यात तिथे थांबलेली ट्रेन सुरु होते आणि वेग पकडू लागते. ट्रेन सुरु होताच एक व्यक्ती धावत जाऊन चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा जीवघेणा प्रयत्न करते. तो एका डब्याच्या दरवाजाचे हँडल पकडतो आणि ट्रेनसोबत धावू लागतो. पण त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर ठेवलेल्या एका बॅगेला त्याचा पाय लागतो आणि त्याचा तोल बिघडतो. तोल गेल्यानंतर त्याचा एक पाय थेट प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधील अरुंद पोकळीत जातो.
ही परिस्थिती इतकी भयानक असते की, क्षणात त्या व्यक्तीचा पाय कापला गेला असता किंवा तो थेट ट्रेनखाली आला असता. परंतु, सुदैवाने त्याने डब्याचे हँडल अतिशय घट्ट पकडून ठेवले होते, ज्यामुळे काही सेकंदांतच त्याने स्वतःला सावरले आणि तो सुरक्षितपणे ट्रेनच्या (Train) आत चढला. हा संपूर्ण प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीत किंवा कोणाच्या तरी कॅमेऱ्यात कैद झाला.
हा थरारक व्हिडिओ 'एक्स' या प्लॅटफॉर्मवर '@rabiyask2021' नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये अत्यंत महत्त्वाचा संदेश देण्यात आला की, 'असा निष्काळजीपणा खूप महागात पडू शकतो. वेळेत या भावाने स्वतःला सावरले, नाहीतर आज त्याच्या फोटोवर हार चढवावा लागला असता.' हा व्हिडिओ व्हायरल होताच हजारो लोकांनी तो पाहिला असून नेटीझन्स यावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
या व्हिडिओवर नेटीझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युझरने लिहिले की, "असे जीवघेणे स्टंट करण्यापेक्षा ट्रेन सोडून दिलेली बरी, ऑफिसला उशीर झाला तरी चालेल पण जीव महत्त्वाचा आहे." दुसऱ्या एका युझरने संतापून लिहिले, "हे लोक स्वतःच्या आयुष्याशी खेळतात, घरी त्यांचे कुटुंब त्यांची वाट पाहत असते याचे त्यांना भान नसते." तर तिसऱ्या युझरने रेल्वे प्रशासनाची बाजू घेत म्हटले की, "अशा अपघातात स्वतःच्या चुकीमुळे जीव गेला की मग यांचे कुटुंबीय रेल्वेला दोष देतात." हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक जण एकच सल्ला देत आहे की, घाईगडबडीत किंवा उशीर झाला म्हणून कधीही धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करु नका, कारण तुमची एक चूक संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.