यंदाच्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीला लाभलेले ग्लॅमर हेच तिचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरले. अधिकारांच्या बाबतीत तोकडी असलेली जिल्हा पंचायत, अवघ्या चौदा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तासमीकरणांची चाचणी घेणारे मैदान बनली. त्यामुळे ही निवडणूक विकासाची नव्हे तर राजकीय प्रतिष्ठेची बनली आणि सर्वच पक्षांनी ती तशीच लढवली.
भाजपचा विजय अपेक्षित होता, पण तो निर्धोक नाही. ‘सुटलेला वारू लक्ष्य गाठणार’ हे समीकरण कायम राहिले तरी या वेळी वारू घसरत-घसरत पोहोचला. मागील निवडणुकीपेक्षा चार जागा गमावाव्या लागल्या आणि अनेक जागा अत्यल्प फरकाने पदरात पडल्या. हा निकाल भाजपसाठी विजयापेक्षा इशारा अधिक आहे. उत्तर गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मंत्री विश्वजित राणे यांची पकड अभेद्य आहे.
पर्यटन क्षेत्रातील बेजबाबदार कारभार, नियोजनशून्यता आणि स्थानिक असंतोष यांचा फारसा राजकीय परिणाम झाला नाही. मंत्री खंवटे, केदार नाईक, मायकल लोबो आणि दिलायला लोबो यांनी आपापले बालेकिल्ले राखले. याचा अर्थ लोकांना सर्व काही मान्य आहे, असा नव्हे; पण भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्यात विरोधक अपयशी ठरले, हे मात्र निर्विवाद आहे. गाजावाजा झाला, आग लागली; पण राखेतून भाजपच बाहेर आला.
मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना शिरसई, कोलवाळमध्ये धक्का बसला. बाबू कवळेकर यांना खोला-गिरदोळीमध्ये मिळालेला फटका, गोविंद गावडे यांच्या बेतकी-खांडोळा येथील मानहानिकारक पराभवासह पाहिला तर भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता अधोरेखित होते. दुसरीकडे कुर्टीत रितेश नाईक यांनी भाजपसाठी केलेली व्यूहरचना ही राजकीय काटेकोर नियोजनाचे उदाहरण ठरली.
महिलांची मतदान दरातील वाढीव टक्केवारी आणि जिंकून येण्याचे प्रमाण हेही एक अनोखे वैशिष्ट्य ठरले. ‘माझे घर’ योजनेचा प्रभाव आहे, की अन्य काही कारणे आहेत, याचा उलगडा पुढील काळात होईल. कॉंग्रेससाठी हा निकाल दिलासादायक नसून संजीवनी ठरला आहे. विशेषतः दक्षिण गोव्यात मारलेली मुसंडी ही दीर्घकाळानंतरची आशादायक घटना आहे. चारवरून थेट दहापर्यंत झेप घेणे हे योगायोग नाही.
कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचा हा थेट फायदा आहे. फॉरवर्डचा रिवणमध्ये अवघ्या १९ मतांनी झालेला पराभव आणि सात ठिकाणी मिळालेले दुसरे स्थान हे एकच सांगतात विरोधक एकत्र आले, तर भाजप अजेय नाही. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचा फुगा पुरता फुटलेला दिसतो. ४२ जागा लढवून केवळ एक विजय मिळवणे ही लाजिरवाणी कामगिरी आहे. वेंझी व्हिएगस यांची अरेरावी, स्थानिक नेतृत्वाकडे असलेले दुर्लक्ष आणि ‘दिल्लीचा पक्ष’ ही प्रतिमा पक्षाला भोवली. बाणवलीसारखी हक्काची जागा गमावणे हे त्याचे ठळक उदाहरण.
चिंबल मतदारसंघात आपचे नेते अमित पालेकर सक्रिय आहेत, तेथे भंडारीबहुल भाग असूनही आपला अपयश आले. रिव्हॉल्युशनरी गोवन्सला सांत आंद्रेतील दोन जागा मिळाल्या आहेत; परंतु ख्रिस्ती मतदार त्यांच्याकडे आता संशयाने पाहू लागला आहे, हेही खरे आहे. विरोधकांनी एकी केल्याशिवाय भाजपला टक्कर देणे अशक्य आहे, हे निकालाने पुन्हा दाखवून दिले आहे. युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांनी पुन्हा तशी विधानेही केली आहेत.
या निकालाचा खरा संदेश सोपा आहे, विरोधकांची बेकी हीच भाजपची सर्वात मोठी ताकद आहे. स्वबळाच्या वल्गना सुरू राहिल्या, तर सत्ता बदलाची भाषा केवळ भाषणांपुरतीच राहील. विधानसभा निवडणुकीस अजून वेळ आहे. भाजपला चुका सुधारण्याची संधी आहे, तर विरोधकांना त्या चुका ओळखून एकत्र येण्याची शेवटची संधी. प्रश्न इतकाच आहे, कोण शिकतो आणि कोण इतिहासाची पुनरावृत्ती करतो? मतदानातून मतदारांना काय नेमके सांगायचे आहे, त्याचा अन्वयार्थ जे अधोरेखित करतो ते चिंता वाढवणारे आहे.
कुठला राजकीय पक्ष जिंकला यापेक्षाही लोकांनाच त्यांच्या आयुष्याशी निगडीत ज्वलंत मुद्दे हाताळलेले नको आहेत का? भ्रष्टाचार असाच सुरू राहिलेला हवा आहे का? हे निर्विवादपणे सांगता येणे सध्याच्या घडीस तरी कठीण आहे. पण, एक निश्चित कौल मतदारांनी दिला आहे. विरोधकांना ‘एकत्र या, एकत्र राहा आणि एकत्र लढा’ हे सूचित केले आहे. पर्याय म्हणून त्यांना स्वीकारण्याची लोकांची तयारी आहे.
अनेक ठिकाणी कमी फरकाने झालेली हार, मतदारांचे हेच म्हणणे अधोरेखित करत आहे. राजकीय पक्षांचे हेवेदावे, अहंकार, प्रतिष्ठा यापेक्षाही ते सर्व विसरून एकत्र येऊन एका समान कार्यक्रमावर लढा दिल्यास पाठबळ देऊ, हेच मत मतदारांनी व्यक्त केले आहे. सत्ताधाऱ्यांनाही अनेक ठिकाणी कमी फरकाने जो विजय प्राप्त झाला आहे, ते जी बजबजपुरी माजलीय त्याचे समर्थन नाही, हेच मतदार सांगत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही मतदारांनी मतपेटीतून जे समजावले आहे, त्याची त्यांना उमज पडेल?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.